‘ती’ ठरली खरी ‘मर्दानी’, मद्यपीच्या तावडीतून केली कंडक्टरची सुटका
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 16, 2018 04:29 AM2018-04-16T04:29:18+5:302018-04-16T04:29:18+5:30
रात्री अकराची वेळ. प्रवाशांना घेण्यासाठी बसथांब्यावर बस थांबवली. त्याच दरम्यान एका मद्यपीने बसच्या काचेवर मारले. म्हणून त्याला कंडक्टरने हटकले. याच रागात मद्यपीने कंडक्टरलाच लाथा-बुक्क्यांनी मारहाण सुरू केली. बघ्यांची गर्दी जमली. मात्र, मदतीसाठी कोणीही पुढे आले नाही.
मुंबई - रात्री अकराची वेळ. प्रवाशांना घेण्यासाठी बसथांब्यावर बस थांबवली. त्याच दरम्यान एका मद्यपीने बसच्या काचेवर मारले. म्हणून त्याला कंडक्टरने हटकले. याच रागात मद्यपीने कंडक्टरलाच लाथा-बुक्क्यांनी मारहाण सुरू केली. बघ्यांची गर्दी जमली. मात्र, मदतीसाठी कोणीही पुढे आले नाही. तेथून रिक्षाने जात असलेल्या महिलेने हा प्रकार पाहिला आणि रिक्षा थांबवून ती खाली उतरली. धाडसाने तिने मद्यपीला रोखले. त्याला चांगलाच चोप देत, त्याच्या तावडीतून तिने कंडक्टरची सुटका केल्याची घटना भांडुपमध्ये घडली.
नवी मुंबईतील रहिवासी असलेले प्रवीण मोकाशी (३२) हे बेस्टमध्ये कंडक्टर आहेत. १२ एप्रिल रोजी रात्री पावणेअकराच्या सुमारास ते मुलुंड बेस्ट डेपोतून कर्तव्यावर निघाले. रात्री ११ च्या सुमारास त्यांची बस सोनापूर स्मशानभूमी बसथांब्यावर थांबली. त्याच दरम्यान, कोणीतरी बसच्या मागील काचेवर मारल्याचा आवाज आल्याने मोकाशी खाली उतरले. तेव्हा एका तरुणाने बसच्या पुढच्या काचेवर मारल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. मोकाशी त्यांच्याकडे जाईपर्यंत तरुण तेथून निघून गेला. मात्र, मोकाशी यांनी त्याच्या साथीदाराला पकडले. त्याला घेऊन ते पोलीस ठाण्याच्या दिशेने निघाले. पुढे काही अंतरावर गेल्यानंतर एका मद्यपीने बस अडवली. बसमध्ये चढून ‘खिंडीपाड्यांचा भाई आहे,’ असे म्हणत त्याने मोकाशी यांना मारहाण सुरू केली. त्या वेळी बसमध्ये ३ प्रवासी होते. त्याने मोकाशीला जमिनीवर पाडून लाथा-बुक्क्यांनी मारहाण सुरू केली. बघ्यांची गर्दी जमली. त्याच दरम्यान तेथून रिक्षातून जाणारी एक महिला रिक्षा थांबवून पुढे आली. तिने कसलीही भीती न बाळगता, त्या मद्यपीला अडविले. त्याने तिच्यासोबत असभ्य वर्तन करायला सुरुवात केली. तेव्हा तिने त्याला चोप देण्यास सुरुवात केली. या मर्दानीचे धाडस पाहून बघ्यांनीही पुढे येत त्याला चांगलाच चोप दिला. तोपर्यंत महिला तेथून निघून गेली. तिच्या या धाडसाचे सर्वांकडूनच कौतुक होत आहे.
जखमी झालेल्या मोकाशी यांना मुलुंडच्या अग्रवाल रुग्णालयात दाखल केले. या प्रकरणी भांडुप पोलिसांनी मद्यपीविरुद्ध गुन्हा
दाखल करून अधिक तपास सुरू केला आहे.
अशी माणसे कमी पाहायला मिळतात
बघ्यांच्या गर्दीत एका महिलेने मदतीसाठी पुढाकार घेतला. तिच्या धाडसाचे कौतुक करावे तितके कमीच आहे. त्यांचे नावही समजू शकले नाही. अशी दुसऱ्यांसाठी धावून येणारी माणसे फार कमी पाहायला मिळतात, असे मोकाशी यांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले.
ती महिला कोण?
सध्या या महिलेच्या धाडसाची सर्वत्र चर्चा आहे. मात्र, ती महिला कोण होती, कुठे राहणारी आहे, हे
मात्र अद्याप समजू शकलेले नाही.