बेवारस महिला मृतदेहांना ‘ती’ देते अखेरचा ‘गुस्ल’
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 15, 2016 02:14 PM2016-10-15T14:14:37+5:302016-10-15T14:16:03+5:30
बेवारस महिला मृतदेहांचाही अखेरचा प्रवास विधीवत व्हावा, या उद्देशाने वडाळा रोडवरील एक महिला गेल्या एक तपापासून महिलांच्या मृतदेहांना ‘गुस्ल’ देत अनोखी मानवसेवा करत आहेत.
मानवसेवा : एक तपापासून हमीदा बाजीने जोपासला वसा
ऑनलाइन लोकमत
नाशिक, दि. १५ - इस्लाम धर्मात अंत्यसंस्काराच्या पध्दतीमध्ये ‘गुस्ल’ अर्थात स्नानाचा विधी हा फार महत्वाचा मानला जातो. मयत पुरूष असो अथवा महिला त्यांच्या मृतदेहांना धार्मिक नियमानुसार अत्यंत बारकाईने अखेरचा स्नान घालणेॉवा बंधनकारक असते. स्नानासाठी किमान तास ते दीड तासाचा कालावधी लागतो. वारस असलेल्या मयत मृतदेहांच्या बाबतीत हे सर्व घडून येते; मात्र बेवारसांचे काय? अशा बेवारस महिला मृतदेहांचाही अखेरचा प्रवास विधीवत व्हावा, या उद्देशाने वडाळा रोडवरील एक महिला गेल्या एक तपापासून महिलांच्या मृतदेहांना ‘गुस्ल’ देत अनोखी मानवसेवा करत आहेत.
वडाळारोडवरील शिखर सोसायटीमध्ये हमीदा सय्यद (बाजी) राहतात. महिला मृतदेहांना त्यांच्या आई स्नान घालत होते. त्यांचे कार्य बघून हमीदा बाजी यांना त्या कार्याची ओळख झाली. तारुण्यात आईसोबत त्या अनेकदा स्नान घालण्यासाठी जात असे. विवाहनंतर २००० सालापासून त्यांनी वारसांच्या महिला मृतदेहांना स्नान घालण्याचे नियम व पध्दती माहित करुन घेतली. कुराणपठण येत असल्यामुळे त्यांना बहुतांश धार्मिक श्लोक मुखद्गत झाले. त्यामुळे त्यांना महिला मृतदेहांना स्नान घालताना फारशा अडचणी आल्या नाहीत. २००० सालापासून त्यांनी वारसांच्या मयत महिला मृतदेहांना स्नान घालण्यास सुरूवात केली. सर्वप्रथम द्वारका येथील संतकबीरनगर येथे एका मुस्लीम कुटुंबामध्ये वृध्द महिलेचे निधन झाले. लहान खोली असल्याने त्यांना रात्रीच्या सुमारास मृतदेह सांभाळने जिकरीचे होत होते. त्यांनी तत्काळ बाजीशी संपर्क साधला आणि सर्वप्रथम त्यावेळी त्यांनी या वृध्दाला अखेरचा विधीवत पारंपरिक पध्दतीने स्नान घातला. तेव्हापासून तर आजतागायत त्यांचे हे कार्य सुरू आहे. दरम्यानच्या काळात जुने नाशिकमधील खडकाळी येथील युवा मल्टीपर्पज अॅन्ड सोशल ग्रूप या संस्थेने बेवारस मुस्लीम मृतदेहांच्या दफनविधीची जबाबदारी स्विकारली. यावेळी महिला मृतदेह आल्यास त्याचा दफनविधी करताना स्नानाची अडचण निर्माण होत होती. यावेळी हमीदा बाजी पुढे आल्या आणि त्यांनी वारसांच्या मृतदेहांना स्नान घालण्याबरोबरच बेवारस मुस्लीम महिला मृतदेहांच्या स्नानाची जबाबदारी विनामानधन स्विकारली. २००४ सालापासून त्यांनी बेवारस महिला मृतदेहांना स्नान घालण्यास सुरूवात केली. तेव्हापासून आजतागायत हमीदा बाजी बेवारस महिला मृतदेह संस्थेने जिल्हा रुग्णालयाच्या शवागारातून स्विकारल्यास त्या तत्काळ खडकाळी येथे हजर होऊन रसूलबाग कब्रस्तानाच्य प्रवेशद्वारालगत असलेल्या ‘स्नानगृहा’त मृतदेहांना अखेरचा स्नान धार्मिक पध्दतीने घालतात. यावेळी त्यांना परिसरातील काही महिलांची साथ लाभते.
प्रकृतीवरही होतो परिणाम
जिल्हा रुग्णालयातून येणाऱ्या मुस्लीम महिलांचे मृतदेह शवागारातील असतात. यामुळे मृतदेहांना दुर्गंधी अधिक येते तसेच सुक्ष्मजंतुचाही प्रादुर्भाव मुतदेहामध्ये झालेला असतो. अनेकदा कुजलेल्या अवस्थेत आलेले मृतदेहांनाही हमीदा बाजी यांनी स्नान घातले आहे. या सर्व प्रकाराचा त्यांच्या प्रकृतीवरही परिणाम होतो. तरीदेखील त्यांनी या विधायक कार्याला विराम न देता मानवसेवेचा वसा जोपासला आहे.