सोलापुरात होणार शिखर बँकेचे विभागीय कार्यालय
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 22, 2019 04:03 PM2019-05-22T16:03:20+5:302019-05-22T16:06:31+5:30
रिझर्व्ह बँकेने दिली परवानगी; राज्यातील सहावे कार्यालय, उस्मानाबाद जिल्हा जोडला
सोलापूर: महाराष्टÑ राज्य सहकारी बँक अर्थात शिखर बँकेचे विभागीय कार्यालय सोलापुरात सुरू करण्यास रिझर्व्ह बँकेने मान्यता दिली आहे. राज्य बँकेच्या सोलापूरच्या सहाव्या विभागीय कार्यालयाला उस्मानाबाद जिल्हा जोडला आहे.
राज्य बँकेची सध्या पुणे, नाशिक, नांदेड, नागपूर व औरंगाबाद येथे सध्या विभागीय कार्यालये आहेत. मुंबई येथे मुख्यालय आहे. सोलापूरसाठी स्वतंत्र विभागीय कार्यालय सुरू करण्याचा प्रस्ताव साखर सहसंचालक कार्यालयाच्या उद्घाटनप्रसंगी मांडण्यात आला होता. सोलापूर व उस्मानाबाद जिल्ह्यांसाठी स्वतंत्र साखर सहसंचालक कार्यालय सुरू झाले आहे. यामुळे सोलापूरच्या साखर कारखानदारांच्या पुणे व उस्मानाबादच्या कारखानदारांच्या नांदेडच्या चकरा बंद झाल्या आहेत.
आता राज्य बँकेचे विभागीय कार्यालय सोलापुरात सुरू होणार असल्याने सोलापूर व उस्मानाबाद जिल्ह्यातील साखर कारखाने, सूत गिरण्या व राज्य बँकेचे अर्थसाहाय्य घेणाºया सहकारी संस्थांची सोय होणार आहे. सध्या राज्य बँकेकडून कर्ज घेणे व अन्य कामांसाठी सोलापूरच्या साखर कारखान्यांना पुणे तर उस्मानाबादच्या कारखान्यांना नांदेड येथे जावे लागत आहे.
साखर सहसंचालक कार्यालयापाठोपाठ राज्य बँकेचे विभागीय कार्यालय सोलापुरात होणार असल्याने सहकार खात्याची मोठी दोन कार्यालये सोलापुरात आली आहेत. सहकारमंत्री सुभाष देशमुख व मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सकारात्मक विचार केल्याने रिझर्व्ह बँकेकडे प्रस्ताव गेला व विभागीय कार्यालयाला मंजुरी मिळाल्याचे राज्य बँकेचे संचालक अविनाश महागावकर यांनी सांगितले.
साधारण दोन महिन्यांत राज्य बँकेचे विभागीय कार्यालय सोलापुरात सुरू होईल. सोलापूर व उस्मानाबादच्या साखर कारखाने, सूत गिरण्या व आमच्या कर्जदारांना पुणे, नांदेडला जावे लागणार नाही. साखर सहसंचालक कार्यालय सोलापुरात सुरू झाल्याने अगोदरच कारखान्यांची सोय झाली आहेच.
- अविनाश महागावकर, संचालक, राज्य बँक मुंबई