ब्लॅकमेलिंगला कंटाळून शीनाची हत्या
By admin | Published: August 29, 2015 02:02 AM2015-08-29T02:02:08+5:302015-08-29T13:30:38+5:30
राहुलसोबत लग्नाला नकार दिलास तर संजीव खन्नासोबत सुरू असलेल्या प्रेमप्रकरणाची माहिती पीटर मुखर्जींना देईन, अशी धमकी देत शीना बोरा आई इंद्राणीला अखेरच्या दिवसांमध्ये
मुंबई : राहुलसोबत लग्नाला नकार दिलास तर संजीव खन्नासोबत सुरू असलेल्या प्रेमप्रकरणाची माहिती पीटर मुखर्जींना देईन, अशी धमकी देत शीना बोरा आई इंद्राणीला अखेरच्या दिवसांमध्ये वरचेवर ब्लॅकमेल करीत होती. इंद्राणी या ब्लॅकमेलिंगला वैतागली होतीच, पण आपली गुपिते पती पीटरला समजली तर... याची तिला जास्त भीती होती. त्यामुळे इंद्राणीने खन्नाच्या सहकार्याने शीनाचा काटा काढला. शीनाच्या हत्येमागील हेतू हाच असावा, असा निष्कर्ष जवळपास पोलिसांनी काढल्याचे समजते.
खन्ना इंद्राणीचा दुसरा पती असून त्यांच्यात घटस्फोट झालेला आहे. त्यानंतरच इंद्राणीने पीटर मुखर्जींसोबत विवाह केला. मात्र गेल्या काही काळापासून इंद्राणी आणि खन्ना पुन्हा संपर्कात आले. त्यांच्यातील संबंधही वाढू लागले. याबाबत शीनाला बऱ्यापैकी माहिती होती. तसेच या दोघांचे संबंध आहेत, हे स्पष्ट करणारे काही भक्कम पुरावेही तिच्याकडे होते.
शीनाने ही माहिती मनात ठेवली होती. मात्र जेव्हा पीटर मुखर्जी यांच्या पहिल्या पत्नीचा मुलगा राहुलसोबतच्या प्रेमसंबंधांना
इंद्राणीने विरोध सुरू केला, तेव्हा
मात्र शीनाने खन्ना प्रकरण बाहेर काढले. राहुल आणि शीना ही सावत्र भावंडे आहेत, त्यामुळे इंद्राणीसोबत पीटर यांचाही त्यांच्या संबंधांना विरोध होता. मात्र राहुलसोबतचे संबंध तोड यासाठी इंद्राणी जास्त आग्रही होती. तेव्हा शीनाने राहुल आणि माझ्यात लुडबूड केलीस किंवा आमचे संबंध तोडण्याचा प्रयत्न केलास तर खन्ना प्रकरण पीटरना सांगेन, अशी धमकी इंद्राणीला दिली होती.
ही बाब पीटरना समजली असती तर कदाचित त्यांनी इंद्राणीसोबतचे संबंध तोडले असते. त्यामुळे इंद्राणीला मोठा आर्थिक फटका बसला असला. पीटर यांच्यामुळे इंद्राणी अत्यंत ऐशोरामात जगत होती. मात्र पीटरना ही बाब समजली असती तर इंद्राणी चहुबाजुंनी उध्वस्त झाली असती. या भीतीपोटीचे इंद्राणीने शीनाच्या हत्येचा कट आखला, असा अंदाज पोलिसांकडून वर्तविण्यात येत आहे.
हत्येमागील हा हेतू चाचपून पाहाण्यासाठी खन्ना याआधी कितीवेळा मुंबईत आला, कुठे थांबला, इंद्राणीला भेटला का, तिच्यासोबत शीनाच्या हत्येचा कट आखला का?याबाबत खार पोलीस कसून तपास करत आहेत. इंद्राणी आणि पीटर यांचे संबंध बिघडणे हे खन्नासाठीही धोकादायक होते, असे एका अधिकाऱ्याने लोकमतला सांगितले. दरम्यान, शीनाच्या हत्येनंतर साधा केबल आॅपरेटर असलेल्या खन्नाचे नशीब फळफळले.
पश्चिम बंगालच्या धरमतला शहरात त्याने १६५८ नावाचे पंचतारांकित हॉटेल सुरू केले. हावडयाला आलिशान फ्लॅट विकत घेतला. यासाठीची सर्व आर्थिक मदत इंद्राणीने केल्याचा पोलिसांचा संशय आहे. इतकेच नव्हे तर शीनाच्या हत्येत सहकार्य केल्याबददल तर इंद्राणीने खन्नाला ही मदत केली नाही ना, ही शक्यताही पोलीस चाचपून पाहात आहेत.
पेण पोलिसांच्या हलगर्जी कारभाराबाबत आश्चर्य
मुंबई - पेण, गादोदे गावात जळालेला मृतदेह मे २०१२मध्ये सापडला होता. मात्र त्यानंतर पेण पोलिसांनी अत्यंत हलगर्जीपणे मृतदेहाची विल्हेवाट लावली व पुरावे नष्ट केले, अशी माहिती पुढे येत आहे. पोलिसांनी हा मृतदेह सापडल्यानंतर अपघाती मृत्यू किंवा हत्येची नोंद घेऊन पुढील तपास सुरू करायला हवा होता. या मृतदेहाचे काही अवशेष चाचणीसाठी धाडून मृतदेह जतन करणे आवश्यक होते. मात्र पेण पोलिसांनी फक्त डायरी एन्ट्री करून या मृतदेहाचे अवशेष जेजे रुग्णालयाला चाचणीसाठी धाडले. पोलिसांनी त्यानंतर जेजे रुग्णालयाशी एकदाही संपर्क साधला नाही. काही दिवसांनी त्यांनी या मृतदेहाची विल्हेवाट लावली.
पोलीस शिपायाची खबर
बहुचर्चित आणि तितक्याच रहस्यमय ठरलेल्या शीना बोरा हत्याकांडाची माहिती मुंबई पोलीस दलातील एका शिपायाला प्रथम मिळाली. हा शिपाई बहुधा खार पोलीस ठाण्याचा असावा. त्याची ओळख सांगण्यास वरिष्ठ अधिकाऱ्यांनी नकार दिला. मात्र त्याने जी माहिती आणली त्यावर चौकशी व तपास केल्यानंतर शीना बोरा हत्याकांड उघड झाले, असे या अधिकाऱ्याने सांगितले.
खन्ना ३१ पर्यंत कोठडीत
शीना बोरा हत्याकांडातील प्रमुख
आरोपी आणि इंद्राणीचा दुसरा पती संजीव खन्ना याला आज वांद्रे दंडाधिकारी न्यायालयाने ३१ आॅगस्टपर्यंत पोलीस कोठडीत धाडले. ज्या कारमध्ये शीनाची हत्या झाली ती व हत्येत वापर झालेल्या हत्यारांसह साहित्य हस्तगत करणे बाकी आहे. या हत्याकांडात आणखी कोणाचा सहभाग आहे का, अन्य आरोपींसमोर संजीवची चौकशी करायची आहे, असा युक्तिवाद सरकारी वकील अॅड. लक्ष्मण राठोड यांनी केला. तर संजीव हे दोन दिवसांपासून कोठडीत असून, त्यांच्या आणखी कोठडीची आवश्यकता नाही, असा दावा त्यांचे वकील अॅड. श्रेयांश मिठारे यांनी केला. मात्र अतिरिक्त मुख्य महानगर दंडाधिकारी स.म. चंदगडे यांनी संजीवला ३१ आॅगस्टपर्यंम कोठडी सुनावली.
ते अवशेष खार पोलिसांकडे
खार पोलिसांनी केलेल्या विनंतीनुसार जेजे रूग्णालयाने तीन वर्षांपासून जतन केलेले अवशेष त्यांच्या स्वाधीन केले. खार पोलीस ते आता कलिना येथील न्यायवैद्यक प्रयोग शाळेत चाचणीसाठी धाडणार आहे. फॉरेन्सिक लॅबमधून टिशूच्या सहाय्याने डीएनए टेस्ट होऊ शकते, त्यामुळे ते कोणाचे आहेत हे कळण्याची शक्यता आहे, अशी माहिती डॉ. तात्याराव लहाने देतात.
टोल नाक्यांवरही तपास
वांद्रे-वरळी सागरी सेतू ते पेणमधील गोदादे गावादरम्यान लागणाऱ्या टोलनाक्यांना खार पोलिसांनी २४ व २५ एप्रिल दरम्यानचे सीसीटीव्ही चित्रण मागितले आहे. एका विशिष्ट तंत्रज्ञानाने तीन वर्षांपुर्वीचे चित्रण परत मिळवता येते, असे एका वरिष्ठ अधिकाऱ्याने लोकमतला सांगितले.
हिल टॉप हॉटेलमध्येही चौकशी
शीना हत्याकांडाआधी आरोपी संजीव खन्ना वरळीच्या हिल टॉप हॉटेलमध्ये थांबला होता. सूत्रांनुसार तो मुंबईत आल्यावर याच हॉटेलमध्ये थांबे. दरम्यान, तेथील व्यवस्थापकापासून कामगारापर्यंतच्या कर्मचाऱ्यांचे जबात पोलिसांनी नोंदविले आहेत.
इंद्राणीवर सुरू होते मानसोपचारतज्ञांचे इलाज
शहरातील एका प्रसिद्ध मानसोपचारतज्ञाकरवी इंद्राणी मुखर्जीवर गेल्या काही दिवसांपासून उपचार सुरू होते, अशी माहिती समोर आली आहे. अलिकडेच इंद्राणीची वरचेवर चिडचिड होत होती. त्यामुळे तिच्या स्वास्थ्यावर वाईट परिणाम होत होता. याबाबत संबंधीत मानसोपचारतज्ञाशी संपर्क साधला असता त्याने याबाबत कोणतीही माहिती देण्यास नकार दिला.
विशेष सरकारी वकील निकम
शीना बोरा हत्याकांडासाठी विशेष सरकारी वकील म्हणून उज्ज्वल निकम यांची नियुक्ती होऊ शकते. इंद्राणीकडून जेठमलानींसारखे दिग्गज वकील बाजू मांडण्याची शक्यता आहे. त्यांना प्रत्युत्तर देण्यासाठी सरकारी वकीलाची आवश्यकता असल्याचे एका अधिकाऱ्याने सांगितले.
आरोपींची स्वतंत्र चौकशी
आरोपी इंद्राणी, संजीव आणि श्याम यांना तीन वेगवेगळया गुप्त ठिकाणी ठेवण्यात आले असून त्यांची स्वतंत्रपणे चौकशी सुरू आहे. उद्या, शनिवारी या तीन्ही आरोपींना समोरासमोर ठेवून वरिष्ठ अधिकारी चौकशी करण्याची शक्यता आहे. दरम्यान, शुक्रवारी संध्याकाळी इंद्राणीचे पती पीटर मुखर्जी इंद्राणीच्या वकीलासोबत खार पोलीस ठाण्यात आले. वांद्रे न्यायालयाने इंद्राणीच्या भेटीची वकीलाला परवानगी दिली आहे.
२५ मे २०१२ रोजी रायगड पोलिसांनी जे.जे. रुग्णालयात हाडे, केस, दात आणि नखे तपासणीसाठी आणून दिली होती. एका अज्ञान व्यक्तीच्या अवयवांचे नमुने आहेत, असे आम्हाला सांगण्यात आले होते. पण, हे नमुने जळलेले होते. त्या भागांवरून त्या व्यक्तीचे वय, लिंग, इतर काही माहिती मिळते आहे का? याची तपासणी केली. पण, नमुने जळलेले असल्यामुळे कोणत्याही प्रकारची माहिती उपलब्ध होऊ शकली नाही. ‘नमुने जळलेले असल्यामुळे त्यांच्या तपासण्या करून कोणत्याही प्रकारची माहिती उपलब्ध होऊ शकली नाही. या नमुन्यांवरून कोणतेही निदान करता येणार नाही,’ असा अहवाल २८ डिसेंबर २०१३ रोजी जे.जे. रुग्णालयाने पोलिसांना सादर केला होता. पोलिसांनी कोणत्याही प्रकारची सूचना न दिल्यामुळे हे नमुने आम्ही रुग्णालयातच जतन करून ठेवले होते.
- डॉ. तात्याराव लहाने, अधिष्ठाता, जे.जे. रुग्णालय