शीना बोरा हत्याकांड - रायगड पोलीसांचं चुकलंच, अधीक्षकांची कबुली
By Admin | Published: August 29, 2015 03:18 PM2015-08-29T15:18:36+5:302015-08-29T17:35:11+5:30
पेण पोलीसांना २३ मे २०१२ मध्ये एक मृतदेह जळालेल्या अवस्थेत आढळल्याची तक्रार मिळाली होती, परंतु पोलीसांनी त्या घटनेचा शोध कार्यक्षमतेनं घेतला नाही अशी कबुली रायगडचे पोलीस अधीक्षक सुवेझ हक यांनी दिली आहे.
>
ऑनलाइन लोकमत
पेण, दि. २९ - पेण पोलीसांना २३ मे २०१२ मध्ये एक मृतदेह जळालेल्या अवस्थेत आढळल्याची तक्रार मिळाली होती, परंतु पोलीसांनी त्या घटनेचा शोध कार्यक्षमतेनं घेतला नाही अशी कबुली रायगडचे पोलीस अधीक्षक सुवेझ हक यांनी दिली आहे. पत्रकारांशी बोलताना शेख यांनी पोलीस आउटपोस्टला प्रत्यक्षदर्शींनी मृतदेहाची माहिती दिल्याचे सांगितले. त्यानंतर पोलीसांनी मृतदेहाचे काही नमुने डीएनए चाचणीसाठी मुंबईमध्ये जेजे रुग्णालयात पाठवल्याचेही ते म्हणाले. परंतु, पोलीसांनी त्यानंतर त्याचा अहवालदेखील घेतला नाही. एवढेच नाही तर या प्रकरणी अपघाती मृत्यू वा हत्या असाही कुठला गु्न्हा पोलीसांनी नोंदवला नव्हता असंही हक म्हणाले. आत्तापर्यंत मुंबई पोलीसांना तपासात सहकार्य करण्यात येत असून त्यावेळी रायगड पोलीसांकडून झालेल्या गलथानपणाचाही अहवाल चौकशी झाल्यावर सादर करू असे हक म्हणाले.
शीना बोरा हे हायप्रोफाइल हत्याप्रकरण गाजत असताना दोन वर्षांपूर्वी रायगड पोलीसांनी कार्यक्षमता दाखवली नाही, त्यामुळे दोन वर्षे हा हुन्हा गुलदस्त्यात राहिला हे उघड होत आहे. पोलीसांनी हे जाणुनबुजून केले की हा त्यांचा निव्वळ काम टाळण्याचा भाग होता आदी बाबी चौकशीतून पुढे येतील.
रायगडच्या तत्कालिन अधीक्षकांची चौकशी होणार
शीना बोरा हत्याकांड प्रकरणामध्ये २०१२मध्ये गलथानपणा केल्याबद्दल रायगडच्या आर. डी. शिंदे या पोलीस अधीक्षकांची चौकशी करण्याचे आदेश पोलीस महासंचालकांनी दिल्याचे वृत्त एका इंग्रजी चॅनेलने दिले आहे. सुटकेसमध्ये मृतदेह आढळला असल्याने ही हत्या असल्याचे स्पष्ट दिसूनही रायगड पोलीसांनी या प्रकरणाचा नीट तपास का केला नाही, खुनाची नोंद का केली नाही असे अनेक प्रश्न उपस्थित झाले असून हा गलथानपणा जाणुनबूजून केला की हे चुकून झालं असा प्रश्न उपस्थित करण्यात येत आहे.
या हत्याप्रकरणाची चौकशीच होऊ नये यासाठी कुणी प्रयत्न केले का, त्यामध्ये पोलीस सहभागी झाले का असे अनेक प्रश्न निर्माण झाले आहेत. मात्र, एका वृत्तवाहिनीने शिंदे यांच्याशी संपर्क झाल्याचे सांगताना त्यांनी आपल्याला यातलं काही आठवत नसल्याची प्रतिक्रिया दिल्याचे म्हटले आहे.
ही हत्या करण्यात सहभागी असल्याची कबुली इंद्राणीचा दुसरा पती संजीव खन्ना यांनी दिली असून त्याखेरीज आणखी कुणी मदत केली का, या दिशेने तपास होऊ शकतो आणि त्यासाठी रायगडचे तत्कालिन पोलीस अधीक्षक आर. डी. शिंदे यांची चौकशी करण्यात येणार आहे.
दरम्यान, मिखाईल या शीनाच्या भावाने माझ्याही हत्येचा कट रचण्यात आला होता असे पोलीसांना सांगितल्याचे वृत्त आहे. शीतपेयातून गुंगीचे औषध आपल्याला इंद्राणीने दिल्याचे सांगतना आपल्याला संशय आल्याने तिच्या घरातून निघून गेल्याचे मिखाईलने म्हटले आहे.