शिखर बँक घोटाळा : पवारांवर सूडबुद्धीने कारवाई; राष्ट्रवादीची उद्या महाराष्ट्रभर आंदोलनाची हाक

By ऑनलाइन लोकमत | Published: September 24, 2019 10:25 PM2019-09-24T22:25:04+5:302019-09-24T22:27:41+5:30

ईडीने दाखल केलेल्या गुन्ह्याबाबत प्रतिक्रिया देताना राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी मला ईडीची कोणतीही नोटीस अद्याप मिळालेली नाही. आलीच तर मी चौकशीला सामोरा जाईन. तसेच माझ्यावर गुन्हा दाखल केला असेल तर मी त्यांचे स्वागत करतो सांगितले.

Shikhar Bank scam: NCP call for agitation across Maharashtra tomorrow against ED's action on Sharad Pawar | शिखर बँक घोटाळा : पवारांवर सूडबुद्धीने कारवाई; राष्ट्रवादीची उद्या महाराष्ट्रभर आंदोलनाची हाक

शिखर बँक घोटाळा : पवारांवर सूडबुद्धीने कारवाई; राष्ट्रवादीची उद्या महाराष्ट्रभर आंदोलनाची हाक

Next

मुंबई/पुणे :  शिखर बँकेतील 25 हजार कोटींच्या घोटाळ्याप्रकरणी आता अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) देखील तपासाचा फास आवळत राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार आणि अजित पवार यांच्यासह ७० जणांवर विरोधात गुन्हा दाखल केला आहे. ही कारवाई सूडबुद्धीने असल्याचा आरोप करत राष्ट्रवादीने महाराष्ट्रभर कार्यकर्त्यांना आंदोलनाची हाक दिली आहे. तसेच बारामतीकरांनी उद्या बारामती बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. 


ईडीने दाखल केलेल्या गुन्ह्याबाबत प्रतिक्रिया देताना राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी मला ईडीची कोणतीही नोटीस अद्याप मिळालेली नाही. आलीच तर मी चौकशीला सामोरा जाईन. तसेच माझ्यावर गुन्हा दाखल केला असेल तर मी त्यांचे स्वागत करतो सांगितले. मुंबई पोलिसांनी एमआरए पोलीस ठाण्यात हायकोर्टाच्या आदेशानुसार अजित पवार यांच्याविरोधात काही दिवसांपूर्वी गुन्हा दाखल केला होता. विधानसभा निवडणुकांमुळे राज्यात राजकीय घडामोडींना वेग आलेला असताना ईडीच्या या कारवाईमुळे राज्यातील राजकीय वातावरण तापणार असल्याची चिन्हे दिसत आहेत. 


शरद पवार यांचे नाव गुन्ह्यामध्ये आल्याने याच्या निषेधार्थ समस्त बारामतीकरांनी उद्या बारामती बंदची हाक दिली आहे. व्हॉट्सअॅपच्या सर्व ग्रुपवर हा मॅसेज फिरू लागला असून हुकुमशाही सरकारचा जाहीर निषेध करण्यासाठी बारामतीच्या नागरिकांनी उद्या सकाळी 10 वाजता शारदा प्रांगणामध्ये उपस्थित राहण्याचे आवाहन केले आहे. 


तर दुसरीकडे शरद पवार यांच्यावर सूड बुद्धीने, ईडीचा गैरवापर करत गुन्हा दाखल केला असल्याचा आरोप राष्ट्रवादीचे प्रवक्ते अंकुश काकडे यांनी केला आहे. तसेच उद्या, बुधवारी या कारवाईचा निषेध म्हणून निदर्शने, रास्तारोको यापैकी जे करता येईल ते करावे, असे आदेशही कार्यकर्त्यांना दिले आहेत. 

 

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आणि इतर नेत्यांवर सूडबुद्धीने आणि सरकारच्या दबावाखाली कारवाई केली जात आहे. हे अतिशय निंदनीय आहे. याचा आम्ही निषेध करत आहोत. सरकारी संस्था या स्वायत्त असून त्या कोणत्याही राजकीय पक्षाला बांधील नाहीत. तरी उद्या याचा निषेध म्हणून कार्यकर्त्यांनी निदर्शने, रस्ता रोको करावेत असे आवाहन करण्यात आले आहे.
- अंकुश काकडे, प्रवक्ता राष्ट्रवादी काँग्रेस

 

पवारांकडून उपरोधिक टीका

तक्रार करणाऱ्याने केलेली तक्रार कर्ज संबंधी होती. हा त्या गृहस्थाच्या तक्रारीचा भाग आहे. असे असताना माझ्यावर केस दाखल करण्याचा निर्णय घेतला असेल, मग ती ईडी असेल, राज्य सरकारची तपास यंत्रणा असेल तर मी त्यांना धन्यवाद देतो, असेही पवार म्हणाले. राज्यामध्ये सहकारी संस्था अडचणीत आल्यानंतर त्या संस्थांना बाहेर काढण्यासाठी त्याना मदत करण्याचे काम बँकांचे असते आणि मदत करतात. ही मदत करणे हा काही गुन्हा नाही. मात्र, राज्य बँक बुडाल्याचे वाईट वाटते असे पवार म्हणाले. महाराष्ट्रात ज्या जिल्ह्यांत गेलो तिथे प्रचंड प्रतिसाद मिळाला. तरुणाईची मोठी उपस्थिती होती. या पार्श्वभुमीवर माझ्यावर कारवाई झाली नसती तर मला आश्चर्य वाटले असते. त्यामुळे या कारवाईचे काही वाटत नसल्याचे शरद पवार यांनी सांगितले.

Web Title: Shikhar Bank scam: NCP call for agitation across Maharashtra tomorrow against ED's action on Sharad Pawar

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.