संसाराचा गाडा हाकत ‘ती’ने मिळवली डॉक्टरेट
By admin | Published: July 3, 2017 02:25 AM2017-07-03T02:25:01+5:302017-07-03T02:25:01+5:30
कमी वयात लग्न होऊन नंतर ‘चूल अन् मूल’ या चक्रव्यूहात अडकलेल्या स्त्रीचे शिक्षणाविषयीचे स्वप्न तसे स्वप्नच राहते. येथील मंदाकिनी भालेकर
लोकमत न्यूज नेटवर्क
शिरूर : कमी वयात लग्न होऊन नंतर ‘चूल अन् मूल’ या चक्रव्यूहात अडकलेल्या स्त्रीचे शिक्षणाविषयीचे स्वप्न तसे स्वप्नच राहते. येथील मंदाकिनी भालेकर या महिलेने या चक्रव्यूहात न अडकता आपली कौटुंबिक जबाबदारी पार पाडत वयाच्या ५४ व्या वर्षी पीएच.डी. पूर्ण केली. विशेष म्हणजे, लग्न झाले तेव्हा ८ वी पासपर्यंतचेच शिक्षण
झालेले होते.
आपल्या देशात आजही स्त्री-पुरुष समानतेविषयी सहानुभूतीपूर्वक चर्चा होते. मात्र, अलीकडच्या काळात स्त्रीनेच आपले अस्तित्व सिद्ध केले असून, त्यांचे एक स्थान निर्माण केल्याचे आपण पाहतो. मात्र, याची टक्केवारी कमी आहे. आजही मुलीचे शिक्षण पूर्ण न करताच तिचे हात पिवळे करण्याची घाई तिच्या बापाला असते. याचे प्रमाण मात्र जास्त आहे. एकदाच लग्न झाले की, शिक्षणाचे स्वप्न अपूर्ण राहते. अर्थात, लग्नानंतरही सासरची मंडळी शिक्षणाला प्रोत्साहन देणारे अनेक सज्जन समाजात आहेत.
भालेकर यांचे शिक्षण आठवीपर्यंत झाल्यानंतर, त्यांचे लग्न करून देण्यात आले. शिक्षणाची प्रचंड आवड असणाऱ्या भालेकर यांची मात्र यामुळे कोंडी झाली. पुढे मुले झाली. कुटुंबाची जबाबदारी वाढली. मुले शाळेत जाऊ लागली. भालेकर यांच्या मनातील शिक्षण घेण्याचे वेड मात्र कमी झाले नाही.
१९९७ मध्ये भालेकर यांनी पुढील शिक्षण घेण्याविषयी पतीशी चर्चा केली. त्यांच्या प्रोत्साहनामुळे १९९७ मध्ये त्यांनी मुक्त विद्यापीठाची पूर्व परीक्षा देऊन बी.ए.ला प्रवेश घेतला. बी.ए. पूर्ण करून पुणे विद्यापीठात एम.ए.ला प्रवेश घेतला. तेव्हा कुटुंब संभाळून एम.ए. करणे सोपे नाही असे ही अनेकांनी हिणवले. मात्र, भालेकर यांनी जिद्दीने एम.ए. पूर्ण केले. २००२ ला एम.ए. केल्यानंतर, चार वर्षांच्या गॅपने २००६ ला त्यांनी एम.फिलला प्रवेश घेतला. २००८ ला ते पूर्ण केले. यानंतर २०११-१२ ला हौशी रंगभूमीवरील मराठी नाटक ‘स्वरूप आणि परंपरा एक शोध’ हा विषय प्रबंधासाठी घेऊन पीएच.डी. ला प्रवेश घेतला. अतिशय दुलर्क्षित असलेल्या या विषयामुळे प्रबंध पूर्ण करताना फिल्ड वर्कवर अनेक अडचणींना सामोरे जावे लागल्याचे भालेकर यांनी सांगितले. विवाह झाल्याने अथवा इतर कारणाने शिक्षण अर्धवट सोडण्याची वेळ आलेल्या महिलांची प्रेरणा बनून काम करीत राहणार असल्याचेही त्यांनी सांगितले.
भालेकर यांनी स्वत:चे शिक्षणाचे स्वप्न पूर्ण केले. मात्र, स्वत:च्या मुलांनाही उच्चशिक्षित केले. सचिन भालेकर हे त्यांचे मोठे पुत्र असून, त्यांनी बी.कॉम. व एम.बी.ए.चे शिक्षण पूर्ण केले आहे. धाकटे पुत्र डॉ. स्वप्निल भालेकर हे देशातील नामांकित नेत्रतज्ज्ञांपैकी एक आहेत. पीएच.डी. करताना येथील चां. ता. बोरा महाविद्यालय हे संशोधन केंद्र होते. भालेकर यांना
डॉ. बाळकृष्ण लळित यांचे
मार्गदर्शन लाभले.
१९९७ : मुक्त विद्यापीठातून बी. ए. केले पूर्ण.
२००२ : एम. ए. केल्यानंतर, चार वर्षांचा गॅप.
२००६ : एम. फिल.ला प्रवेश घेतला.
२०११ : हौशी रंगभूमीवरील मराठी नाटक ‘स्वरूप आणि परंपरा एक शोध’ हा विषय प्रबंधासाठी घेऊन पीएच. डी.ला प्रवेश घेतला.