राज ठाकरेंच्या पत्नी शर्मिला यांच्या कारला नवी मुंबईत अपघात
By ऑनलाइन लोकमत | Published: October 5, 2019 03:07 PM2019-10-05T15:07:09+5:302019-10-05T15:09:13+5:30
एकविरा देवीच्या दर्शनावरुन परतत असताना अपघात
नवी मुंबई: मनसेप्रमुखराज ठाकरे यांच्या पत्नी शर्मिला ठाकरेंच्या कारला अपघात झाला आहे. यामध्ये त्या किरकोळ जखमी झाल्या आहेत. राज ठाकरे आज सकाळी त्यांच्या कुटुंबासह एकविरा देवीच्या दर्शनाला गेले होते. तिथून परतत असताना दुपारी दोनच्या सुमारास शर्मिला ठाकरेंच्या कारला सानपाड्याजवळ अपघात झाला.
अपघातावेळी शर्मिला ठाकरेंसोबत राज यांची बहिण आणि त्यांचे सचिव सचिन मोरे कारमध्ये होते. अचानक एक रिक्षा कारसमोर आल्यानं शर्मिला यांच्या कारला अपघात झाला. रिक्षा आणि कारची धडक होऊ नये यासाठी कार चालकानं गाडी वळवली. त्यावेळी कारवरील नियंत्रण सुटलं. मात्र सुदैवानं मोठा अपघात टळला. या अपघातात शर्मिला ठाकरे यांना किरकोळ दुखापत झाल्याची माहिती मिळत आहे.
शर्मिला ठाकरेंच्या कारला अपघात झाला, त्यावेळी राज ठाकरेंच्या गाड्यांचा ताफा बराच पुढे होता. अपघाताची माहिती मिळताच राज ठाकरेंनी त्यांचा ताफा थांबवला. यानंतर पोलिसदेखील घटनास्थळी दाखल झाले. शर्मिला ठाकरे दुसऱ्या गाडीनं मुंबईच्या दिशेनं रवाना झाल्या.
मनसे अध्यक्ष राज ठाकरे ९ ऑक्टोबरपासून विधानसभेच्या निवडणूक प्रचाराला सुरुवात करणार आहेत. त्याआधी त्यांनी एकविरा देवीचे दर्शन घेतलं. लोणावळा येथे असलेली एकवीरा देवी ही ठाकरे घराण्याची कुलदेवता आहे. त्यामुळे या देवीच्या दर्शनासाठी राज ठाकरे गेले होते. तिथून परतत असताना शर्मिला ठाकरेंच्या कारला अपघात झाला.