फुललेला संसार सोडून तिने धरला रिझवानचा हात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 26, 2016 11:00 PM2016-07-26T23:00:52+5:302016-07-26T23:00:52+5:30
बालपणीच वडिलांचे छत्र हरपले. एका ख्रिश्चन धर्मगुरुने वयाच्या दहाव्या वर्षापासून सांभाळ केला
जितेंद्र कालेकर/ऑनलाइन लोकमत
ठाणे, दि. 26 - बालपणीच वडिलांचे छत्र हरपले. एका ख्रिश्चन धर्मगुरुने वयाच्या दहाव्या वर्षांपासून सांभाळ केला. कालांतराने हिंदू उच्च शिक्षिताबरोबर तिचा विवाह झाला. पण आंतरधर्मीय विवाह केल्यामुळे जन्नत मिळणार नाही. अल्लाहला काय तोंड दाखविणार, अशी काहींनी तिला विचारणा केली. नंतर आयआरएफ (इस्लामिक रिसर्च फाऊंडेशन)मध्ये रिझवान खानच्या संपर्कात आल्यानंतर त्याच्याशी तिचा विवाह झाला. इसिसच्या कारवायांमुळे त्यालाही पोलिसांनी अटक केल्यामुळे रुकय्या खान (४५) मात्र पुन्हा अनाथ झाली.
मुंबई दहशतवादविरोधी पथक आणि केरळ पोलिसांनी संयुक्तरीत्या कल्याणमधून अटक केलेला डॉ. झाकीर नाईकचा हस्तक रिझवान खान लोकांची लग्न जमवून देण्यात विशेष आघाडीवर असायचा. त्यातही एखादा मुलगा किंवा मुलगी मुस्लीम असल्यास आणि त्यांचा प्रियकर जर हिंदू, ख्रिश्चन, जैन किंवा बौद्ध असल्यास त्यांना धर्मांतर करण्यास तो आधी भाग पाडत असे. अशा शेकडो प्रेमीयुगुलांचे त्याने धर्मांतर केले. मुंबईच्या आयआरएफमध्ये आपल्या तीन मुलांसह आलेल्या रुकय्याची कहाणी थोडी वेगळी आहे.
मूळ केरळची असलेल्या रुकय्याच्या वडिलांचा लहानपणीच मृत्यू झाला. त्यामुळे आईनेच तिचा सांभाळ केला. पुढे वयाच्या दहाव्या वर्षांपासून खिश्चन मिशनऱ्यांनी तिचे संगोपन आणि शिक्षणही केले. या मिशनऱ्यांकडे असतानाच एका उच्च शिक्षित मोठ्या पगाराच्या हिंदू अधिकाऱ्याने तिला लग्नाची मागणी घातली. (एका अनाथ मुलीशी लग्न करण्याची इच्छा असल्यामुळे त्याने या अनाथलायातून तिची निवड केली.) त्यात त्यांना दोन मुली झाल्या. तिला काही समाजबांधवांनी याबाबत जाब विचारले. दुसऱ्या धर्माच्या मुलाबरोबर तू निकाह केला आहेस. मग अल्लाहला काय जबाब देणार? याचा गंभीरतेने विचार करुन तिने पतीपुढे घटस्फोट किंवा मुस्लीम धर्मात धर्मांतर करावे, असे दोनच पर्याय ठेवले. आपल्या पत्नीच्या हट्टापुढे हतबल झाल्यामुळे त्याने धर्मांतर करण्याचा पर्याय निवडला. त्यानंतर त्यांना मुलगा झाला. त्याचे नाव बद्रीनाथ ठेवायचे, असा त्याचा आग्रह. तर बद्रीनाथ ऐवजी बिलाल ठेवण्यासाठी तिने पुन्हा हट्ट केला. हा वाद टोकाला गेल्यामुळे तिने त्याचे घर सोडून तिन्ही मुलांसह मुंबईच्या ‘आयआरएफ’ या संस्थेत २०१४ मध्ये आश्रय घेतला.
‘आयआरएफ’ मध्ये अनाथलयात येणाऱ्यांची जबाबदारी रिझवानकडे होती. रिझवानने तिची गोरेगावच्या मर्सी मिशन येथे वास्तव्याची व्यवस्था केली. नंतर तिला कल्याणच्या ‘आसरा फाऊंडेशन’ वसतीगृहात ठेवले. तिथे तीन ते चार महिने राल्यिानंतर रिझवान आणि तिच्यात चांगलीच जवळीक वाढली. रिझवान एक चांगला समाज कार्यकर्ता तसेच मुस्लीम असल्यामुळे त्याच्याशी निकाह करण्याचा तिने विचार केला आणि सप्टेंबर २०१४ मध्ये ते रेशीमबंधात अडकले. आता आपल्याकडे कोणाला बोट दाखवायलाही जागा नाही, अशी तिची भावना झाली. पण त्याच काळात लोकांचे विवाह जमविणारा रिझवान इसिसमधील अर्शिद कुरेशीच्याही संपर्कात होता. त्याने अनेकांचे धर्मांतर करण्याबरोबरच त्यांना इसिसमध्ये ढकलण्याचेही काम केले. यातच तो महाराष्ट्र एटीएस आणि केरळ पोलिसांच्या कारवाईत पकडला गेला. त्यामुळे १२ आणि १० वर्षांच्या दोन मुली तसेच सहा वर्षांच्या एका मुलासह रुकय्या मात्र पुन्हा अनाथ झाली. तपासात समोर आलेल्या या विचित्र कथनकामुळे केरळ आणि मुंबई पोलीसही अवाक् झाले.