शीना हत्याकांड - राय माफीचा साक्षीदार
By admin | Published: June 21, 2016 03:45 AM2016-06-21T03:45:14+5:302016-06-21T03:45:14+5:30
शीना बोरा हत्येप्रकरणी प्रमुख आरोपी आणि इंद्राणी मुखर्जीचा आधीचा ड्रायव्हर श्यामवर राय याला सोमवारी विशेष सीबीआय न्यायालयाने माफीचा साक्षीदार म्हणून जाहीर केले
मुंबई : शीना बोरा हत्येप्रकरणी प्रमुख आरोपी आणि इंद्राणी मुखर्जीचा आधीचा ड्रायव्हर श्यामवर राय याला सोमवारी विशेष सीबीआय न्यायालयाने माफीचा साक्षीदार म्हणून जाहीर केले. त्याची संपूर्ण शिक्षा माफ करण्यात आली आहे. राय माफीचा साक्षीदार झाल्याने बरीच रहस्ये पुढे येण्याची शक्यता आहे.
२०१२ मध्ये झालेल्या शीना हत्या प्रकरणातील प्रमुख आरोपी श्यामवर राय याने गेल्या महिन्यात माफीचा साक्षीदार बनण्याची इच्छा व्यक्त केली होती. त्याने विशेष न्यायालयाला दोन पानी पत्र लिहून आपण माफीचा साक्षीदार होण्यास तयार असून आपली शिक्षा माफ करण्यात यावी, अशी विनंती केली होती. त्यावर विशेष न्यायालयाने सीबीआयला यावर उत्तर देण्यास सांगितले होते. सीबीआयनेही रायला माफीचा साक्षीदार करण्याची तयारी दर्शवली. केवळ बचाव पक्षाच्या वकिलांनी यावर आक्षेप घेतला.
सोमवारच्या सुनावणीत न्या. एच.एस. महाजन यांनी रायला माफीचा साक्षीदार म्हणून जाहीर केले. ‘आता तुला या प्रकरणाबद्दल सर्व खरी माहिती द्यावी लागेल. शीना बोरा हत्या प्रकरणात कोणाची काय भूमिका होती, याची संपूर्ण माहिती द्यावी लागेल. माहिती देणार ना?’ अशी विचारणा न्या. महाजन यांनी रायकडे केली. त्यावर रायने सकारात्मक उत्तर दिले. श्यामवर राय आता या केसमधील आरोपी
नसून महत्त्वाचा साक्षीदार असणार आहे. (प्रतिनिधी)
माफीचा साक्षीदार होण्यासाठी कोणीही दबाव आणला नसून हत्येच्या कटात सहभागी असल्याचा आपल्याला पश्चात्ताप होत आहे, असे रायने न्यायालयाला सांगितले. श्यामवर राय हा या हत्या प्रकरणातील पोलिसांच्या ताब्यात आलेला पहिला आरोपी आहे. त्याच्यामुळेच शीना बोरा हरवल्याप्रकरणाची बंद करण्यात आलेली फाइल पुन्हा एकदा उघडण्यात आली.