संपत्तीच्या वादातून आणि हव्यासापोटीच शीनाची हत्या
By admin | Published: November 21, 2015 01:33 AM2015-11-21T01:33:28+5:302015-11-21T01:33:28+5:30
शीना आणि राहुल यांचा विवाह झाला तर पीटर आणि आपल्या हातातून वडिलोपार्जित संपत्ती जाईल, या भीतीने इंद्राणी मुखर्जीने शीनाच्या हत्येचा कट रचला आणि तो अंमलातही आणला.
मुंबई : शीना आणि राहुल यांचा विवाह झाला तर पीटर आणि आपल्या हातातून वडिलोपार्जित संपत्ती जाईल, या भीतीने इंद्राणी मुखर्जीने शीनाच्या हत्येचा कट रचला आणि तो अंमलातही आणला. संजीव खन्नाने सर्व संपत्ती त्याची मुलगी विधीला मिळावी, यासाठी तोदेखील इंद्राणीच्या कटात सामील झाला. एकंदरीत संपत्तीच्या वादातून आणि हव्यासापोटीच शीनाची हत्या करण्यात आल्याचे सीबीआयने गुरुवारी दंडाधिकाऱ्यांपुढे सादर केलेल्या आरोपपत्रात म्हटले आहे.
इंद्राणीचे तिचा दुसरा पती संजीव खन्नापासून झालेली मुलगी विधीवर विशेष प्रेम होते. शीना आणि राहुलने विवाह केला तर सगळी संपत्ती त्या दोघांची होईल, अशी भीती इंद्राणीला सतावत होती. त्या दोघांचे संबंध तोडण्यासाठी तिने शीना, मिखाईल आणि राहुलवर नेहमीच दबाव आणण्याचा प्रयत्न केला. मिखाईल आणि शीनाला प्रत्येकवेळी वडिलोपार्जित संपत्तीतून बेदखल करण्याची धमकीही दिली. तरी शीना राहुलबरोबर विवाह करण्याच्या इच्छेवर ठाम होती. तिने तसे ई-मेलद्वारे इंद्राणीला कळवलेही होते.
इंद्राणी काहीतरी कट रचत असल्याची कल्पना विधीला आली होती आणि तिने त्याबाबत इंद्राणीला एसएमएसद्वारे कळवलेही होते आणि शीनाला जपून राहण्याचा सल्लाही दिला होता. ‘आई काहीतरी भयंकर करणार आहे. कोणालातरी मार्गातून दूर करण्याविषयी ती बोलत होती. तू सावध राहा,’ असा एसएमएस विधीने शीनाला पाठवला होता.
आरोपपत्रानुसार, इंद्राणीने शीना आणि मिखाईलला ती त्यांची आई आहे, हे कोणालाही कळू न देण्याची पूर्ण खबरदारी घेण्यास सांगितले होते. हे गुपित फुटल्यास त्याचा व्यवसायावर परिणाम होईल आणि तिची समाजातील प्रतिमा खराब होईल, याची भीती तिला सतावत होती. हे गुपित न फोडण्यासाठी तिने शीना आणि मिखाईलला मुंबईत शिक्षणासाठी आणण्याचे व त्यांचे अन्य खर्च उचलण्याचे आश्वासन दिले होते. मुलांकडे काहीच पर्याय नसल्याने त्यांनी आईने ठेवलेला पर्याय मान्य केला.
शीना राहुलला पीटरच्या घरी भेटली. या दोघांच्या मैत्रीचे रूपांतर प्रेमात झाले आणि शीनाने २००८ मध्ये राहुलला इंद्राणी आपली बहीण नसून आई असल्याचे सांगितले. इंद्राणी या दोघांच्या प्रेमप्रकरणामुळे अस्वस्थ होती. तिने शीनाला गुहावटीला पाठवले आणि त्यानंतर पुढे दिल्लीला रवाना केले. दिल्लीला शीना आजारी पडल्याने इंद्राणीने शीनाचा आधीचा प्रियकर कौस्तुभ साइकिया याला तिची काळजी घेण्यासाठी पाठवले आणि तिथून तिला बंगळुरूला घेऊन जाण्यास सांगितले. मात्र त्यापूर्वीच राहुल दिल्लीला पोहचला. तसेच औषधाद्वारे शीनाला वेडे करण्याचे डोस दिले जात असल्याचे राहुलला समजले.
आईच्या वाढत्या कारवायांमुळे शीनाने पीटरला एक ई-मेलही पाठवला. ‘मला केवळ इंद्राणीमुळे त्रास होतोय आणि हे अत्यंत वैयक्तिक आहे. तुम्ही तिला समज द्या की, मला किंवा राहुलला शिवीगाळ करून समस्या सुटणार नाही,’ असे इंद्राणीने ई-मेलमध्ये लिहिले आहे.
आॅक्टोबर २०११ मध्ये शीना आणि राहुलने साखरपुडा केला. त्यानंतर शीना अत्यंत चिडली. तिने तिचा मुलगा आणि शीनाचा भाऊ मिखाईल याला एक ई-मेल पाठवला. ‘आम्ही आमचे इच्छापत्र बदलले आहे आणि तुला त्यातून वगळण्यात आले आहे. राहुलशी ठेवलेले संबंध आम्हाला नामंजूर आहेत, हे तुला यावरून कळेल,’ असे इंद्राणीने मेलमध्ये म्हटले आहे.
मिखाईलने हा मेल शीनाला फॉरवर्ड केला. त्यावर शीना अत्यंत दु:खी झाली आणि तिनेही इंद्राणीला एक मेल पाठवला. त्यात तिने इंद्राणीकडून मिळणाऱ्या वागणुकीबद्दल खंत व्यक्त केली. ‘मी राहुलबरोबर आनंदी आणि सुरक्षित आहे. पालकांसाठी ही अत्यंत महत्त्वाची गोष्ट नाही का? तुला ज्याने आनंद मिळाला ते तू केले आहेस. ते मिळण्यासाठी मी ही पात्र आहे. मग या नात्यामुळे तू नाराज का होतेस? तुझ्यातलेच काही गुण माझ्यात आहेत. मी माझा मार्ग शोधेन आणि सुखी राहीन,’ असे शीनाने आईला लिहिलेल्या मेलमध्ये म्हटले आहे.
शीनाचा काटा काढण्याचा निश्चय केलेल्या इंद्राणीने शीनाचा तिच्यावरून उडालेला विश्वास परत मिळवण्यासाठी तिला डिनरला बोलवले. झाले-गेले विसरून जा, असे म्हणत इंद्राणीने शीनाला डिनर करण्यासाठी घरी बोलावले. या भेटीनंतर शीनाचे इंद्राणीविषयीचे मत बदलले. तिला खरोखरच आपली आई बदलली असे वाटले. त्यामुळे शीना इंद्राणीवर विश्वास ठेवू लागली.
आरोपपत्रानुसार, इंद्राणीने तिच्या सचिवाला राय याचे स्काइप अकाउंट सुरू करून देण्यास सांगितले. तसेच रायला याचे प्रशिक्षणही देण्यास सांगितले. रायने मुखर्जीच्या सांगण्यावरून खोपोली आणि लोणावळा येथील जंगलांची पाहणी केली आणि पेट्रोलचा २० लिटर कॅन खरेदी केला. त्याचदिवशी इंद्राणीने शीनाला साखरपुड्याची भेट घेण्यासाठी आणि डिनर करण्यासाठी बोलावले.
इंद्राणीने काही केमिस्ट शॉप आणि वाईन शॉपही धुंडाळली. तर रायने पाण्याच्या बाटलीमध्ये गुंगीचे औषध मिसळले. त्यानंतर इंद्राणी आणि राय वांद्रे येथे गेले. शीनाची आणि इंद्राणीची भेट संध्याकाळी
६:४० वाजता झाली. इंद्राणीला शीनाला गुंगीचे औषध मिसळलेले पाणी पिण्यासाठी दिले. पाणी प्यायलानंतर शीनाला चक्कर आली आणि ती बेशुद्ध पडली. त्यानंतर इंद्राणी मिखाईलला भेटण्यासाठी वांद्रे येथे शीनाच्या फ्लॅटवर गेली. तेथे तिने मिखाईलला वाईन दिली.
मात्र खूप वाईन पिऊनही मिखाईला नशा चढली नाही, याचे इंद्राणीला आश्चर्य वाटले आणि ती काळजीतही पडली. त्या वेळी तिच्याबरोबर असलेल्या खन्नाने मिखाईलचा काटा नंतर काढू, दोन्ही मृतदेह दोन वेगवेगळ्या ठिकाणी नेणे अशक्य असल्याचे सांगितले. त्यामुळे इंद्राणीने तिथून काढता पाय घेत गाडी थेट पेणच्या दिशेने नेली. राय गाडी चालवत होता. त्याच्या बाजूला खन्ना बसला होता. तर शीना आणि इंद्राणी मागील सीटवर बसल्या होत्या. शीना पूर्णपणे बेशुद्ध झाली आहे याची खात्री करून घेतल्यानंतर इंद्राणी आणि खन्नाने तिचा गळा आवळला आणि या तिघांनीही तिचा मृतदेह जंगलात नेऊन जाळला. (प्रतिनिधी)