ठाण्यात सैनिकांचा उत्साह शिगेला

By Admin | Published: March 7, 2017 03:25 AM2017-03-07T03:25:06+5:302017-03-07T03:25:06+5:30

तब्बल २५ वर्षांनंतर एकहाती सत्ता संपादित केल्याने सोमवारी ठाण्यात शिवसैनिकांचा उत्साह शिगेला पोहोचल्याचे दिसले.

Shigella enthusiasts of Thane | ठाण्यात सैनिकांचा उत्साह शिगेला

ठाण्यात सैनिकांचा उत्साह शिगेला

googlenewsNext


ठाणे : तब्बल २५ वर्षांनंतर एकहाती सत्ता संपादित केल्याने सोमवारी ठाण्यात शिवसैनिकांचा उत्साह शिगेला पोहोचल्याचे दिसले. यामुळे त्यांनी संपूर्ण ठाण्याचे वातावरण भगवे करून टाकले होते. महापालिका मुख्यालयाच्या आवारात छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा, प्रवेशद्वारावर स्वागतासाठी दोन हत्ती ठेवून परिसर केवळ जय भवानी जय शिवाजी, शिवसेना झिंदाबाद... अशा घोषणा अन् फटाक्यांच्या आतषबाजीसह ढोलताशांच्या गजराने दणाणून सोडला होता.
सोमवारी महापौर आणि उपमहापौरपदाची निवडणूक होती. अपेक्षेप्रमाणे एकहाती सत्ता संपादित करणाऱ्या शिवसेनेचाच महापौर होईल, हे स्पष्ट होते. त्यामुळेच आदल्या दिवसापासून महापालिका मुख्यालयाच्या आवाराचे वातावरण भगवे होण्यास सुरुवात झाली होती. गुरुकुल सोसायटी, नितीन कंपनी, पाचपाखाडी परिसर आदींसह आजूबाजूचा परिसरदेखील भगवा झाला होता. या वेळी भगवे कंदील आकर्षणाचे केंद्र ठरले होते. भगवे झेंडे, झालरी यामुळे वातावरण अवघे शिवसेनामय झाले होते. मोठमोठ्या रांगोळ््या काढल्या होत्या. महापालिका मुख्यालयाच्या आवारात भव्य हत्ती सर्वांचे स्वागत करण्यासाठी सज्ज होते. मुख्यालयात प्रवेश करताच आत भला मोठा छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा मुख्य आकर्षण ठरला होता. निवडणुकीच्या पूर्वसंध्येला अनेकांनी या ठिकाणी सेल्फी काढून घेतले होते. त्यानंतर, महापौरपदाच्या निवडणुकीतदेखील सभागृहात शिवसेनेच्या सर्वच नगरसेवकांनी भगवे फेटे परिधान केले होते.
महापौरपदाच्या निवडणूक प्रसंगी सभागृहात शिवसेनापक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी लावलेली सहकुटुंब उपस्थिती सर्वांचेच आकर्षण ठरली होती. ठाकरे यांनी महाराजांच्या पुतळ्यासमोर तमाम ठाणेकरांचे आभार मानले. यानंतर निघालेली मिरवणूकही अगदी शाही होती. ढोलताशांचा गजर, फटाक्यांची आतषबाजी यामुळे संपूर्ण वातावरण भगवे झाले होते. नितीन कंपनी ते महापालिका मुख्यालयापर्यंत भगवे झेंडे, कंदील यामुळे या भागात वेगळेच वातावरण निर्माण झाले होते. (प्रतिनिधी)
>गुलालाची झाली उधळण
महापौरपदाची निवडणूक पार पडल्यानंतर शिवसेनापक्षप्रमुखांच्या उपस्थितीत विजयी मिरवणूक काढण्यात आली. या वेळी पालकमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह अनेक शिवसैनिकांनी गुलाल उधळून विजयी जल्लोष साजरा केला. ही मिरवणूक महापालिका भवन, अरुणकुमार वैद्य, आराधना सिनेमा, हरिनिवास सर्कल, मल्हार चौक, गोखले रोड, राममारुती रोड, तलावपाळी, प्रभात चौक, छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून टेंभीनाका येथे विसर्जित करण्यात आली.

Web Title: Shigella enthusiasts of Thane

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.