‘ती’ विद्यार्थिनी आत्मसमर्पणाच्या वाटेवर...
By admin | Published: December 20, 2015 01:43 AM2015-12-20T01:43:50+5:302015-12-20T01:43:50+5:30
भामरागड तालुक्यातील शासकीय आश्रमशाळेतून गेल्या वर्षी ३ विद्यार्थिनी पळून जाऊन नक्षल दलममध्ये सामील झाल्या होत्या. त्यातील एक विद्यार्थिनी नक्षलवाद्यांच्या वागणुकीला
गडचिरोली : भामरागड तालुक्यातील शासकीय आश्रमशाळेतून गेल्या वर्षी ३ विद्यार्थिनी पळून जाऊन नक्षल दलममध्ये सामील झाल्या होत्या. त्यातील एक विद्यार्थिनी नक्षलवाद्यांच्या वागणुकीला कंटाळून लवकरच आत्मसमर्पण करणार आहे. मात्र तिच्याबरोबरच्या दोन मुली अद्याप नक्षली चळवळीतच आहेत.
भामरागड तालुक्यातील लाहेरी आश्रमशाळेचे ६ विद्यार्थी गेल्या वर्षी ३१ डिसेंबरला शाळेतून बेपत्ता झाले होते. त्यानंतर तिघांचा शोध लागला. मात्र ३ मुली सापडल्या नव्हत्या. साधारणत: तीन महिन्यांपूर्वी माओवाद्यांच्या संघटनेकडून एक पत्रक जारी करण्यात आले. त्यात या ३ विद्यार्थिनी नक्षली चळवळीत सामील झाल्याचा दावा करण्यात आला होता. त्यातीलच सातवीत शिकणारी १५वर्षीय सविता (नाव बदलले आहे) ही छत्तीसगड राज्यात गेल्या वर्षभरापासून दलममध्ये काम करीत होती. दलममधील कार्यपद्धतीला कंटाळून व नक्षल्यांच्या अत्याचारामुळे ती तेथून बाहेर पडली.
तिला भामरागड पोलीस पथकातील हवालदार संतोष मंथनवार, त्यांचे सहकारी व जिल्हा पोलीस प्रशासनाच्या अधिकाऱ्यांनी जंगलातून अभियानादरम्यान ताब्यात घेतल्याचे कळते. त्यानंतर घाबरलेल्या या मुलीने पोलिसांना आपली आपबिती सांगितली. भामरागडचे उपविभागीय पोलीस अधिकारी संदीप गावित यांनी या तिला धीर दिला आणि वरिष्ठ अधिकाऱ्यांशी चर्चा करून तिच्या आत्मसमर्पणाचा मार्ग मोकळा केला.
दोन दिवसांपूर्वी ही १५वर्षीय मुलगी दलममधून बाहेर पडून जंगलात फिरत असल्याचे पोलिसांना दिसले. तिच्या इच्छेनुसार आत्मसमर्पणाची प्रक्रिया पोलीस प्रशासन स्तरावर सुरू आहे.
- संदीप गावित, उपविभागीय पोलीस अधिकारी भामरागड