शीना बहिण नव्हे मुलगी- इंद्राणीची कबुली
By admin | Published: August 26, 2015 04:16 PM2015-08-26T16:16:27+5:302015-08-27T09:44:43+5:30
इंग्रजी वृृत्तवाहिनीत मोठ्या पदावर कार्यरत राहिलेल्या इंद्राणी मुखर्जी यांनी त्यांच्या बहिणीची नव्हे तर मुलीची हत्या केल्याचा धक्कादायक खुलासा झाला आहे.
ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. २६ - इंग्रजी वृृत्तवाहिनीत मोठ्या पदावर कार्यरत राहिलेल्या इंद्राणी मुखर्जी यांनी त्यांच्या बहिणीची नव्हे तर मुलीची हत्या केल्याचा धक्कादायक खुलासा झाला आहे. शीना बोहरा ही इंद्राणी मुखर्जी यांच्या पहिल्या पतीपासून झालेली मुलगी होती. इंद्राणी मुखर्जी, त्यांचे पहिले पती संजय खन्ना व चालक श्याम रॉय या तिघांनी शीनाची हत्या केल्याची माहिती मुंबई पोलिस आयुक्त राकेश मारिया यांनी दिली. या तिघांनाही पोलिसांनी अटक केली आहे.
मुंबई पोलिसांनी मंगळवारी इंद्राणी मुखर्जी व त्यांचा चालक श्याम रॉय या दोघांना शीना बोहरा यांच्या हत्येप्रकरणी अटक केली होती. तीन वर्षांपूर्वी शीना बोहरा यांचे अपहरण करुन त्यांची हत्या करण्यात आली होती. शीना यांचा मृतदेह रायगड येथे पुरण्यात आला होता. खार पोलिसांना एका खब-यामार्फत इंद्राणी यांचा ड्रायव्हर श्याम हा मोठ्या गुन्ह्यात सहभागी असल्याची माहिती मिळाली व या गुन्ह्याला वाचा फुटली. पोलिसांनी श्यामची कसून चौकशी केली असता त्याने या गुन्ह्याची कबुली दिली. इंद्राणी यांचे पती पीटर मुखर्जी हे स्टार इंडियाचे सीईओ होते. पीटर व इंद्राणी यांचा हा दुसरा विवाह असून २००२ मध्ये दोघेही विवाहबद्ध झाले होते.
पोलिस चौकशीत इंद्राणी यांनी शीना बोहरा ही बहिण नव्हे तर मुलगी असल्याची माहिती दिली आहे. शीना ही इंद्राणी यांच्या पहिल्या पतीपासून झालेली मुलगी होती. हत्येचे नेमके कारण अद्याप गुलदस्त्यात आहे. मुंबई पोलिसांच्या पथकाने इंद्राणी यांचे पहिले पती संजय खन्ना यांना कोलकात्यातून अटक केली आहे. २४ एप्रिल रोजी इंद्राणी यांनी वाद मिटवण्यासाठी शीनाला वांद्रा येथे बोलवले होते. गाडीतच शीनाचा गळा आवळून हत्या करण्यात आली होती. यानंतर तिचा मृतदेह जाळण्याचा प्रयत्नही करण्यात आला होता अशी माहिती राकेश मारियांनी बुधवारी संध्याकाळी एका पत्रकार परिषदेत दिली.
शीना व इंद्राणीच्या नात्याची माहिती नव्हती - पीटर मुखर्जी
इंद्राणी मुखर्जी यांचे पती पीटर मुखर्जी यांनी शीना व इंद्राणीच्या नात्याविषयी माहिती नसल्याचे सांगितले. इंद्राणीने शीनाची ओळख बहिण म्हणून करुन दिली होती असा दावा पीटर यांनी केला आहे. इंद्राणीने मला अंधारात ठेवले असून याचा मला धक्का बसला आहे असेही त्यांनी एका वृत्तवाहिनीशी बोलताना सांगितले.