Sharmila Thackeray : "छत्रपतींना तरी सोडा, कोकणातील लोक कोणत्या रक्ताचे..."; शर्मिला ठाकरेंनी व्यक्त केला संताप
By ऑनलाइन लोकमत | Published: August 29, 2024 04:21 PM2024-08-29T16:21:53+5:302024-08-29T16:30:37+5:30
Sharmila Thackeray : मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या पत्नी शर्मिला ठाकरे यांनी संताप व्यक्त केला आहे.
मालवण सिंधुदुर्गातील राजकोट परिसरात आठ महिन्यांपूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते अनावरण झालेला छत्रपती शिवाजी महाराजांचा पूर्णाकृती पुतळा मुसळधार पाऊस आणि वादळी वाऱ्यामुळे कोसळला आणि अवघा महाराष्ट्र हळहळला. व्यवस्थेविरुद्ध संताप व्यक्त करीत शिवप्रेमींनी घटनास्थळी धाव घेतली. याच दरम्यान आता मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या पत्नी शर्मिला ठाकरे यांनी संताप व्यक्त केला आहे.
"मला इतकं दुखं होतंय की हे सांगताहेत ताशी ४५ किमी वेगाने वारा आला म्हणून पुतळा पडला. त्याच किल्ल्याच्या समोर छत्रपती शिवाजी महाराजांनी बांधलेला ३५० वर्षांपूर्वीचा सिंधुदुर्ग अजूनही उभा आहे. त्यांचे इतके गडकिल्ले अजूनही उभे आहेत. त्यापेक्षा जास्त वारा ते सोसत आहेत. त्यामुळे तुम्ही किमान छत्रपती शिवाजी महाराजांना तरी सोडा."
"मुंबई-नाशिक रस्त्यात भ्रष्टाचार झालाय. तिथे इतके खड्डे आहेत... मुंबई-गोवासाठी तर आम्ही आंदोलन करून थकलो. कोकणातील लोक कोणत्या रक्ताचे आहेत की ते अजूनही या लोकांवर विश्वास ठेवून त्यांना मतदान करतात. महाराजांनी बांधलेले किल्ले जतन करा. जो पुतळा पडला तो अखंड पोकळ पुतळा होता. असा पोकळ पुतळा समुद्रकिनारी कोण उभं करतं?"
"शिवाजी महाराजांनी समुद्रात बांधलेले विजयदुर्ग, सिंधुदुर्ग ते तर कधीच पडले पाहिजे. त्याची तटबंदी अजूनही चांगली आहे. साडेतीनशे वर्ष जुना असल्याने त्याची आतमध्ये पडझड झाली असेल. पण तुमचा पुतळा आठ महिन्यात पडतो... छत्रपतींना तरी सोडा. भ्रष्टाचार सगळीकडे सुरू आहे. रस्ते केले की खड्डे पडतात. तुम्ही चांगल्या कंपन्या घ्या आणि चांगले रस्ते तरी बनवायला सांगा" असं शर्मिला ठाकरे यांनी म्हटलं आहे. टीव्ही ९ मराठीशी संवाद साधताना त्यांनी असं म्हटलं आहे.