शेकापचा बुरूज ढासळला

By admin | Published: May 27, 2017 02:57 AM2017-05-27T02:57:48+5:302017-05-27T02:57:48+5:30

पनवेल महापालिका स्थापन करण्याचा १९९१ पासूनचा प्रलंबित प्रश्न भारतीय जनता पार्टीने सोडविला. सहा महिन्यांत २५० कोटींचा निधी उपलब्ध करून दिला.

The Sheikap's tower collapsed | शेकापचा बुरूज ढासळला

शेकापचा बुरूज ढासळला

Next

नामदेव मोरे।
लोकमत न्यूज नेटवर्क
नवी मुंबई : पनवेल महापालिका स्थापन करण्याचा १९९१ पासूनचा प्रलंबित प्रश्न भारतीय जनता पार्टीने सोडविला. सहा महिन्यांत २५० कोटींचा निधी उपलब्ध करून दिला. महापालिकेमुळे विकासातील अडसर दूर झाल्याची खात्री पटल्याने पनवेलकरांनी पहिल्याच निवडणुकीमध्ये भाजपाला एकहाती सत्ता देऊन त्यांच्यावर विश्वास दाखविला. भाजपाच्या वादळामध्ये सर्वपक्षीयांची दाणादाण उडाल्याचे स्पष्ट झाले आहे.
महापालिकेच्या निर्मितीसाठी भाजपा आ. प्रशांत ठाकूर आग्रही होते. १ आॅक्टोबरला महापालिकेची निर्मिती झाल्यानंतर सहा महिन्यांत सरकारने विकासासाठी भरघोस निधीही दिला. शेतकरी कामगार पक्ष,राष्ट्रवादी व काँगे्रसने पंचायत समिती व जिल्हा परिषदेमधील आघाडी महापालिकेसाठीही कायम ठेवली.
शिवसेनेची ताकद अत्यंत अल्प असली तरी भाजपाला सत्तेपासून रोखण्यासाठी युती करण्याऐवजी स्वबळावर लढण्याचा निर्णय त्यांनी घेतला होता. प्रशांत व रामशेठ ठाकूर स्वार्थासाठी पाच वर्षांनी पक्ष बदलत असल्याचा आरोप विरोधकांनी केला. नगरपालिकेच्या कारभारामध्ये भ्रष्टाचार झाल्याचा त्यांचा
आरोप होता.
काँगे्रस व राष्ट्रवादीच्या सर्व प्रमुख नेत्यांनी व शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी सभा घेतली. ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे पनवेलमध्ये तळ ठोकून होते. परंतु मतदारांनी शेकाप आघाडीसह सेनेला स्पष्ट नाकारले.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दोन सभा घेऊन तुम्ही आम्हाला सत्ता द्या, आम्ही विकास देतो. पनवेलकरांना मंत्रिपद देण्याचे अप्रत्यक्ष आश्वासनही त्यांनी दिले. भाजपाने विरोधकांवर टीका करण्यापेक्षा विकासाच्या मुद्द्यावर निवडणूक लढवित ५१ जागांवर विजय मिळवून एकहाती सत्ता मिळविली आहे.
मुख्यमंत्र्यांचा सकारात्मक दृष्टिकोन व रामशेठ ठाकूर, प्रशांत ठाकूर यांच्या कुशल नेतृत्वामुळे सर्वच विरोधकांना कात्रजचा घाट दाखविण्यात भाजपा यशस्वी ठरला आहे.

पनवेल महापालिकेचा प्रवास
४ सप्टेंबर १९९१ - महापालिका स्थापण्यासाठी शासनाने अभिप्राय मागविला.
२४ सप्टेंबर १९९१ - शासनाने महापालिकेच्या स्थापनेसाठी प्राथमिक अधिसूचना मागविली.
१० सप्टेंबर २००१ - दहा वर्षांनंतर महापालिका घोषित करण्याऐवजी नगरपालिकेला अ वर्ग दर्जा दिला.
२४ जुलै २००६ - खारघर, कामोठे, कळंबोली नोड नवी मुंबई महापालिकेत समावेशासाठी शासनाने अभिप्राय मागितले.
१२ फेब्रुवारी २००७ - नगरपालिकेने नवी मुंबईला विरोध करून, स्वतंत्र महापालिकेची मागणी केली.
२३ नोव्हेंबर २०१५ - शासनाने पनवेल महापालिका करण्याची घोषणा केली.
१७ डिसेंबर २०१५ - महापालिका करण्यासाठी नगरपालिकेने ठराव केला.
६ मे २०१६ - शासनाच्या अभ्यास समितीने अहवाल सादर केला.
१६ मे २०१६ - महापालिकेसाठी अधिसूचना काढली.
१ आॅक्टोबर २०१६ - पनवेल महापालिका अस्तित्वात.
१९ एप्रिल २०१७ - निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर.
२६ मे २०१७ - पहिल्या निवडणुकीमध्ये भाजपाचे यश

नकारात्मक
प्रचारामुळेच अपयश
शेतकरी कामगार पक्ष, काँगे्रस, राष्ट्रवादी व शिवसेनेने भाजपावर टीका करण्यावर सर्वाधिक लक्ष दिले. पनवेलच्या विकासापेक्षा ठाकूर पिता -पुत्रांच्या पक्षांतरावर, कार्यशैलीवर टीका करण्यावर भर दिला. दुसरीकडे भाजपातर्फे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व आ. प्रशांत ठाकूर यांनी विकासाच्या मुद्द्यावर निवडणूक लढली व नागरिकांचा विश्वास संपादन करून एकहाती सत्ता मिळविली. नकारात्मक प्रचारामुळेच विरोधकांना नामुश्कीजनक पराभवास सामोरे जावे लागले.

Web Title: The Sheikap's tower collapsed

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.