चिमुकल्याच्या नेत्रदानाची ‘शौर्य’कथा
By Admin | Published: September 22, 2015 01:46 AM2015-09-22T01:46:45+5:302015-09-22T01:46:45+5:30
साडेचार वर्षांच्या चिमुकल्याचा उंचावरून पडून अचानक अंत झाला; मात्र पोटच्या गोळ्याच्या- शौर्यच्या मृत्यूचे दु:ख बाजूला ठेवून मातापित्याने त्याच्या इवल्याशा डोळ्यांचे दान करीत समाजासमोर नवा आदर्श ठेवला
नाशिक : साडेचार वर्षांच्या चिमुकल्याचा उंचावरून पडून अचानक अंत झाला; मात्र पोटच्या गोळ्याच्या- शौर्यच्या मृत्यूचे दु:ख बाजूला ठेवून मातापित्याने त्याच्या इवल्याशा डोळ्यांचे दान करीत समाजासमोर नवा आदर्श ठेवला.
ही ‘शौर्यगाथा’ आहे म्हसरूळच्या हृषीकेश व वैशाली परमार या दाम्पत्याची. या दोघांना शौर्य व साहस अशी दोन मुले. त्यातला मोठा मुलगा शौर्य (वय साडेचार वर्षे) रविवारी दुपारी दुसऱ्या मजल्यावरून पडून गंभीर जखमी झाला. त्याच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू होते; मात्र छोट्या मेंदूला गंभीर मार लागल्याने परिस्थिती बिकट होत चालली होती. हृषीकेश परमार हे देहदान चळवळीतील कार्यकर्ते जितेंद्र भावे यांचे जिवलग मित्र. त्यांनी डॉक्टरांशी चर्चा केल्यानंतर शौर्य वाचणार नसल्याचे कळले. भावे यांनी हृषीकेश यांना शौर्यच्या अवयवदानाबाबत विचारले. त्यावर आॅप्टिकलमध्ये नोकरी करणाऱ्या हृषीकेश यांनी अवघ्या मिनिटभरात होकार दिला. त्याबरोबर पुढची चक्रे फिरली. शौर्य हा ‘ब्रेनडेड’ नसून ‘कार्डियाक’ डेड असल्याने तयारी असूनही त्याचे फक्त डोळे व त्वचा हे अवयवच दान करता येतील, असा निष्कर्ष निघाला. दुर्दैवाने त्वचा बॅँक नसल्याने शौर्यचे फक्त डोळेच दान करता आले. सोमवारी पहाटे साडेचार वाजता शौर्यचे निधन झाले; मात्र हे जग सोडतानाही तो दोन गरजूंना दृष्टी देऊन गेला.