‘ग्लॅमर’ कमी होण्याची शेट्टींना भीती

By admin | Published: June 10, 2017 01:00 AM2017-06-10T01:00:06+5:302017-06-10T01:00:06+5:30

सदाभाऊंचा हल्लाबोल : ‘दरबारातील माणसां’नी कान भरले, मक्तेदारी मोडीत निघाल्यानेच धुसफूस

Shetty fears to reduce 'glamor' | ‘ग्लॅमर’ कमी होण्याची शेट्टींना भीती

‘ग्लॅमर’ कमी होण्याची शेट्टींना भीती

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
कोल्हापूर : आमच्या संघटनेचे संस्थापक राजू शेट्टी यांच्या परवानगीनेच ‘शेतकऱ्यांचा प्रतिनिधी’ म्हणून मंत्रिमंडळात सामील झालो. अतिशय कमी वेळात शेतकऱ्यांचे प्रश्न मांडतोय, सोडवून घेतोय. सदाभाऊ असंच काम करत राहिला तर ‘शेतकरी नेता’ म्हणून माझं ‘ग्लॅमर ’कमी होईल; अशी भीती त्यांना वाटते, अशा शब्दांत कृषी आणि पणन राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांनी खासदार शेट्टी यांच्यावर शुक्रवारी हल्ला चढविला.
खोत यांनी शेतकऱ्यांच्या प्रश्नांबाबत बोलताना शेट्टी यांनी केलेल्या आरोपांनाही त्याच भाषेत उत्तरे दिली. नाशिकला झालेल्या राज्य समन्वय समितीच्या बैठकीत खासदार शेट्टी यांनी खोत यांच्यावर बोचरी टीका केली होती. त्याबद्दल त्यांना विचारणा केली असता त्यांनीही प्रत्युत्तर दिले.
खोत म्हणाले, ‘पद स्वीकारल्यापासून मी शेतकऱ्यांचेच काम करतोय. गेली ३० वर्षे शेट्टी यांच्या खांद्याला खांदा लावून जे-जे प्रश्न मांडत होतो; ते सोडविण्यासाठी मी आग्रही राहू लागलो. अशातच आजारपण, अधिवेशन, महापालिका, नगरपालिका, जिल्हा परिषद निवडणुकांमध्ये मला फक्त तीनच महिने खऱ्या अर्थाने काम करायला मिळालं; पण या काळात माझ्याजवळ असणाऱ्यांची त्यांना पाहिजे होती ती कामं झाली नाहीत, बदल्या करायला पाहिजे होत्या त्या केल्या नाहीत. त्यामुळे मग ‘दरबारातल्या मंडळीं’नी शेट्टी यांचे कान भरायला सुरुवात केली.
वादाच्या सुरुवातीचा प्रसंग सांगताना खोत म्हणाले, अरबी समुद्रातील शिवरायांच्या पुतळ्याच्या निमंत्रणपत्रिकेत शेट्टी यांचं नाव नव्हतं. त्यांनी ही खंत मला सांगितली. मी म्हटलं, साहेब तुम्ही या, शिवरायांपेक्षा आपलं नाव लहान आहे; तेव्हापासून त्यांना राग यायला सुरुवात झाली. जिल्हा परिषदेच्या निवडणुकीला माझ्या मुलाला उभं करणार, हे मी त्यांना बोललो. त्यांनी संमती दिली. नंतर घराणेशाहीच्या बातम्या यायला लागल्या. तुम्ही राहुल आवाडे यांंचा सत्कार केलेला चालतोय, तुम्ही यशवंत एकनाथ पाटील यांच्या मुलाला विधानसभेची उमेदवारी दिलेली चालते. ती घराणेशाही तुम्हाला दिसत नाही का..? शिरोळमध्ये गेल्यावेळी संघटनेचे पाच जिल्हा परिषद सदस्य निवडून आले आणि यंदा एकच निवडून आला. तिथे भाजपने शिरकाव केला. तिथल्या पराभवाचा राग सदाभाऊवर का काढता..?
पुणतांब्याच्या शेतकऱ्यांंना मी सलाम करतो. त्यांना सगळ्यांनी गृहीत धरलं. सगळ्यांनी पाठिंबा दिला आणि घरात बसले. त्यांच्याशी एकदा चर्चा झाली, फिसकटली. दुसऱ्यांदा चर्चा झाली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी रात्री १२ ते पहाटे साडेचारपर्यंत चर्चा केली. कर्जमाफीचा निर्णय झाला. मग हे सगळे जागे झाले. आम्ही नसताना हे झालं कसं. आंदोलन, चर्चा, निर्णय ही आमची मक्तेदारी. ती मोडली. यातून पुन्हा आता हे सगळं सुरू आहे, असे खोत यांनी सांगितले.

जालंदर पाटील यांना फोन केला होता
शेतकऱ्यांचा संप सुरू असताना मी स्वाभिमानी पक्षाचे जिल्हाध्यक्ष प्रा. जालंदर पाटील यांना फोन केला होता. खासदारसाहेबांना चर्चेला या म्हणून सांगा, असा निरोप दिला होता. त्याचे पुरावे माझ्याकडे आहेत. ते का आले नाहीत, हा त्यांचा प्रश्न आहे. प्रश्न मिटल्यावर काय करायचं, हा ज्यांचा प्रश्न आहे ते चर्चेला येत नाहीत, असा टोला खोत यांनी लगावला.
ती माझी संस्कृती नाही
शेट्टी यांनी तुमची संभावना गद्दार म्हणून केली आहे. तुमची काय प्रतिक्रिया अशी विचारणा केल्यानंतर मात्र खोत यांनी मी ‘त्या’ भाषेत उत्तर देणार नाही. मला माझ्या आई-वडिलांनी ‘त्या’ भाषेत बोलायला शिकवलेलं नाही, ती माझी संस्कृती नाही.’ असे सांगून टाकले. सदाभाऊ मोठा झाला म्हणून काहींच्या डोळ्यांत पाणी आलं; पण त्यात राजू शेट्टी यांचेही चार थेंब असावेत याचं दु:ख मला जास्त आहे, असेही खोत यांनी बोलून दाखविले.

Web Title: Shetty fears to reduce 'glamor'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.