प्रभाग अधिकाऱ्यावर शाईफेक!
By admin | Published: December 24, 2016 04:52 AM2016-12-24T04:52:32+5:302016-12-24T04:52:32+5:30
शिव वडापावच्या गाडीवर कारवाई केल्याच्या रागातून कल्याण-डोंबिवली महापालिकेचे ‘क’ प्रभागक्षेत्र अधिकारी अरुण वानखेडे
कल्याण : शिव वडापावच्या गाडीवर कारवाई केल्याच्या रागातून कल्याण-डोंबिवली महापालिकेचे ‘क’ प्रभागक्षेत्र अधिकारी अरुण वानखेडे यांच्यावर शुक्रवारी सकाळी ११ वाजता शाई फेकण्यात आली. श्यामराव क्षीरसागर यांनी शाई फेकली असून, ते ठाणे जिल्हा शिवसेना कर्मचारी सेनेचे संस्थापक अध्यक्ष असल्याचे सांगत आहेत. या प्रकाराबद्दल त्यांना बाजारपेठ पोलिसांनी अटक केली. दरम्यान, या घटनेचा म्युनिसिपल कर्मचारी कामगार सेना या महापालिकेतील संघटनेने निषेध करीत कामबंद आंदोलन छेडले. त्यामुळे दुपारी दोननंतर कोणतेही कामकाज झाले नाही.
कल्याण रेल्वे स्थानक परिसरात असलेल्या क्षीरसागर यांच्या शिव वडापावच्या गाडीवर ‘क’ प्रभागाच्या अतिक्रमणविरोधी पथकाने काही दिवसांपूर्वी कारवाई केली होती. या कारवाईदरम्यान गाडीवर असलेल्या शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाक रे आणि आनंद दिघे यांच्या प्रतिमा तोडल्याचा आरोप क्षीरसागर यांनी केला आहे. त्याचा निषेध म्हणून शाईफेक केल्याचे त्यांचे म्हणणे आहे. शुक्रवारी निवेदन देण्याच्या बहाण्याने ‘क’ प्रभाग कार्यालयात आलेल्या क्षीरसागर यांनी वानखेडे यांच्यावर शाईफेक करताच त्यांना पालिकेच्या कर्मचाऱ्यांनी कोंडून बेदम मारहाणही केली. घटनास्थळी पोहोचलेल्या पोलिसांसमोरही हा मारहाणीचा प्रकार सुरू होता. वानखेडे यांनी क्षीरसागरांविरोधात दिलेल्या तक्रारीवरून पोलिसांनी गुन्हा दाखल केला. (प्रतिनिधी)