शीना बोरा हत्या, श्यामवर रायला बनायचेय माफीचा साक्षीदार
By admin | Published: May 11, 2016 03:25 PM2016-05-11T15:25:39+5:302016-05-11T16:03:47+5:30
शीना बोरा हत्या प्रकरणातील आरोपी श्यामवर रायने विशेष सीबीआय न्यायालयासमोर माफीचा साक्षीदार होण्याची तयारी दाखवली आहे.
Next
ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. ११ - शीना बोरा हत्या प्रकरणाला नवे वळण मिळाले आहे. या गुन्ह्यातील आरोपी श्यामवर रायने विशेष सीबीआय न्यायालयासमोर माफीचा साक्षीदार होण्याची तयारी दाखवली आहे. गुन्ह्या संदर्भात मला महत्वाचे खुलासे करायचे असून, मला माफीचा साक्षीदार बनायचे आहे असे मागच्या आठवडयात श्यामवर रायने न्यायालयाला लिहीलेल्या दोन पानी पत्रात म्हटले आहे.
विशेष न्यायाधीश एच.एस.महाजन यांनी रायला आरोपीच्या पिंज-यात बोलावले तेव्हा त्याने गुन्ह्यासंदर्भात आपल्यावर काय आरोप आहेत त्याची मला कल्पना आहे. मी सुद्धा गुन्ह्यात सहभागी होतो असे त्याने सांगितले. न्यायाधीशांनी त्याला गुन्ह्यासंदर्भात विचारले तेव्हा त्याने शीनाची गळा आवळून हत्या केल्याचे न्यायालयाला सांगितले.
मी कुठल्याही दबावाखाली नाही किंवा मला कोणाचीही भिती नाही. मला आता पश्चाताप होत आहे असे श्यामवर रायने म्हटले आहे. रायने माफीचा साक्षीदार बनण्यासाठी जो अर्ज केला आहे त्यावर न्यायालयाने सीबीआयला १७ मे च्या सुनावणीत उत्तर देण्याचे निर्देश दिले आहेत. या प्रकरणात रायला ऑगस्ट २०१५ मध्ये सर्वात पहिली अटक झाली होती.