‘ती’ने मूत्रपिंड घेतले आणि यकृत दिले

By admin | Published: January 18, 2017 01:28 AM2017-01-18T01:28:33+5:302017-01-18T01:28:33+5:30

दोन वर्षांपूर्वी मूत्रपिंडाचे प्रत्यारोपण झालेल्या एका महिलेचे यकृत दुसऱ्या एका रुग्णाला देण्यात आले.

She took kidney and gave liver | ‘ती’ने मूत्रपिंड घेतले आणि यकृत दिले

‘ती’ने मूत्रपिंड घेतले आणि यकृत दिले

Next


पुणे : दोन वर्षांपूर्वी मूत्रपिंडाचे प्रत्यारोपण झालेल्या एका महिलेचे यकृत दुसऱ्या एका रुग्णाला देण्यात आले. मूत्रपिंड प्रत्यारोपणानंतर ही महिला नियमित औषधांवर होती. ही औषधे इम्यूनोसप्रेसिव्ह प्रकारची आणि महिलेच्या यकृतावर परिणाम करू शकतील अशी होती. असे असूनही तिचे यकृत दुसऱ्या रुग्णाला देण्यायोग्य असल्याने हे प्रत्यारोपण करण्यात आल्याचे ही शस्त्रक्रिया करणाऱ्या डॉक्टरांनी सांगितले.
डेक्कनवरील सह्याद्री रुग्णालयात हे यकृत प्रत्यारोपण करण्यात आले. ४२ वर्षांच्या या महिलेवर २०१५मध्ये मूत्रपिंड प्रत्यारोपण करण्यात आले
होते. तिच्या आईने तिला मूत्रपिंड देऊ केले होते. त्या शस्त्रक्रियेनंतर या महिलेची प्रकृती चांगली होती.
परंतु मधुमेह व उच्च रक्तदाब यांमुळे सदर रुग्ण महिलेच्या मेंदूत रक्तस्राव झाला आणि काही दिवसांपूर्वी तिला रुग्णालयात दाखल व्हावे लागले. १ जानेवारी २०१७ रोजी तिला ब्रेन डेड घोषित करण्यात आले. त्यानंतर या महिलेचे यकृत ५४ वर्षांच्या एका पुरुष रुग्णास देण्यात आले. या रुग्णाला क्रॉनिक लिव्हर सिऱ्हॉसिस हा आजार होता.
डॉ. बिपीन विभूते म्हणाले, अवयवदाता असलेली महिला काही औषधे खात असल्याने त्याचा तिच्या इतर अवयवांवर व यकृतावरही परिणाम झाला असण्याची शक्यता होती. परंतु सर्व चाचण्या केल्यावर हा परिणाम मर्यादेत असून यकृत वापरण्याजोगे असल्याचे लक्षात आले. त्यामुळे एका रुग्णाला जगण्याची संधी मिळाली आहे. तसेच या यकृतरोपण झालेल्या रुग्णाची स्थिती उत्तम आहे.
याबरोबरच एकदा प्रत्यारोपित झालेल्या मूत्रपिंडाचे पुन्हा दुसऱ्या रुग्णावर प्रत्यारोपण करता येईल का, असेही संशोधन सुरू असून, तसे झाल्यास वैद्यकीय क्षेत्रात आणखी क्रांती घडू शकेल, असेही डॉ. विभूते यांनी सांगितले.
(प्रतिनिधी)
>वैद्यकीय पथकाने हे प्रत्यारोपण केले. आपल्याकडे प्रत्यारोपणासाठी मोठी प्रतीक्षा यादी असून, अवयवांची गरज व पुरवठा
यात मोठी तफावत आहे.
ही परिस्थिती बदलण्यासाठी प्रत्येक संभाव्य अवयवदात्याचे अवयव प्रत्यारोपणासाठी घेता येतील का, याचा विचार व्हायला हवा.
-डॉ. बिपीन विभूते

Web Title: She took kidney and gave liver

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.