‘ती’ जमीन लाटण्याचा प्रयत्न
By admin | Published: July 23, 2016 04:07 AM2016-07-23T04:07:46+5:302016-07-23T04:07:46+5:30
देवस्थान व्यवस्थापन समितीच्या शाहूवाडी तालुक्यातील एक हजार एकर शेतजमिन लाटण्याचा प्रयत्न झाल्याचे ‘सीआयडी’ चौकशीत निष्पन्न झाले
एकनाथ पाटील,
कोल्हापूर- प.महाराष्ट्र देवस्थान व्यवस्थापन समितीच्या शाहूवाडी तालुक्यातील एक हजार एकर शेतजमिन लाटण्याचा प्रयत्न झाल्याचे ‘सीआयडी’ चौकशीत निष्पन्न झाले आहे. देवस्थान सचिव शुभांगी साठे यांच्यासह समिती सदस्यांच्या समितीच्या लेटरपॅडवर बोगस सह्या व शिक्के मारून मुंबईतील देव रिर्सोसेस इंडिया व एन. एस. कुंभार ट्रेडर्स अँड मिनरल्स पेठवडगाव या कंपन्यांच्या नावे ही जमीन चढविण्याचा प्रयत्न झाला आहे.
याप्रकरणी जुना राजवाडा पोलिस ठाण्यात या दोन कंपन्यांसह अज्ञात व्यक्तींच्या विरोधात गुन्हा दाखल झाला आहे. हा प्रकार समितीच्या शिवाजी पेठेतील कार्यालयात झाल्याने समितीचे अठरा सदस्य व कर्मचारी चौकशीच्या फेऱ्यात अडकले आहेत. या समितीवर पदे भूषविलेल्या काही सदस्यांनी चौकशी होऊ नये, यासाठी पोलिसांच्या भोवती ‘राजकीय फिल्डिंग’ लावली आहे. पश्चिम महाराष्ट्र देवस्थान व्यवस्थान समितीकडे पश्चिम महाराष्ट्रातील ३०६५ मंदिरे आणि त्यांच्या संपत्तीचे व्यवस्थापन आहे. समितीकडे २५ हजार एकर शेतजमीन आहे. या जमिनीचा गैरव्यवहार झाल्यासंबंधीची वृत्तमालिका ‘लोकमत’ मध्ये प्रसिध्द झाल्यावर घोटाळा प्रकरणाची गांभीर्याने दखल घेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सीआयडी चौकशीचे आदेश दिले होते.
>देवस्थान समितीची शाहूवाडी तालुक्यातील शेतजमिन लाटण्याचा प्रयत्न झाला आहे हे खरे आहे. आरोपींनी माझ्यासह समितीच्या सदस्यांच्या बोगस सह्या केल्या आहेत. आम्ही रितसर तक्रार दिली असून पोलिस तपास करीत आहेत.
- शुभांगी साठे, सचिव, देवस्थान समिती, कोल्हापूर