'कर्जमाफी'च्या निर्णयाची शेतकऱ्यांकडून 'होळी'
By ऑनलाइन लोकमत | Published: December 28, 2019 04:00 PM2019-12-28T16:00:16+5:302019-12-28T16:03:43+5:30
विधानसभा निवडणुकीपूर्वी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सत्ता आल्यावर सरसकट कर्जमाफी करणार असल्याचे आश्वासन दिले होते.
मुंबई: महाविकास आघाडीच्या सरकारने केलेल्या शेतकरी कर्जमाफीसाठी 2 लाखांपर्यंत कर्जाची रक्कम असेलेल्या शेतकऱ्यांच लाभ घेता येणार आहे. त्यामुळे सरकारने घेतलेल्या या निर्णयावरून शेतकरी आक्रमक होताना पाहायला मिळत आहे. औरंगाबाद जिल्ह्यात सरकारच्या निर्णयाची अन्नदाता शेतकरी संघटनेच्या वतीने होळी करण्यात आली.
विधानसभा निवडणुकीपूर्वी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सत्ता आल्यावर सरसकट कर्जमाफी करणार असल्याचे आश्वासन दिले होते. त्याप्रमाणे हिवाळी अधिवेशनाच्या शेवटच्या दिवशी सरकारने कर्जमाफीची घोषणा सुद्धा केली. मात्र 2 लाखांपर्यंत कर्जाची रक्कम असलेल्या शेतकऱ्यांच या कर्जमाफीचा लाभ होणार असल्याची अट सरकारने घातली आहे. मात्र सरकारच्या या निर्णयाचा शेतकऱ्यांनी निषेध केला आहे.
सरकारने कर्जमाफीसाठी निकष आणि अटी लावून गेल्यावेळच्या सरकारप्रमाणेचं शेतकऱ्यांची फसवणूक केली आहे. तर पूर्वीच्या सरकारने छत्रपती शिवाजी महाराजांचे नाव घेऊन तर, या सरकारने महात्मा ज्योतिबा फुलेंचे नाव घेऊन शेतकऱ्यांची फसवणूक केली असल्याचा आरोप यावेळी शेतकऱ्यांनी केला.
त्यामुळे पैठण तालुक्यातील ढाकेफळ येथील शेतकऱ्यांनी सरकारच्या निर्णयाची होळी केली. सरकारने दिलेले आश्वासन पाळले नसून, आमची फसवणूक केली असल्याचा आरोप यावेळी शेतकऱ्यांनी केला. तसेच सरकारने घेतलेल्या निर्णयात बदल करावा, अन्यथा सरकार विरोधात आंदोलन करण्याचा इशारा सुद्धा यावेळी शेतकरी संघटनांनी दिला.