‘ती’ मुत्सद्देगिरी की गद्दारी? उपमुख्यमंत्री फडणवीस यांचा सवाल,पवार जनसंघासोबत गेले ते काय होते?
By ऑनलाइन लोकमत | Published: June 27, 2023 11:00 AM2023-06-27T11:00:40+5:302023-06-27T11:01:19+5:30
Devendra Fadnavis: शरद पवार यांनी १९७८ मध्ये वसंतदादा पाटील यांच्या काँग्रेस सरकारमधून ४० आमदारांसह बाहेर पडत पुलोदचा प्रयोग केला व जनसंघासोबत सरकार स्थापन केले होते, ते काय होते, मुत्सद्देगिरी की गद्दारी? असा सवाल उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सोमवारी माध्यमांशी बोलताना केला.
मुंबई : शरद पवार यांनी १९७८ मध्ये वसंतदादा पाटील यांच्या काँग्रेस सरकारमधून ४० आमदारांसह बाहेर पडत पुलोदचा प्रयोग केला व जनसंघासोबत सरकार स्थापन केले होते, ते काय होते, मुत्सद्देगिरी की गद्दारी? असा सवाल उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सोमवारी माध्यमांशी बोलताना केला.
ते म्हणाले की, एकनाथ शिंदे हे भाजपसोबत युतीमध्येच निवडून आले होते व भाजपसोबतच त्यांनी सरकार स्थापन केले. तरीही शरद पवार त्याला गद्दारी म्हणतात. पुलोद सरकार बनले, तेव्हा मी प्राथमिक शाळेत होतो, असे पवार म्हणतात. ते खरे आहे, पण माझ्या त्यावेळी शाळेत असण्याने इतिहास बदलत नाही. छगन भुजबळ, सुनील तटकरे यांनी राष्ट्रवादीत पदे दिली, हे खरे आहे, पण संविधानिक पदे द्यायचे म्हटले तर, ओबीसींचा त्यांना विसरच पडतो.
शरद पवार यांच्या पक्षात कोणाचा बोलबाला आहे, कोणाच्या दबावात हा पक्ष चालतो, हे त्यांच्याच पक्षाचे नेते खासगीत बोलत असतात, मी त्यांचीच भावना बोलून दाखविली. - देवेंद्र फडणवीस
कधी बेईमानी केले ते सांगावे : शरद पवार; अज्ञानापोटी फडणवीसांकडून वक्तव्ये
बारामती : मी कधी बेईमानी केली हे त्यांनी सांगावे. १९७७ साली आम्ही सरकार बनविले. पण त्यात भाजप माझ्यासोबत होता. त्यामुळे त्यांना कदाचित पूर्वीचा इतिहास माहीत नसेल. मी जे सरकार बनविले ते सगळ्यांना घेऊन केले. त्यात त्यावेळचा जनसंघ, त्याचे उत्तमराव पाटील उपमुख्यमंत्री होते, आणखी काही सदस्य होते. मला वाटते त्यावेळी ते प्राथमिक शाळेत कदाचित असतील त्यामुळे त्यांना त्या काळातील माहिती नसेल. ते अज्ञानापोटी अशी वक्तव्ये करतात, असा टोला राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी येथे पत्रकारांशी बोलताना लगावला.
एकनाथ शिंदे यांनी केली तर बेईमानी व पवारांनी केली तर मुत्सद्देगिरी का? असे, वक्तव्य उपमुख्यमंत्री फडणवीस यांनी केल्याकडे लक्ष वेधले असता पवारांनी खरपूस समाचार घेत त्यावर आणखी भाष्य करण्याची गरज नाही, असा चिमटाही काढला.
राष्ट्रवादीत ओबीसींना पुरेशी संधी मिळत नसल्याच्या प्रश्नावर पवार म्हणाले, आमच्या पक्षाचे राज्याचे पहिले अध्यक्ष छगन भुजबळ होते. नंतरच्या काळात मधुकर पिचड, सुनील तटकरे अशा अनेकांना संधी मिळाली. त्यामुळे याबाबत विरोधकांकडून आरोप होत असतील तर त्यांचे वाचन कमी असेल. पण लोकांना सगळे माहीत असते.
अजित पवारांबाबत पक्षातील प्रमुख लोक निर्णय घेतील
पक्ष संघटनेच्या कामात सर्वांनी लक्ष घालावे अशी प्रत्येकाचीच भावना आहे. तेच मत अजित पवार यांनी पक्षाच्या व्यासपीठावर व्यक्त केले आहे, त्यात यापेक्षा वेगळे काही नाही. राज्याचे विरोधी पक्षनेते यांनी पक्ष संघटनेतील पदाच्या केलेल्या मागणीबाबत निर्णय मी एकटा घेत नाही. त्यांनी इच्छा व्यक्त केली असेल तर पक्षातील प्रमुख लोक बसून त्यातून निर्णय होईल, असेही शरद पवार यांनी सांगितले.