‘ती’ला मिळाली सोळाव्या वर्षी पुन्हा दृष्टी!
By admin | Published: March 7, 2017 01:24 AM2017-03-07T01:24:16+5:302017-03-07T01:24:16+5:30
औषधांच्या रिअॅक्शनमुळे वयाच्या पाचव्या वर्षी तिच्या डोळ्यांना अंधत्व आले
प्रवीण गायकवाड,
शिरूर- औषधांच्या रिअॅक्शनमुळे वयाच्या पाचव्या वर्षी तिच्या डोळ्यांना अंधत्व आले. एक डोळा पूर्ण, तर दुसरा ५० टक्के निकामी झाला. अशा अवस्थेत जिद्दीने जगणाऱ्या सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सावंतवाडी येथे राहणाऱ्या ‘समीक्षा’ला वयाच्या सोळाव्या वर्षी पुन्हा पूर्ण दृष्टी प्राप्त झाली. येथील नेत्ररोगतज्ज्ञ डॉ. स्वप्निल भालेकर यांनी ही किमया साधली. जीवनात पाहिलेली स्वप्ने आता पूर्ण करायची असल्याचे समीक्षाने ‘लोकमत’शी बोलताना सांगितले.
समीक्षा सुदीप देसाई असे तिचे नाव. समीक्षाला पाचव्या वर्षी एका औषधाच्या सेवनामुळे रिअॅक्शन आली. तिचा उजवा डोळा पूर्ण निकामी झाला, तर डावा डोळा ५० टक्के निकामी झाला होता. अवघ्या पाच वर्षांच्या समीक्षाच्या जीवनात तर जणू अंधारच पसरला होता. आपल्या छकुलीची ही अवस्था पाहून आई-वडीलही व्यथित झाले होते.
मुलीला पुन्हा पूर्वीसारखी दृष्टी प्राप्त व्हावी, यासाठी सुदीप देसाई यांनी मुंबईत अनेक ठिकाणी प्रयत्न केले. मात्र, डॉक्टरांनी आता
शक्य नसल्याचे सांगितले. यानंतर ते पुण्यात आले. पुण्यात त्यांना डॉ. भालेकरांकडे जाण्याचा सल्ला देण्यात आला. डोळ्यांच्या ठराविक शस्त्रक्रियेमध्ये देशातील काही मोजक्या डॉक्टरांमध्ये डॉ. भालेकर यांचा समावेश होतो. तरीही,
ते शिरूरसारख्या ग्रामीण भागात प्रॅक्टिस करीत आहेत.
डॉ. भालेकर यांच्याकडे आल्यावर त्यांनी समीक्षाच्या डोळ्यांवर शस्त्रक्रिया केली. ही शस्त्रक्रिया करण्यासाठी समीक्षाला पाच तास भूल द्यायची होती. ही एक प्रकारे रिस्क होती. मात्र, भूलतज्ज्ञ डॉ. रवी जाधव यांनी भूल दिली. यातून समीक्षावर यशस्वीरीत्या शस्त्रक्रिया करू शकलो, असे डॉ. भालेकर यांनी सांगितले. शस्त्रक्रियेनंतर समीक्षाला आता दोन्ही डोळ्यांनी दिसू लागले आहे. समीक्षाने ११ वर्षे एका डोळ्याच्या ५० टक्के दृष्टीवर काढली. अशातही
तिने शिक्षण सुरू ठेवले. वाचन करताना तिच्या डोळ्यांतून खूप पाणी यायचे. तिला त्रास सहन करावा लागायचा.
मात्र, पालक व शिक्षकांच्या सहकार्यामुळे तिने
जिद्द सोडली नाही. दहावीत तिने चक्क ९० टक्के गुण मिळविले. आता ती अकरावी विज्ञान शाखेत शिक्षण घेत आहे. डॉक्टर होण्याची तिची मनीषा आहे.
समीक्षाने डॉ. भालेकरांचे आभार मानले. वैद्यकीय अभ्यासक्रम अवघड आहे. अशात मला दोन्ही डोळ्यांनी दिसू लागल्याने हा अभ्यासक्रम पूर्ण करताना मदत होईल, असे समीक्षा म्हणाली.
दररोज अनेक रुग्णांची
मोफत तपासणी
डॉ. भालेकर यांच्याकडे राज्य तसेच राज्याबाहेरील रुग्ण येतात. ग्रामीण भागातील रुग्ण हे चांगल्या उपचारांसाठी शहरात जातात. मात्र, ग्रामीण भागातील जनतेसाठी डॉ. भालेकर यांनी शिरूर येथे प्रॅक्टिस सुरू केली.
त्यांच्या वैशिष्ट्यामुळे शहरातील
(तेही मोठ्या) रुग्ण ग्रामीण भागात येऊ लागले. दररोज अनेक रुग्णांची ते मोफत तपासणी करतात.