कोकण रेल्वे अपघाताबाबत "ती" अफवाच !
By Admin | Published: May 9, 2017 08:49 PM2017-05-09T20:49:48+5:302017-05-09T20:49:48+5:30
कोकण रेल्वे मार्गावरून धावणाऱ्या दिवा-सावंतवाडी रेल्वेला भीषण अपघात झाल्याची पोस्ट गेल्या दोन दिवसांपासून सोशल मीडियावर व्हायरल झाली
ऑनलाइन लोकमत
रत्नागिरी/सिंधुदुर्ग, दि. 9 - कोकण रेल्वे मार्गावरून धावणाऱ्या दिवा-सावंतवाडी रेल्वेला भीषण अपघात झाल्याची पोस्ट गेल्या दोन दिवसांपासून सोशल मीडियावर व्हायरल झाली आहे. त्यामुळे प्रवाशांमध्ये घबराट निर्माण झाली आहे. मात्र अपघाताबाबतची ही पोस्ट धादांत खोटी आहे. अशी अफवा पसरवून लोकांची दिशाभूल करणे हा गुन्हा असून, अफवा पसरवणारी पोस्ट सर्वप्रथम टाकणाऱ्याचा शोध घेऊन त्याच्यावर कडक कारवाई करावी, अशी मागणी केली जात आहे. या प्रकारच्या अफवा कोणीही पसरवू नये, असे आवाहन कोकण रेल्वेमार्फत करण्यात आले आहे.
गेल्या दोन वर्षांच्या काळात सोशल मीडिया अधिक कार्यरत झाले आहे. त्यामुळे कोणीही या माध्यमातून आपले विचार, बातम्या पोस्ट करून त्या सर्वदूर पोहोचवू शकतात. परंतु या माध्यमाचा गैरफायदाही घेतला जात आहे. या माध्यमांतून पोस्ट टाकून काही विघ्नसंतोोषी लोक अफवा पसरवित असून, त्यामुळे समाजात संभ्रमाचे, संशयाचे वातावरण निर्माण केले जात आहे. कोकण रेल्वे मार्गावरून धावणाऱ्या दिवा-सावंतवाडी रेल्वे गाडीला नागोठणेजवळ निगडी येथे भीषण अपघात झाल्याची खोटी बातमीही अशीच अफवा ठरली आहे.
दोन वर्षांपूर्वी नागोठणेजवळ झालेल्या अपघाताची बातमी आता अपघात झाला अशा स्वरूपात सोशल मीडियावर गेल्या दोन दिवसात फॉर्वर्ड केली जात आहे. त्यावेळचे अपघाताचे फोटोही पोस्ट करण्यात आले आहेत आणि आताच अपघात झाला, अशी अफवा पसरवण्यात आली. त्यामुळे या गाडीने प्रवास करणाऱ्या प्रवाशांच्या कुटुंबीयांची नाहक घालमेल झाली. अनेकांनी रेल्वे आणि अन्य ठिकाणी फोन करून याबाबत खातरजमा करून घेतली. मात्र असे विघातक कृत्य करणाऱ्यांना शोधून त्यांना चांगली अद्दल घडवली पाहिजे, अशी लोकांची मागणी असून आता कोकण रेल्वे याबाबत काही कृती करणार काय, अफवा पसरवणाऱ्याविरोधात गुन्हा दाखल होणार काय आणि त्याच्यापर्यंत पोहोचून त्याला शिक्षा होणार की नाही, असे सवाल केले जात आहेत.