शिखर बँक घोटाळा : ...तर मला आश्चर्य वाटले असते; ईडीच्या नोटिशीवरून शरद पवारांची खोचक टीका
By ऑनलाइन लोकमत | Published: September 24, 2019 09:07 PM2019-09-24T21:07:35+5:302019-09-24T21:07:55+5:30
माझ्यावर जर गुन्हा दाखल केला असेल तर मी त्यांचे स्वागत करतो.
मुंबई - शिखर बँकेतील 25 हजार कोटींच्या घोटाळ्याप्रकरणी आता अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) देखील तपासाचा फास आवळत राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार आणि अजित पवार यांच्यासह ७० जणांवर विरोधात गुन्हा दाखल केला आहे. ईडीने दाखल केलेल्या गुन्ह्याबाबत प्रतिक्रिया देताना राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी मला ईडीची कोणतीही नोटीस अद्याप मिळालेली नाही. आलीच तर मी चौकशीला सामोरा जाईन. तसेच माझ्यावर गुन्हा दाखल केला असेल तर मी त्यांचे स्वागत करतो सांगितले.
मुंबई पोलिसांनी एमआरए पोलीस ठाण्यात हायकोर्टाच्या आदेशानुसार अजित पवार यांच्याविरोधात काही दिवसांपूर्वी गुन्हा दाखल करण्यात आला होता. विधानसभा निवडणुकांमुळे राज्यात राजकीय घडामोडींना वेग आलेला असताना ईडीच्या या कारवाईमुळे राज्यातील राजकीय वातावरण तापणार असल्याची चिन्ह दिसत आहेत.
ज्या संस्थेचा मी सभासद देखील नाही आणि संस्थेने घेतलेल्या निर्णयात माझा सहभाग नाही अशा प्रकरणात माझे नाव आल्याचे शरद पवार यांनी सांगितले. मला अद्याप नोटीस मिळालेली नाही. माझ्यावर गुन्हा दाखल झाला असेल तर स्वागत करतो. राज्यातील कोणत्याही बँकेचा मी संचालक नव्हतो. कधीही मी संचालक पदासाठी निवडणूक लढवली नाही, तरीही गुन्हा दाखल झाल्याची प्रतिक्रिया राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी दिली. तसेच या कारवाईवर उपहासात्मक टीकाही केली.
तक्रार करणाऱ्याने केलेली तक्रार कर्ज संबंधी होती. हा त्या गृहस्थाच्या तक्रारीचा भाग आहे. असे असताना माझ्यावर केस दाखल करण्याचा निर्णय घेतला असेल, मग ती ईडी असेल, राज्य सरकारची तपास यंत्रणा असेल तर मी त्यांना धन्यवाद देतो, असेही पवार म्हणाले. राज्यामध्ये सहकारी संस्था अडचणीत आल्यानंतर त्या संस्थांना बाहेर काढण्यासाठी त्याना मदत करण्याचे काम बँकांचे असते आणि मदत करतात. ही मदत करणे हा काही गुन्हा नाही. मात्र, राज्य बँक बुडाल्याचे वाईट वाटते असे पवार म्हणाले.
उपरोधिक टीका
महाराष्ट्रात ज्या जिल्ह्यांत गेलो तिथे प्रचंड प्रतिसाद मिळाला. तरुणाईची मोठी उपस्थिती होती. या पार्श्वभुमीवर माझ्यावर कारवाई झाली नसती तर मला आश्चर्य वाटले असते. त्यामुळे या कारवाईचे काही वाटत नसल्याचे शरद पवार यांनी सांगितले.