"... म्हणून पहिल्या दिवशी राज ठाकरे आणि आम्ही कुटुंबीयांनी पूरग्रस्तांकडे जाणं टाळलं"
By ऑनलाइन लोकमत | Published: July 31, 2021 08:45 AM2021-07-31T08:45:31+5:302021-07-31T08:46:12+5:30
MNS Raj Thackeray Maharashtra Flood : शर्मिला ठाकरे यांनी सांगितलं कारण. पूरग्रस्तांच्या मदतीसाठी पहिल्याच दिवशी जाण्याची इच्छा होती, असंही त्या म्हणाल्या.
महाराष्ट्रात आलेल्या महापूरानं सर्व जनजीवन विस्कळीत झालं आहे. आता सर्वच भागांतून पूरग्रस्तांसाठी मदतही पोहोचू लागली आहे. दरम्यान, महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रमुख राज ठाकरे यांच्या पत्नी शर्मिला ठाकरे यांनी आपल्याला पहिल्याच दिवशी पूरग्रस्तांच्या मदतीसाठी जाण्याची इच्छा होती, परंतु त्या का गेल्या नाहीत, यामागचं कारण उलगडलं आहे. राज ठाकरे यांनी आधी पूरग्रस्तांपर्यंत मदत पोहोचू द्यावी असं सांगितल्यानंच उशिरा भेट दिली असल्याचं नमूद केलं. तसंच महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे कार्यकर्ते पूरग्रस्तांच्या मदतीसाठी कार्यरत असल्याचंही त्यांनी सांगितलं.
आपल्याला पहिल्याच दिवशी पूरग्रस्त भागाला भेट द्यायची इच्छा होती. आपण त्या ठिकाणी भेट दिल्यास तिकडे सुरू असलेल्या मदत कार्यात काही अडचण निर्माण होऊ शकते, म्हणून राज ठाकरे आणि आम्ही कुटुंबीयांनी पूरग्रस्त भागात जाणं टाळलं, असं शर्मिला ठाकरे म्हणाल्या. परंतु मनसेकडून मदत मात्र सुरू असल्याचं त्यांनी नमूद केलं. "कोकणातूल पूरग्रस्त खांदापटली, इंदापूर, कळकवणे आणि तिवरे या गावांमध्ये तातडीची मदत करण्यात येत आहे. या ठिकाणी ५०० कुटुंबीयांना जीवनावश्यक वस्तू पुरवल्या जात आहेत," अशी माहिती मनसेचे विभाग प्रमुख यशवंत किल्लेदार यांनी दिली.
महापूरात अनेक गोष्टी वाहून गेल्या
"महापूरात बँकेच्या कागदपत्रांपासून अनेक गोष्टी वाहून गेल्या. आम्ही पूरग्रस्तांसाठी जीवनावश्यक वस्तू मदत म्हणून पाठवत आहोत. राज ठाकरेंच्या आवाहानानंतर मनसेचे अनेक ट्रक मदत घेऊन जात आहेत. मदत सर्वांपर्यंत पोहोचवण्यासाठी मनसे कार्यकर्ते काम करत आहेत. मनसेची मदत पोहोचल्याचं तेखील पोलिसांनीही फोनद्वारे सांगितलं," असं शर्मिला ठाकरे म्हणाल्या.