पाली एसटी स्थानकाची दुरवस्था

By admin | Published: July 10, 2017 03:24 AM2017-07-10T03:24:05+5:302017-07-10T03:24:05+5:30

पाली-सुधागड अष्टविनायक तीर्थक्षेत्रांपैकी एक आहे

Shifts of Pali ST station | पाली एसटी स्थानकाची दुरवस्था

पाली एसटी स्थानकाची दुरवस्था

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
पाली : पाली-सुधागड अष्टविनायक तीर्थक्षेत्रांपैकी एक आहे. श्री बल्लाळेश्वर गणपतीचे तीर्थक्षेत्र असल्याने पालीचे नाव संपूर्ण महाराष्ट्रासह भारताच्या नकाशावर कोरले गेल्याने येथे दर्शनासाठी दररोज हजारो भाविकांची रीघ लागलेली असते. तसेच पाली हे तालुक्याचे ठिकाण असल्याने येथे शिक्षणासाठी जिल्हाभरातून हजारो विद्यार्थी येत असतात. ते सर्व विद्यार्थी, भाविक व पर्यटक एसटीनेच प्रवास करत असल्याने त्यांना पाली एसटी स्थानकात जावेच लागते; परंतु या पाली एसटी स्थानकाची अवस्था बिकट झाली आहे. या स्थानकात सर्वत्र कचरा साठला असून दुर्गंधी पसरली आहे, त्याचप्रमाणे स्थानकात जेथे एसटी लावल्या असतात तेथे समोरच अवैध दुचाकींची पार्किंग केल्याने प्रवाशांना ये-जा करण्याचा मार्ग देखील नसतो. या एक ना अनेक अशा समस्यांनी प्रवाशांसह नागरिक त्रस्त झाले आहेत.
पाली एसटी स्थानकात शौचालयांची व्यवस्था नसल्याने प्रवाशांची गैरसोय होत आहे. येथील इमारत मोडकळीस आली असून, शेवटची घटका मोजता आहे. त्यामुळे येथे अपघात होण्याची शक्यता वतविण्यात येत आहे. अशा अनेक अडचणींचा सामना करीत प्रवास करावा लागत असल्यामुळे प्रवासीवर्गामध्ये नाराजीचे वातावरण पसरले असून, त्यांनी या सर्व समस्यांकडे लक्ष देण्यासाठी थेट परिवहन मंत्री दिवाकर रावते यांच्याकडे मागणी केली आहे. बल्लाळेश्वर पाली एसटी स्थानकाची नवीन इमारत बांधण्यासाठी रावते यांना साकडे घातले आहे. तसेच या इमारतीच्या दुरवस्थेबाबत सामाजिक कार्यकर्ते रवींद्रनाथ ओव्हाळ यांनी मागीलवर्षी उपोषण देखील केले होते; परंतु याचे काहीही सोयरसुतक कोणालाही नाही.
>सुधागड तालुक्यातील बसथांब्यांची दुरवस्था
पाली-खोपोली मार्गावर महाराष्ट्र परिवहन मंडळाचे अनेक बसथांबे आहेत. पावसाळा व उन्हाळ्यात प्रवाशांना या स्थानकांचा आधार असतो. मात्र, गेली अनेक वर्षे या थांब्यांकडे दुर्लक्ष केल्याने तालुक्यातील काही थांबे जमीनदोस्त झाले तर काही असून नसल्यासारखे आहेत. परळी व पेडली येथे स्थानक सुस्थितीत आहेत. मात्र, या स्थानकांच्या आवारात चारही बाजूने दुकाने थाटल्याने प्रवाशांना यात बसता येत नाही तर घोड्याचा डोह, राबगाव अशी स्थानके नेस्तनाबूत झाली आहेत.
वाकण, पाली, खोपोली हा राज्यमार्ग मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गाचा बायपास म्हणून वाकण-पाली-खोपोली या राज्यमार्गाचा उपयोग केला जातो. त्यामुळे या मार्गावर वाहनांची वर्दळ सतत चालू असते. या रस्त्यांवरून मोठ्या संख्येने प्रवासी प्रवास करत असतात. मात्र, या मार्गावर असलेल्या बसथांब्याची दुरवस्था झाली आहे.
या स्थानकाला जोडलेली अनेक गावे आहेत. त्यात प्रामुख्याने सुधागड तालुक्यात डोंगराळ भाग असल्याने त्यांना बाजारहाट करण्याकरिता पाली, परळी, पेडली या बाजारपेठा आहेत. येथेच बाजारहटासाठी यावे लागते. अशा वेळी बसचाच आधार या नागरिकांना असतो. मात्र, तालुक्यातील बस थांब्यावरील शेडचे संपूर्ण पत्रे फुटलेले आहेत. भिंती पडलेल्या अवस्थेत असून लोखंडी खांब वाकलेले आहेत अशी अवस्था बसथांब्यांची झाली आहे.
या बसथांब्यांची दुरवस्था झाल्यामुळे तालुक्यातील ग्रामस्थ, प्रवासी, शालेय विद्यार्थ्यांना त्रास सहन करावा लागत आहे आणि तेथेच त्या भागात माध्यमिक हायस्कूल असल्यामुळे तेथे येणाऱ्या-जाणाऱ्या विद्यार्थ्यांना रस्त्याच्या बाजूला उभे राहून बसची वाट पाहावी लागते. मात्र, या रस्त्यावर वाहनांची सतत वर्दळ असल्यामुळे येथे उभे राहणारे प्रवासी किंवा विद्यार्थ्यांचा अपघात होण्याची दाट शक्यता नाकारता येत नाही. म्हणून येथील स्थानिक प्रतिनिधी, सामाजिक कार्यकर्त्यांनी संबंधित प्रशासनाकडे लक्ष देऊन हे बसथांबे सुस्थितीत करावे, अशी मागणी जोर धरत आहे.
पाली एसटी स्थानकाची इमारत ही पूर्णपणे जीर्ण झाली असून, तिचे अनेक भाग कोसळले आहेत. या धोकादायक इमारतीमध्येच प्रवासी व शाळा, कॉलेजच्या विद्यार्थ्यांना उभे राहावे लागत असल्याने या पावसाळ्यात ही इमारत पडून मोठी दुर्घटना झाल्यास त्यास परिवहन खाते जबाबदार असेल.
- रवींद्रनाथ ओव्हाळ,
सामाजिक कार्यकर्ते, पाली

Web Title: Shifts of Pali ST station

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.