शीना बोरा हत्या; पीटर मुखर्जीनेच केले शीनाचे अपहरण ; इंद्राणीचा आरोप
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 16, 2017 03:07 AM2017-11-16T03:07:41+5:302017-11-16T03:09:00+5:30
शीना बोरा हत्येप्रकरणाच्या खटल्याने वेगळेच वळण घेतले आहे. या हत्येतील मुख्य आरोपी व शीनाची आई इंद्राणी मुखर्जी हिने मुलीचे अपहरण करून तिला गायब करण्यामागे पीटरचा हात असल्याचा संशय न्यायालयापुढे व्यक्त केला आहे.
मुंबई : शीना बोरा हत्येप्रकरणाच्या खटल्याने वेगळेच वळण घेतले आहे. या हत्येतील मुख्य आरोपी व शीनाची आई इंद्राणी मुखर्जी हिने मुलीचे अपहरण करून तिला गायब करण्यामागे पीटरचा हात असल्याचा संशय न्यायालयापुढे व्यक्त केला आहे. आपल्याला अटक व्हावी, यासाठी पीटरने माफीचा साक्षीदार असलेल्या श्यामवर राय याची मदत घेऊन तशी परिस्थिती निर्माण केली, असा दावा इंद्राणीने अर्जाद्वारे केला आहे. राय हा इंद्राणीचा ड्रायव्हर आहे. बुधवारी तिने स्वहस्ताक्षरात लिहिलेला अर्ज विशेष न्यायालयात सादर केला.
‘आरोपी नंबर ४ (प्रतिम मुखर्जी उर्फ पीटर) याने आरोपी नंबर ३ (श्यामवर राय) याची मदत घेऊन माझी मुलगी शीना बोरा हिचे २०१२ मध्ये अपहरण करून गायब केले आणि नंतर पुरावेही नष्ट केले, या गोष्टीवर विश्वास ठेवण्यासाठी माझ्याकडे काही ठोस कारणे आहेत,’ असे इंद्राणीने अर्जात म्हटले आहे.
शीना बोरा खटल्याची सुनावणी सुरू होण्यापूर्वीच इंद्राणी आरोपीच्या पिंजºयात उभी राहिली. तिने तो अर्ज न्यायाधीशांना देण्याचा प्रयत्न केला. मात्र तिचे वकील आले नसल्याने न्यायाधीशांनी तिला वकिलाद्वारे अर्ज देण्यास सांगितले.
इंद्राणीने अर्जात म्हटले आहे की, माझी अटक घडवून आणली, हे सिद्ध करण्यासाठी पीटरचा १ जानेवारी २०१२ ते ३१ डिसेंबर २०१२ आणि १ जानेवारी २०१५ ते ३१ डिसेंबर २०१५ चा कॉल डाटा रेकॉर्ड (सीडीआर) तपासावा लागेल. यादरम्यानचा सीडीआर सादर करण्याचे निर्देश तपास यंत्रणेला द्यावेत.
साक्षीदारांवर दबाव-
पीटर मुखर्जीचे वकील श्रीकांत शिवडे यांनी इंद्राणीच्या अर्जावर प्रतिक्रिया देणे टाळले. इंद्राणीने अर्जात म्हटले आहे की, आरोपी नंबर ४ ने अन्य आरोपींसह परिस्थिती बदलून मला यात गोवले. त्याने साक्षीदारांवर दबाव आणत सर्व परिस्थिती बदलली आणि माझी अटक घडवून आणली.