‘ती’ मात्र घेतेय स्वच्छतागृहांचा शोध
By admin | Published: January 18, 2017 01:35 AM2017-01-18T01:35:53+5:302017-01-18T01:35:53+5:30
भिगवण परिसरात महिलांनी स्वच्छतागृहांचा शोध घेऊ पाहिल्यास त्यांना एकही स्वच्छतागृह नसल्याचे दिसून येते.
भिगवण : भिगवण परिसरात महिलांनी स्वच्छतागृहांचा शोध घेऊ पाहिल्यास त्यांना एकही स्वच्छतागृह नसल्याचे दिसून येते. त्यामुळे भिगवण गावात महिलांचे हाल होत आहेत.
२० हजारांच्या पर्यंत असणाऱ्या आणि भिगवणसारख्या गावात महिलावर्गासाठी एकही स्वच्छतागृह नसल्याने महिलांना खूप हाल सहन करावे लागत आहेत.
भिगवण ११ हजार अधिकृत आणि २० हजारच्या पुढे प्रत्यक्षात लोकसंख्या असणारे गाव; तर व्यापारी आणि शिक्षणासाठी रोज गावाला भेट देणाऱ्या नागरिकांची संख्या हजाराच्यावर आहे. उजनीच्या किनारी वसलेलं राहणीमान शहरीकरणाकडे झुकणारे असले तरी खेड्यात गणले जाणारे गाव. पुणे-सोलापूर महामार्गाच्या कडेला वसलेलं गाव असल्याकारणाने या ठिकाणी मोठी बाजारपेठ विकसित झालेली आहे.
दळणवळणची सोय चांगली असल्याने परिसरातील नागरिक खरेदीसाठी याच गावाला प्राधान्य देताना दिसून येतात. आता खरेदी करायची म्हटले, की स्त्रियांना सोबत घेतलेच जाते. परंतु भिगवणसारख्या बाजारपेठेत महिलांसाठी स्वतंत्र स्वच्छतागृहाची वानवा आहे. दिवसभर खरेदी करण्यासाठी आलेल्या ‘ति’ला कुचंबणा सहन करीत खरेदी करावी लागते, तर यातूनच शारीरिक व्याधींचा सामना करावा लागतो.सरकारने तिला ५० टक्के आरक्षण देऊन समाजात पदे दिली; परंतु तिला लागणाऱ्या रोजच्या गरजांसाठी मात्र कोणतीही साधने उपलब्ध करून दिली नाहीत. तसे पाहिले तर भिगवणवर सरपंच महिला असतानासुद्धा या बाबींकडे लक्ष दिले जात नसल्याचेच दिसून येत आहे.
मंदिराचे सभागृह, समाजमंदिरे, शादीखाने, शाळांची कुंपणे करण्यास निधी देणाऱ्या राजकीय पुढाऱ्यांना महिलांसाठी आवश्यक असणाऱ्या स्वच्छतागृहांना निधी आणि जागा उपलब्ध करणे अवघड आहे का, असा सवाल मात्र ती काय करते, असे वाटणाऱ्या समाजाला पडत नाही का. रोटरी क्लब, नेचर फाऊंडेशन अशा सामाजिक संघटना हे कार्य करताना दिसत असले तरी शासन गांभीर्याने याकडे पाहत नाही तोपर्यंत समस्त ती कुचंबणा सहन करणार हे नक्की.
>चाळीस वाड्या-वस्त्या आणि चार तालुक्यांना जोडणाऱ्या भिगवण गावात पुरुषांसाठीच स्वच्छतागृह नसल्याने महिला स्वच्छतागृहाची कल्पनाच न करणे योग्य. १०० च्या आसपास गाळे बांधून व्यवसायासाठी भाड्याने देऊन करोडो रुपयांचे डिपॉझिट घेऊन लाखो रुपयांचे भाडे कमाविणाऱ्या इंदापूर बाजार समितीला एक सुलभ शौचालय बांधणे अशक्य आहे का? भिगवण, तक्रारवाडी, मदनवाडी, कुंभारगाव या सर्व गावच्या सरपंच महिला असून ५० टक्के सदस्य असून ग्रामपंचायत स्वत:साठीसुद्धा स्वतंत्र स्वच्छतागृहाची निर्मिती करताना दिसून येत नाही.