जखमी अवस्थेतही तिने दिली चोरट्यांशी झुंज
By admin | Published: June 28, 2015 02:19 AM2015-06-28T02:19:14+5:302015-06-28T10:53:17+5:30
भरधाव दुचाकीवरील चोरट्यांनी तिची सोनसाखळी खेचली. मात्र, तिनेही तेवढ्याच धैर्याने त्यांचा टी शर्ट पकडला. त्याही अवस्थेत त्यांनी गाडी पळविण्याचा प्रयत्न केला.
ठाणे : भरधाव दुचाकीवरील चोरट्यांनी तिची सोनसाखळी खेचली. मात्र, तिनेही तेवढ्याच धैर्याने त्यांचा टी शर्ट पकडला. त्याही अवस्थेत त्यांनी गाडी पळविण्याचा प्रयत्न केला. रक्तबंबाळ अवस्थेत ती फरफटत गेली, पण टी शर्ट सोडला नाही. अखेर जमावाने चोरट्याला पकडून पोलिसांच्या हवाली केले.
कोणत्याही सिनेमामध्ये शोभावे,असा हा प्रकार शनिवारी दुपारी ठाण्यात घडला. कळवा, खारीगाव येथे राहणाऱ्या मंदा दिलीप शेटे (४९) या गणेश टॉकिज येथे सिनेमाची तिकिटे काढण्यासाठी गेल्या होत्या. मात्र, ती न मिळाल्यामुळे त्या चालत सिव्हिल रूग्णालयाच्या दिशेने येत असताना झेंडेवाला दर्गाह येथे दुचाकीवरु न आलेल्या दोन चोरट्यांनी त्यांच्या गळ्यातील सोनसाखळी खेचली. त्या वेळी प्रसंगावधान राखून दुचाकीवर मागे बसलेल्या चोरट्याचे टी शर्ट त्यांनी पकडले. मात्र, या चोरट्यांनीही त्याच अवस्थेत गाडी पुढे नेण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे त्या गाडीबरोबर ओढल्या गेल्या मात्र, त्यांनी शेटे यांनी चोरट्याचा टी शर्ट सोडला नाही. अखेर त्यांच्या प्रतिकारामुळे तो चोरटा खाली पडला. त्यावेळी जमा झालेल्या जमावाने त्याला चांगलाच चोप देऊ पोलिसांच्या हवाली केले. या प्रकरणी नौपाडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून शफी अख्तर जाफरी (१९) याला अटक केली आहे.
मंगळसूत्र चोरीच्या चार घटना
१सोनसाखळी चोरणाऱ्या टोळीचा पदाफार्श करणाऱ्या ठाणे पोलिसांना चोरट्यांनी आठवडाभराच्या आत पुन्हा आव्हान दिले आहे. शुक्रवारी एकाच दिवशीच पुन्हा मंगळसुत्र चोरीच्या चार घटना घडल्या आहेत. कापूरबावडी, नौपाडा आणि वर्तकनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडलेल्या या घटनांमध्ये लाखोंचा ऐवज चोरीला गेला आहे. या चारही घटनांमध्ये वृद्ध महिलांना टार्गेट करण्यात आले असून एका चोरीप्रकरणी पोलिसांनी दोघांना ताब्यात घेतले आहे. ढोकाळी हायलॅन्ड रेसिडेन्सी येथे राहणारी ५६ वर्षीय महिला यशस्वीनगर येथून पायी जात असतांना दुचाकीवरुन आलेल्या दोघांनी त्यांच्या गळ्यातील ३५ ग्रॅम वजनाचे मंगळसूत्र चोरुन नेले.
२या प्रकरणी कापूरबावडी पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद केला आहे. दुसऱ्या घटनेत कृष्णा सोसायटी वागळे इस्टेट भागात राहणारी २९ वर्षीय महिला कापूरबावडी भागात कामानिमित्त आल्या होत्या. धर्मवीरनगर रोडवरुन पायी चालत असतांना दुचाकीवरुन आलेल्या राजेश दुबरीया आणि कल्पेश परमार या दोघांनी त्यांच्या गळ्यातील ७२ हजार रुपये किमंतीचे मंगळसूत्र व २८ हजार रुपये किमतीची सोन्याची चेन, असा एकूण एक लाख रुपये किमतींचा ऐवज घेऊन पोबारा केला. परंतु, त्यांना आता पोलिसांनी ताब्यात घेतले आहेत. तिसऱ्या घटनेत पाचपाखाडी भागात जीम जवळून पायी जात असलेल्या ५८ वर्षीय महिलेच्या गळ्यातील मंगळसूत्र दुचाकीवरून आलेल्या दोघांनी चोरून नेल्याची घटना २६ जून रोजी रात्री १०.३० च्या सुमारास घडली आहे.
३या प्रकरणी नौपाडा पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे. दुचाकीवरुन आलेले हे दोघे तरुण अंदाजे २० ते २७ वयोगटातील होते अशी माहिती समोर आली आहे. चवथ्या घटनेत वर्तक नगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत ५१ वर्षीय महिला आपल्या घरच्यांसमवेत खाजगी रुग्णालयातून उपचार घेऊन जात असतांना दोन अनोळखी इसमांनी त्यांच्या गळ्यातील १ लाख २५ हजार रुपये किमंतीचे मंगळसूत्र चोरले आहे. या प्रकरणी वर्तकनगर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद आहे.