कचऱ्यातून वेचले तिने ज्ञानाचे कण!
By admin | Published: June 13, 2016 05:13 AM2016-06-13T05:13:03+5:302016-06-13T05:13:03+5:30
कोपर येथील राहुलनगर झोपडपट्टीत राहणारी कचरावेचक मुलगी नीशा सरोदेने दहावीच्या परीक्षेत ८४ टक्के गुण मिळवले आहेत.
डोंबिवली : कोपर येथील राहुलनगर झोपडपट्टीत राहणारी कचरावेचक मुलगी नीशा सरोदेने दहावीच्या परीक्षेत ८४ टक्के गुण मिळवले आहेत. नीशाने प्रतिकूल परिस्थितीवर मात करून कचऱ्यातून ज्ञानाचे कण वेचल्याने तिच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. तिला कॉम्प्युटर इंजिनीअरचे शिक्षण घेण्याची इच्छा आहे.
घरची परिस्थिती हलाखीची असून कचरा वेचूनच कुटुंब कसेबसे चालवण्याचा संघर्ष राहुलनगर झोपडपट्टीत राहणाऱ्या मीना सरोदेकरीत आहे. त्यांच्या पतीने त्यांना सोडून गाव गाठले. त्यानंतर, मीना यांनी त्यांच्या चार मुलींना घेऊन जीवन जगण्यास सुरुवात केली.
मुलींना सांभाळण्यासाठी त्यांनी कचरावेचकाचे काम सुरू केले. त्यांना अलका, शिल्पा, कल्पना आणि नीशा या चार मुली आहेत. त्यापैकी अलकाचा विवाह झाला आहे. शिल्पाने सहावीपर्यंत शिक्षण घेतले आहे. कल्पना नववीपर्यंत शिकली आहे. कल्पना व शिल्पा या घरची कामे उरकतात. नीशा ही सरोबा म्हात्रे विद्यालयात शाळेत जात होती. शाळा शिकत असताना ती आईला कचरा वेचण्यासाठी मदत करत होती. आईने गोळा करून आणलेल्या प्लास्टिक पिशव्या, बाटल्या, लोखंड, भंगार वेगळे करत होती. काही वेळा सुटीच्या दिवशी आईबरोबर ती कचरा गोळा करण्यासाठी घराबाहेर जात होती. पोेटासाठी घराला हातभार लावण्यास नीशाला कधी संकोच वाटला नाही. हे काम आनंदाने करत असतानाच खूप शिक्षण घेऊन तिला मोठे व्हायचे आहे. मात्र, कोणत्या कॉलेजमध्ये प्रवेश मिळणार, याविषयी नीशाच्या मनात साशंकता आहे.
राहुलनगर झोपडपट्टीतील १० बाय १०च्या खोलीत दोन बहिणी व आईसह राहणाऱ्या नीशाने दहावीचा अभ्यास केला. क्लास लावण्याची ऐपत नसताना सगळा अभ्यास शाळा व घरातच केला. मराठीत १०० पैकी ९१ गुण मिळाले आहेत. तिला शिकण्यासाठी तिची आई मीना व तिचे लांबच्या नात्यातील मामा माणिक उगले हे तिला प्रोत्साहन देत आले. तिला शिक्षकांचेही मार्गदर्शन मिळाले. (प्रतिनिधी)
>घराला हातभार लावण्यात पुढाकार
नीशाने सगळा अभ्यास शाळा व घरातंच केला. आर्थिक परिस्थितीमुळे ‘क्साल’ लावणे शक्य नसल्याने प्रतिकूल परिस्थितून मिळवलेल्या यशामुळे तीचे कौतुक होत आहे.
आईने वेचलेल्या प्लास्टिक पिशव्या, बाटल्या, भंगार ती वेगळे करत होती. काही वेळा सुटीच्या दिवशी आईबरोबर ती कचरा गोळा करण्यासाठी घराबाहेर जात होती. पोेटासाठी घराला हातभार लावण्यास नीशाला कधी संकोच वाटला नाही.