शीना बोरा हत्याकांड : संजीव खन्नाला ३१ ऑगस्टपर्यंत पोलिस कोठडी
By admin | Published: August 28, 2015 01:13 PM2015-08-28T13:13:13+5:302015-08-29T09:50:36+5:30
शीना बोरा हत्याप्रकरणी इंद्राणी मुखर्जीचा दुसरा पती संजीव खन्नाला कोर्टाने ३१ ऑगस्टपर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे. तर इंद्राणी मुखर्जींला चौकशीसाठी अज्ञातस्थळी नेण्यात आले आहे.
Next
>ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. २८ - शीना बोरा हत्याप्रकरणी मुंबईतील न्यायालयाने इंद्राणी मुखर्जीचा दुसरा पती संजीव खन्नाला कोर्टाने ३१ ऑगस्टपर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे. तर दुसरीकडे मुंबई पोलिसांचे पथक इंद्राणी मुखर्जीला घेऊन चौकशीसाठी अज्ञात स्थळी रवाना झाले आहे.
शीना बोरा हत्याप्रकरणाने राज्यभरात खळबळ माजली असून शुक्रवारी संध्याकाळपर्यंत या प्रकरणाचे गुढ उकलण्यात यश आलेले नाही. शुक्रवारी सकाळी या प्रकरणातील महत्त्वाचा साक्षीदार शीनाचा भाऊ मिखाईल दास मुंबईत दाखल झाला. खार पोलिस ठाण्यात त्याचा जबाब घेण्यात आला. मुंबई पोलिसांना मी सर्वतोपरी सहकार्य करण्यास तयार असून शीनाला न्याय मिळवून देणारच अशी प्रतिक्रिया मिखाईलने प्रसारमाध्यमांशी बोलताना दिली. दरम्यान, वांद्रे कोर्टाने पोलिस कोठडीत असलेल्या इंद्राणीची भेट घेण्याची परवानगी तिच्या वकिलांना दिली आहे.
मिखाईल हा शीनाचा सख्खा भाऊ असून इंद्राणी व सिद्धार्थ दास यांचा मुलगा आहे. शीना व मिखाईल ही इंद्राणी आपली भावंडे असल्याचे इंद्राणीने आजवर सर्वांना भासवले होते. लहानपणापासून इंद्राणीच्या आई-वडिलांनी या दोघांना सांभाळले. आजी-आजोबा आजारी असल्याने आपण मुंबईला जबाब नोंदविण्यासाठी येण्यास शक्य नसल्याचे मिखाईलने सांगितले होते. तसेच जीवाला धोका असल्यानचे सांगत त्याने एकट्याने येण्यास असमर्थता दर्शवली होती. त्यानंतर मुंबई पोलिसांचे पथक गुवाहाटीला जाऊन त्याला मुंबईत घेऊन आले असून मुंबईचे पोलिस आयुक्त राकेश मारिया स्वत: त्याची चौकशी करणार असल्याचे समजते.
दरम्यान ज्या ठिकाणी शीनाचा मृतदेह जाळण्यात आला त्या पेणच्या गागोदेतील ठिकाणाहून डीएनए चाचणीसाठी आवश्यक असलेले अवशेष हाती लागल्याची माहिती या हत्याकांडाच्या तपासाशी संलग्न असलेल्या एका वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्याने दिली. मुंबई पोलिसांचे एक पथक इंद्राणी मुखर्जीला घेऊन चौकशीसाठी अज्ञात स्थळी रवाना झाले आहे. मुंबई पोलिसांनी शीनाच्या नावाने तिच्या ऑफिसमध्ये मेल पाठवणा-या व्यक्तीलाही अटक केली आहे.