‘एमसीए’च्या अध्यक्षपदी शेलार

By Admin | Published: January 13, 2017 03:56 AM2017-01-13T03:56:30+5:302017-01-13T03:56:30+5:30

जेष्ठ नेते शरद पवार यांनी दिलेल्या राजीनाम्यानंतर रिक्त झालेल्या मुंबई क्रिकेट असोसिएशनच्या (एमसीए) अध्यक्षपदी

Shelar was elected president of MCA | ‘एमसीए’च्या अध्यक्षपदी शेलार

‘एमसीए’च्या अध्यक्षपदी शेलार

googlenewsNext

मुंबई : जेष्ठ नेते शरद पवार यांनी दिलेल्या राजीनाम्यानंतर रिक्त झालेल्या मुंबई क्रिकेट असोसिएशनच्या (एमसीए) अध्यक्षपदी उपाध्यक्ष आशिष शेलार यांची एकमताने निवड झाली. त्याचवेळी विनोद देशपांडे आणि पंकज ठाकूर या समिती सदस्यांची उपाध्यक्षपदी वर्णी लागली आहे.
लोढा समितीने सुचविलेल्या शिफारशी मान्य करण्याबाबत सर्वोच्च न्यायालयाने भारतीय क्रिकेट नियामक मंडळाला (बीसीसीआय) सुनावताना अनुराग ठाकूर व अजय शिर्के यांची अनुक्रमे अध्यक्ष व सचिवपदावरुन उचलबांगडी केली. या निर्णयानंतर बीसीसीआयशी संलंग्न सर्वच राज्य संघटनांचे धाबे दणाणले होते आणि लोढा शिफारशीनुसार जे-जे पदाधिकारी नियमबाह्य ठरत होते त्यांच्या राजीनाम्याचे सत्र सुरु झाले होते.
लोढा शिफारशीनुसार ७० वर्षांहून अधिक वयाची व्यक्ती क्रिकेट प्रशासक म्हणून कोणत्याही पदावर कार्यरत राहू शकत नव्हती. यानुसार पवार यांना प्रशासकाच्या मैदानातून बाहेर पडणे अनिवार्य होते आणि नुकताच १७ डिसेंबरला त्यांनी आपल्या अध्यक्षपदाचा राजीनामाही दिला होता. विशेष म्हणजे यानंतर काही दिवसांनीच उपाध्यक्ष व भारताचे माजी कर्णधार दिलीप वेंगसरकर यांनीही आपल्या पदाचा राजीनामा दिला होता. त्यामुळे दोनपैकी एक उपाध्यक्षपद रिकामी झाले होते. तर अध्यक्षपदही रिक्त झाले होते.
गुरुवारी एमसीएच्या झालेल्या बैठकीत शेलार यांची अध्यक्षपदी एकमताने निवड करतानाच उपाध्यक्षपदाच्या दोन्ही रिक्त जागेवर अनुक्रमे विनोद देशपांडे आणि पंकज ठाकूर यांची निवड करण्यात आली. या बैठकीनंतर एमसीएचे संयुक्त सचिव उन्मेश खानविलकर यांनी सांगितले की, ‘एमसीएमधील रिक्त झालेल्या महत्त्वांच्या पदांवर आम्ही नेमणूक केली असून पवार यांच्यानंतर रिक्त झालेल्या अध्यक्षपदी आशिष शेलार यांची निवड करण्यात आली आहे. तर, विनोद देशपांडे आणि पंकज ठाकूर हे दोन नवे उपाध्यक्ष असतील. हे सर्व पद पुढील निवडणूकांपर्यंत कायम राहतील. आम्हाला हे निर्णय घेऊन याची माहिती बीसीसीआयला द्यायची होती.’
लोढा शिफारशीनुसार एमसीएच्या नियमांमध्ये सुधारणा करण्याबाबत खानविलकर म्हणाले की, ‘या कामाची प्रक्रीया सुरु झाली आहे. एमसीए नियमांमध्ये सुधारणा करण्याऱ्या समितीचे काम संपल्यानंतर लगेच विशेष सर्वसाधरण सभा बोलविण्यात येईल. त्यावेळी आम्ही आमचे नियम बदलू.’ (क्रीडा प्रतिनिधी)
मिळालेली जबाबदारी पार पाडणार
उपनगरामध्ये क्रिकेटचा अधिक प्रसार करण्याचा प्रयत्न करणार. येथील नवोदित क्रिकेटपटूंना अधिक प्रयत्न मिळवून देण्यासाठी काम करायचे आहे, असे एमसीएचे उपाध्यक्ष पंकज ठाकूर यांनी सांगितले.
सर्व कार्यकारणी समितीच्या उपस्थितीत झालेल्या निर्णयाचा आनंद आहे. आता याापुढील तीन महिन्यांमध्ये शिल्लक असलेली कामे पुर्ण करण्यावर आमची प्राथमिकता असल्याचे मत एमसीएचे उपाध्यक्ष विनोद देशपांडे यांनी नोंदविले.

Web Title: Shelar was elected president of MCA

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.