कारागृहातील दंगलीत मुलांना बनविले ढाल
By admin | Published: July 16, 2017 01:22 AM2017-07-16T01:22:19+5:302017-07-16T01:22:19+5:30
मंजुळा शेट्ये हत्या प्रकरणानंतर कारागृहात झालेल्या दंगलीत इंद्राणी मुखर्जीने लहान मुलांना पुढे करत आपली ढाल बनविल्याची माहिती पुढे आल्याने इंद्राणीच्या
- लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : मंजुळा शेट्ये हत्या प्रकरणानंतर कारागृहात झालेल्या दंगलीत इंद्राणी मुखर्जीने लहान मुलांना पुढे करत आपली ढाल बनविल्याची माहिती पुढे आल्याने इंद्राणीच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. शनिवारी बाल कल्याण समितीने भायखळा कारागृहाची भेट घेत या घटनेचा आढावा घेतला.
भायखळा कारागृहात ३०० हून अधिक महिला कैदी आहेत. त्यात महिला कैद्यांसोबत त्यांच्या १७ लहान मुलांचा समावेश आहे. २३ जून रोजी वॉर्डन मंजुळा शेट्येची हत्या झाली. २४ जून रोजी मंजुळाच्या मत्यूची बातमी समजताच कारागृहातील महिला कैद्यांचा उद्रेक झाला. या वेळी सुरुवातीला शांत बसण्याचा सल्ला देणाऱ्या इंद्राणीने कैद्यांना भडकावल्याचे प्राथमिक चौकशीत समोर आले. या वेळी तिने कारागृहातील लहान मुलांना ढाल बनविल्याचा आरोप करण्यात आला. दंगलीप्रकरणी इंद्राणीसह २९१ जणांविरुद्ध नागपाडा पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला. या प्रकरणी गुन्हे शाखा अधिक तपास करत आहे.
चौकशीचाच एक भाग म्हणून शनिवारी दुपारी १२च्या सुमारास बाल कल्याण समितीच्या सहा अधिकाऱ्यांनी कारागृहाला भेट दिली. या वेळी त्यांनी मुलांसोबत संवाद साधला. साधारण तासभर त्यांनी कारागृहातील मुले, तसेच दंगलीत सहभागी झालेल्या महिला कैद्यांसोबत संवाद साधला. बाल हक्क आयोगाचे अध्यक्ष प्रवीण घुगे यांनी दिलेल्या माहितीनुसार, आम्ही दंगलीत सहभागी झालेल्या सर्वांशी संवाद साधला. हादेखील एक चौकशीचा भाग आहे. या चौकशीचा अहवाल राज्य शासनाच्या महिला व बालविकास विभागाला सादर करण्यात येणार आहे. तसेच कारागृहात अन्य महिला कैद्यांसोबतच या लहान मुलांना ठेवण्यात येते. याचा वाईट परिणाम त्यांच्यावर होतो. त्यासाठी काही सुधारणा करण्यात येतील का? शिवाय अशा मुलांची वेगळ्या बरॅकमध्ये व्यवस्था करण्याची मागणी करणार असल्याचेही घुगे यांनी सांगितले. त्यांच्या या चौकशी अहवालात इंद्राणीवरील आरोप समोर आल्याने तिच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता आहे.
गुन्ह्याची चौकशी सुरू
हत्येच्या गुन्ह्यातील मनीषा पोखरकरसह सहाही आरोपींची रवानगी न्यायालयीन कोठडीत करण्यात आली आहे. त्यापाठोपाठ गुन्हे शाखेने दंगलीच्या गुन्ह्यांचा तपास सुरू केला आहे. इंद्राणीसह १६ जणींचे जबाब नोंदविण्यास न्यायालयाकडून परवानगी मिळाल्यानंतर गुन्हे शाखा अधिक तपास करत आहे.