शेराने शिवीगाळ करून धमकाविल्याची महिलेची तक्रार, सलमानच्या ‘बॉडीगार्ड’वर गुन्हा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 22, 2017 04:38 AM2017-10-22T04:38:31+5:302017-10-22T04:38:43+5:30
मुंबई : ‘दबंग’स्टार सलमान खान याचा मुख्य ‘बॉडीगार्ड’ गुरमीत सिंग उर्फ शेराने आपल्याला शिवीगाळ करून धमकाविल्याची तक्रार एका महिलेने शुक्रवारी खार पोलीस ठाण्यात केली आहे. ‘बिग बॉस-११’ मालिकेतून बाद झालेल्या स्पर्धक झुबेर खान याला, सलमान खानविरोधात तक्रार करण्यासाठी या महिलेने मदत करत असल्याचे सांगून, शेराने हे कृत्य करीत असल्याचे तिने फिर्यादीत म्हटले आहे.
वांद्रे येथे राहात असलेल्या शबनम अब्दुल हमीद शेख (३२) हिचा गारमेंटचा व्यवसाय असून, सीडब्लूसी इंटरप्राइझेस या सिक्युरिटी एजन्सीची ती प्रमुख आहे. बिग बॉस मालिकेतील स्पर्धक झुबेर खान याने सलमान विरोधात गुन्हा दाखल करण्यासाठी शबनम शेख यांची मदत घेतली होती. त्यानंतर, ८ आॅक्टोबरनंतर त्यांना अनेक फोन येत आहेत. कोणी सलमानचा फॅन असल्याचे सांगून फोन करतो, तर कोणी शिवीगाळ करून धमकी देतो, अशी तक्रार त्यांनी दिली आहे.
२० आॅक्टोबर रोजी त्यांना मोबाइलवर एक फोन आला. त्यांनी फोन घेतल्यानंतर, ‘आप भाई को क्यो तकलीफ दे रही हो, जो भी है आपस में सेटल करलो,’ असे सांगितले. तेव्हा ‘मी तुम्हाला ओळखत नाही, तुम्ही कोण बोलताय,’ असे विचारल्यावर त्या व्यक्तीने सलमानचा बॉडीगार्ड शेरा सांगितले. शबनम यांनी त्याला कोणतीही सेटलमेंट करण्याची तयारी न दाखवता, एनडेमॉल, कलर्स आणि बिग बॉस विरोधात तक्रार करणार असल्याचे सांगितल्यानंतर, त्याने चिडून अर्वाच्च भाषेत शिवीगाळ केली, तसेच दहा लोकांसमोर तुझ्यावर सामूहिक बलात्कार करू, असे धमकाविल्याची तक्रार त्यांनी पोलिसांकडे शनिवारी केली.