तीन मुलांच्या आईसोबत त्यानं जमवलं सूत
By admin | Published: December 22, 2016 09:48 PM2016-12-22T21:48:21+5:302016-12-22T21:48:21+5:30
तीन मुलांची आई, तिच्यापेक्षा १० वर्षे वयाने लहान असलेल्या युवकाच्या प्रेमात पडली
ऑनलाइन लोकमत
अकोला, दि. 22 - ती तीन मुलांची आई...सुखी संसार...परंतु शरीरसुखाच्या हव्यासापोटी ही तीन मुलांची आई, तिच्यापेक्षा १० वर्षे वयाने लहान असलेल्या युवकाच्या प्रेमात पडली आणि तिथेच अचानक सुखी संसाराला दृष्ट लागली, संसाराला गालबोट लागले...त्यांच्यातील प्रेमाची, संबंधाची कुणकुण दिव्यांग पतीला लागल्यानंतर पतीने पोलीस ठाण्यात धाव घेतली.
शरीरसुख ही अशी बाब आहे, की त्यापुढे पैसा, प्रतिष्ठा, मानमरातब सर्वच काही शून्य होऊन जाते. शरीरसुखासाठी आपण कोणत्या कुटुंबातील आलो आहोत, आपल्यावर कोणते संस्कार झाले आहेत.
मुलंबाळं, पती, पत्नी, आपले कुटुंब...या सर्वांचा विचार थिटा पडतो. अशीच काहीशी एक घटना गुरुवारी सिव्हिल लाइन पोलीस ठाण्यात घडली. एका सुखवस्तू कुटुंबात घडलेली ही घटना आहे. शहरातील एका प्रतिष्ठित भागामध्ये एक महिला तिचा दिव्यांग पती आणि तीन मुलांसोबत राहते. पती चांगल्या नोकरीवर आहे. सुखी संसार...सुरू असतानाच, कुटुंबातील तीन मुलांच्या आईची, तिच्यापेक्षा वयाने लहान असलेल्या युवकासोबत ओळख होते. हसणे, बोलणे, एकमेकांकडे पाहण्याचा नित्यक्रम त्यांच्यात सुरू झाला. हळूहळू दोघेही एकमेकांच्या जवळ येत गेले. म्हणतात ना, प्रेम हे आंधळं असतं. तसंच दोघांचंही झालं. घर, कुटुंब, मुलं, संसार याचा कोणताही विचार न करता, हे दोघे कधी जवळ आले, हे त्यांना कळलेदेखील नाही.
शरीरसुखासाठी आसुसलेल्या दोघांनी सर्वच मर्यादा ओलांडल्या. कुटुंब, मुलांना वाऱ्यावर सोडून ही महिला युवकासोबत भाड्याने खोली घेऊन राहू लागली. पती, कुटुंबाने अनेकदा समजावून सांगण्याचा प्रयत्न केला. समाजात बदनामी नको म्हणून पोलिसांत जाण्याचेही टाळले. प्रयत्न व्यर्थ ठरत असल्याचे पाहून पतीने अखेर पोलीस ठाण्यात तक्रार दिली. त्यानुसार पोलिसांनी युवकाला ताब्यात घेतले. त्याची चौकशी केली, तेव्हा त्यांनी पूर्ण लव्ह स्टोरी कथन केली.
मारू नका हो त्याला...
प्रेम हे प्रेम असतं...प्रेमात जीव ओवाळून टाकायला मागे-पुढे पाहिल्या जात नाही. याचा प्रत्ययही पोलीस ठाण्यात आला. युवकाला ताब्यात घेतल्यानंतर त्याला चांगलेच खडसावले. हे पाहून महिलेला वाटले, की युवकाला आता पोलीस मारतील. त्यामुळे महिलेने पोलिसांना, मी माझ्या कुटुंबासोबत येथून निघून जाते. त्याला मारू नका हो... मी तुमच्या पाया पडते. त्याला काही करू नका, अशी विनवणी पोलिसांना केली.
महिलेचा तक्रार देण्यास नकार
युवकाला ताब्यात घेतल्यानंतर संबंधित महिलेलासुद्धा पोलीस ठाण्यात बोलावण्यात आले. पोलिसांनी महिलेस युवकाविरुद्ध तक्रार देण्यास सांगितले; परंतु महिलेने तक्रार देण्यास नकार दिला. त्यामुळे पोलिसांनी युवकावर प्रतिबंधात्मक कारवाई केली.