चारित्र्याच्या संशयावरुन पत्नीच्या खून करणा-या पतीला जन्मठेप
By Admin | Published: August 26, 2016 09:18 PM2016-08-26T21:18:45+5:302016-08-26T21:18:45+5:30
सासुरवाडीकडून पैसे मिळाले नसल्याच्या रागातून तसेच चारित्र्याच्या संशयावरुन पत्नीच्या डोक्यात दगड घालून खून करणा-या तिच्या पतीला अतिरिक्त जिल्हा
>ऑनलाइन लोकमत
औरंगाबाद, दि. 26 - सासुरवाडीकडून पैसे मिळाले नसल्याच्या रागातून तसेच चारित्र्याच्या संशयावरुन पत्नीच्या डोक्यात दगड घालून खून करणा-या तिच्या पतीला अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायाधीश यु. एल. तेलगावकर यांनी जन्मठेपेची शिक्षा ठोठावली.
या प्रकरणी वन खात्याचा सुरक्षारक्षक काळू धर्मा राठोड (रा. तिसगाव, ता. औरंगाबाद) यांनी फिर्याद दिली होती. त्यानुसार, ८ जुलै २००९ रोजी चिंचोली शिवारातील सर्व्हे क्रमांक ३८ मधील जंगल परिसरात झाडे लावण्यासाठी खड्डे करताना एका ३० ते ३५ वर्षीय महिलेचा कुजलेला मृतदेह आढळून आला. याची माहिती फियार्दीने खुलताबाद पोलिसांना दिल्यानंतर प्रारंभी अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली होती. त्याच ठिकाणी करण्यात आलेल्या शवविच्छेदनाच्या अहवालात डोक्यात दगड घालून खून करण्यात आल्याचे निष्पन्न झाल्यानंतर घटनास्थळावरून अडीच किलोंचा दगड जप्त करण्यात आला आणि खुलताबाद पोलिस ठाण्यात कलम ३०२, २०१ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला. या प्रकरणाची माहिती तपास करणारे पोलिस निरीक्षक डी. एम. येरूळे यांनी सर्व पोलिस ठाण्यांना पाठवली. दरम्यान, आपली बहीण गंगासागर मच्छिंद्र सूर्यवंशी (रा. गडदगव्हाण, ता. चिंतूर, जि. परभणी) ही बेपत्ता असल्याची तक्रार सूर्यकांता जमधडे (रा. पिंपरीलिंग, ता. सेनगाव, जि. हिंगोली) यांनी पोलिस ठाण्यात दिली होती. गावातील लोकांनी गंगासागर गायब झाल्याचे कळविल्यानंतर सूर्यकांता यांनी बहिणीच्या गडदगव्हाण येथील घरी धाव घेतली होती. मात्र बहीण आणि तिचा पती मच्छिंद्र उकंडी सूर्यवंशी (३५) हादेखील घरी नसल्याचे लक्षात आल्यानंतर सूर्यकांता यांनी ‘मिसिंग’ची तक्रार दिली होती. आरोपी त्याच्या मामाच्या शेतात असल्याची खबर मिळाल्यानंतर, पोलिसांनी आरोपीच्या मामाला नोटीस देऊन आरोपीला हजर करण्याचे आदेश दिले. त्यानंतर आरोपी ठाण्यात हजर होऊन चौकशीदरम्यान त्याने आपल्या पत्नीचा खून केल्याची कबुली दिली. तसेच मृत गंगासागर हिचे कपडे, दागिने तिची बहिणी सूर्यकांता हिने ओळखले. या प्रकरणी सुनावणीदरम्यान, सहाय्यक सरकारी वकील बी. आर. लोया यांनी ११ साक्षीदारांचेजबाबनोंदविले यामध्ये मृताची बहीण, डॉक्टर, सोनार यांची साक्ष महत्वाची ठरली. आरोपीची कबुली तसेच सर्व परिस्थितीजन्य पुराव्यांच्या आधारे न्यायालयानेआरोपी पतीला कलम ३०२ अन्वये जन्मठेप व एक हजार रुपयांच्या दंडाची शिक्षा ठोठावली.
आरोपी व मृत गंगासागर यांचा विवाह १९९३ मध्ये झाला होता. त्यावेळी सासुरवाडीकडून २० हजार रुपये न मिळाल्याचा राग आरोपीच्या मनात होता. त्यावरुन आरोपीचे पत्नीच्या भावाशी भांडण झाले होते व आरोपी पत्नीला सतत त्रास देत होता. तसेच आरोपी नाशिकला कामाला गेला असता, तो पत्नीला बसस्थानकावरच सोडून परतला होता. त्यावेळी गावाकडील एकाने गंगासागर हिला पैसे देऊन माहेरी पाठवले होते. त्यानंतर गंगासागर चार वर्षे माहेरी राहात होती. मात्र आरोपीच्या भावाने समझोता घडून आणल्यानंतर व यापुढे कोणताही त्रास होणार नाही, असे आश्वासन दिल्यानंतर गंगासागरला आरोपीकडे पाठवण्यात आले होते. मात्र चारित्र्याच्या संशयावरून आरोपी पत्नीचा त्रास देत होता व दुसº्या लग्नाच्या हेतुने त्याने पत्नीचा खून केल्याचे तपासात स्पष्ट झाले.