घोडबंदर रोडवर शेअर टॅक्सी

By Admin | Published: April 5, 2017 03:56 AM2017-04-05T03:56:34+5:302017-04-05T03:56:34+5:30

ओला, उबेर या खाजगी कंपनीच्या टॅक्सी सेवेचा धसका घेऊन ठाण्यात टॅक्सी चालक -मालक संघटनेने ठाणे स्टेशन ते कासारवडवली अशी शेअर टॅक्सी सेवा सुरु केली

Share taxi on Ghodbunder Road | घोडबंदर रोडवर शेअर टॅक्सी

घोडबंदर रोडवर शेअर टॅक्सी

googlenewsNext

ठाणे : ओला, उबेर या खाजगी कंपनीच्या टॅक्सी सेवेचा धसका घेऊन ठाण्यात टॅक्सी चालक -मालक संघटनेने ठाणे स्टेशन ते कासारवडवली अशी शेअर टॅक्सी सेवा सुरु केली आहे. यासाठी प्रती प्रवासी ४० रुपये भाडे आकारण्यात येत आहे. या नव्या सेवेला ठाणेकरांकडून चांगलाच प्रतिसाद मिळत आहे. या सेवेबरोबर आता भविष्यात ठाणे शहरातील अन्य तीन ठिकाणी शेअर टॅक्सी सेवा सुरु करण्याचा संघटनेचा मानस आहे.
मुंबई शहराचे जुळे शहर म्हणून ठाणे शहराकडे पाहिले जाते. गेल्या काही वर्षात ठाणे शहर झपाट्याने वाढू लागले. ााढत्या नागरीकरणामुळे येथील लोकसंख्याही त्याच पटीने वाढताना दिसत आहे. त्या तुलनेत सार्वजनिक वाहतूक व्यवस्था सक्षम असल्याचे दिसत नाही. या खाजगी कंपनीच्या टॅक्सी सेवेमुळे ठाणे शहरातील टॅक्सीधारकांचा व्यवसायावर परिणाम झाल्याने पोट कसे भरायचे आणि घेतलेले कर्ज कसे फेडायचे असा प्रश्न निर्माण झाला. ही बाब लक्षात घेऊन, ठाण्यातील राष्ट्रवादी काँग्रेस रिक्षा-टॅक्सी चालक-मालक संघटनेच्या सदस्यांनी खाजगी कंपनीच्या टॅक्सी सेवेमुळे होणाऱ्या परिणामावर चर्चेसाठी संघटनेचे सल्लागार आ. निरंजन डावखरे यांच्याकडे गेले होते. त्यावेळी त्यांनी शेअर टॅक्सीचा पर्याय समोर आणला. यावर विचार करताना, घोडबंदर रोडवरील नागरीकरण लक्षात घेऊन आणि तेथील प्रवाशांची गैरसोय पाहून शेअर टॅक्सी सुरु करण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार, संघटनेच्या ९० पैकी १५ सदस्यांनी या मार्गावर शेअर टॅक्सी सेवा नुकतीच सुरु केली आहे.
ठाणे स्थानकांतून घोडबंदर रोडवरील कासारवडवली अशी सेवा सुरु करताना, ५० रुपये दर ठरविले होते. पण, याच मार्गावर धावणाऱ्या रिक्षांचे शेअरिंगचे दर ४० रुपये असल्याने त्यांचे नुकसान होऊ नये, म्हणून संघटनेने अखेर दर ४० रुपयांवर निश्चित केले आहे. पुढे ओवळा येथे जायचे असेल तर अधिकचे १० रुपये मोजावे लागणार आहेत. ही सेवा सुरु करण्यापूर्वी ठाणे प्रादेशिक परिवहन विभागाला त्याची माहिती दिली आहे. तसेच सध्या टॅक्सीमध्ये चार अधिक एक अशी प्रवासी संख्या आहे. ती सहा अधिक एक अशी करावी, अशी मागणी करणार असल्याचे संघटनेने सांगितले. (प्रतिनिधी)
>शहरातही सुरु करणार
शहरातील लोकमान्यनगर, वसंतविहार, मेडोज् या ठिकाणी प्रवासी संख्या जास्त आहे. त्या तुलनेत रिक्षांची संख्या कमी पडत आहे. त्यामुळे ठाणे-कासारवडवली शेअर टॅक्सी सेवा यशस्वी झाली तर लवकरच शहरातही शेअर टॅक्सी सेवा सुरू करण्याचा मानस असल्याचे संघटनेने सांगितले.
या मार्गावर जाणाऱ्या प्रवाशांची संख्या जास्त आहे. मात्र, परतीच्या प्रवाशांची संख्या खूपच कमी आहे. ती वाढली, तर आणखी टॅक्सी या मार्गावर धावतील. त्याचबरोबर शहरातही शेअर टॅक्सी सुरु करण्याचा विचार आहे. ही सेवा सुरु करण्यामागे प्रवाशांची गैरसोय दूर करणे हाच उद्देश आहे.
- राजू सावंत, अध्यक्ष, राष्ट्रवादी रिक्षा टॅक्सी चालक - मालक संघ

Web Title: Share taxi on Ghodbunder Road

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.