मध्यस्थीसाठी शत्रुघ्न सिन्हांचे प्रयत्न

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 9, 2015 02:50 AM2015-07-09T02:50:07+5:302015-07-09T02:50:07+5:30

ज्येष्ठ अभिनेते आणि भारतीय जनता पक्षाचे नेते शत्रुघ्न सिन्हा यांनी एफटीआयआयला (फिल्म अ‍ॅँड टेलिव्हिजन इन्स्टिट्यूट) भेट देऊन तोडगा काढण्याचे आश्वासन दिले.

Shatrughan Sin tried to intervene | मध्यस्थीसाठी शत्रुघ्न सिन्हांचे प्रयत्न

मध्यस्थीसाठी शत्रुघ्न सिन्हांचे प्रयत्न

googlenewsNext

पुणे : ज्येष्ठ अभिनेते आणि भारतीय जनता पक्षाचे नेते शत्रुघ्न सिन्हा यांनी एफटीआयआयला (फिल्म अ‍ॅँड टेलिव्हिजन इन्स्टिट्यूट) भेट देऊन तोडगा काढण्याचे आश्वासन दिले. मंगळवारी रात्री उशिरा संस्थेमध्ये येऊन त्यांनी संचालक डी. जे. नारायण यांच्याशी चर्चा केली. विद्यार्थ्यांशी मात्र संवाद साधला नाही. संस्थेचा माजी विद्यार्थी या नात्याने आपण संपाबाबत तोडगा काढण्यासाठी प्रयत्नशील आहोत, त्यासाठी मध्यस्थीचीही तयारी असल्याचे त्यांनी सांगितले.
माहिती व प्रसारण मंत्रालयाबरोबरची चर्चा फिस्कटल्याने २५ दिवसांपासून विद्यार्थ्यांचे आंदोलन सुरू आहे. या पार्श्वभूमीवर एफटीआयआयचे माजी विद्यार्थी या नात्याने सिन्हा यांनी एफटीआयआयचे संचालक नारायण यांच्याशी विविध मुद्द्यांवर सविस्तर चर्चा केल्याचे समजते.
सिन्हा म्हणाले, ‘‘मी भाजप सरकार किंवा येथील विद्यार्थी दोन्हींची बाजू मांडायला आलेलो नाही. माजी विद्यार्थी या नात्याने मी येथे आलो आहे. इतक्या दिवसांच्या आंदोलनाचा मुलांच्या अभ्यासावर परिणाम होत आहे. मी त्यांच्या मागण्या समजतो. पण मी विद्यमान सरकारचा भाग आहे. त्यामुळे या दोन्हींमध्ये मध्यस्थी करण्याचा माजी विद्यार्थी म्हणून प्रयत्न करणार आहे. त्यामुळे मी नारायण यांना भेटून काही मध्यम मार्ग निघतो का यावर चर्चा केली. काही दिवसांत मी स्वत: मंत्रालयस्तरावर भेटून तोडगा काढण्याचा प्रयत्न करणार आहे.’’

आश्वासनापलीकडे काही नाही
४चित्रपट क्षेत्रातील अनेक जण भारतीय जनता पक्षाचे नेते आहेत. यामध्ये शत्रुघ्न सिन्हा, हेमामालिनी यांचा समावेश आहे. या कलाकार मंडळींकडून विद्यार्थ्यांना खूप आशा आहेत; मात्र सत्ताधारी पक्षाचा भाग असल्यामुळे त्यांचे हात दगडाखाली आहेत. त्यामुळे केवळ आश्वासन देण्यापलीकडे ते काहीच करू शकत नाही. त्यामुळेच शत्रुघ्न सिन्हा यांनी विद्यार्थ्यांची भेट न घेता संचालकांशीच थेट संवाद साधणे हिताचे मानले. म्हणूनच खासदार म्हणून नव्हे, तर एफटीआयआयचा माजी विद्यार्थी या नात्याने आलो असल्याचे त्यांनी वारंवार स्पष्ट केले.

राजीनामा द्यायचा प्रश्नच उद्भवत नाही : अनघा घैसास
पुणे : हो, मी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे काम करीत होते; पण पूर्ण वेळ कार्यकर्ती नव्हते, अशी कबुली देत आम्ही विद्यार्थ्यांच्या भल्याचाच विचार करू. फक्त विद्यार्थ्यांनी आमच्यावर विश्वास ठेवावा. आमच्यावर अनेक आरोप झाले, तरीही आम्ही त्यांच्याशी चर्चा करण्यास तयार आहोत; पण त्यांनाच बोलायचे नाही. इतर सदस्यांनी राजीनामे का दिले माहीत नाही; पण मी राजीनामा द्यायचा प्रश्नच उद्भवत नाही, असे एफटीआयआयच्या (फिल्म अ‍ॅँड टेलिव्हिजन इन्स्टिट्यूट) नियामक मंडळाच्या सदस्या अनघा घैसास यांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले.
‘व्हिजन’ नसलेल्या व्यक्तींची नियामक मंडळाच्या अध्यक्षपदासह सदस्यपदी नियुक्ती करून संस्थेचे ‘भगवीकरण’ करण्याचा घाट शासनस्तरावर घातला जात आहे. त्यामुळे गेल्या २५ दिवसांपासून वर्ग बंद करून विद्यार्थ्यांनी आंदोलनाचा पवित्रा घेतला आहे. केंद्रीय माहिती व प्रसारण मंत्रालयातर्फे विद्यार्थ्यांच्या या मागणीची दखल न घेता उलट संस्थेचे खासगीकरण आणि स्थलांतर करण्याच्या धमक्या देऊन त्यांचीच मुस्कटदाबी करण्याचा प्रयत्न केला जात आहे.
हे चिघळत चाललेले आंदोलन पाहता विद्यार्थीच जर नाखूष असतील तर पदावर राहण्यात काय अर्थ आहे, या भावनेने मंडळातील पल्लवी जोशी, जॉन बरूआ या सदस्यांनी राजीनामे देणे पसंत केले आहे. मात्र, अनघा घैसास यांनी राजीनामा देण्याचा प्रश्नच नसल्याचे सांगत नकार दर्शविला आहे. घैसास म्हणाल्या, ‘‘विद्यार्थ्यांना आमची नियुक्ती चुकीची का वाटत आहे. शॉर्टफिल्मसह चित्रपट क्षेत्रामध्ये आमचे योगदान आहे. ‘अयोध्या राम मंदिर’, ‘नॉर्थ ईस्ट’ यावर मी लघुपट केले आहेत. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे मी काम करीत होते, हे मान्य आहे; पण म्हणून आमची नियुक्ती करण्यात आली आहे, हा पूर्णत: चुकीचा समज आहे. हे पद सन्माननीय आहे, चांगले काम करण्याची आमची इच्छा आहे. आंदोलनामुळे विद्यार्थ्यांचेच नुकसान होत आहे. त्यांच्या आंदोलनाला दिशा मिळत नसल्याने तेच ‘कन्फ्यूज’ आहेत. त्यांना नक्की काय हवे आहे तेच कळत नाही.’’

Web Title: Shatrughan Sin tried to intervene

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.