शिरोलीत बिबट्याची दहशत!
By Admin | Published: March 2, 2017 01:30 AM2017-03-02T01:30:40+5:302017-03-02T01:30:40+5:30
बिबट्याचा वावर मोठ्या प्रमाणात वाढल्यामुळे या भागातील नागरिक प्रचंड दहशतीखाली आहेत
ओझर : जुन्नर तालुक्यातील शिरोली बुद्रुक येथील तळवस्ती परिसरात बिबट्याचा वावर मोठ्या प्रमाणात वाढल्यामुळे या भागातील नागरिक प्रचंड दहशतीखाली आहेत. कधी दिवसाढवळ्या तर कधी रात्री अपरात्री बिबट्याचे दर्शन होत आहे. बिबट्याच्या दहशतीमुळे शेतकरीवर्ग अक्षरश: रडकुंडीला आला आहे.
शेतीमालाच्या ढासाळलेल्या बाजारभावमुळे शेतकरी हतबल झाला आहे. शेती पीक त्यांच्यासाठी जीव की प्राण बनले आहे. आर्थिक संकटात असलेल्या शेतकरीवर्गाला आर्थिक आधार असलेल्या उन्हाळा हंगामातील शेतीपिके जगविताना दमछाक झाली आहे.
उन्हाळ्याची तीव्रता वाढल्यामुळे शेतीपिकांना पाणी देताना शेतकरीवर्गाला विजेच्या भारनियमनाचे गणित सांभाळून कसरत करावी लागत आहे. दिवसा कृषीपंपांना वीजपुरवठा उपलब्ध नसल्यावर रात्री वीज उपलब्ध असताना शेतीपिकांना पाणी द्यावे लागत आहे.
शेतकरीवर्ग जीव धोक्यात घालून शेती पिकांना पाणी भरत आहे. बिबट्या मोठ्या उसामध्ये लपन करत आहे. परंतु, ऊसतोड सुरू असल्यामुळे ज्या उसामधे बिबट्याचे वास्तव्य आहे; तो ऊस तुटला की बिबट्या दुसरीकडे पलायन करत आहेत. त्यामुळे बिबट्याचे वारंवार दर्शन होत आहे. शेती पिकांच्या आजुबाजूला बिबट्याच्या पायाचे मोठे मोठे ठसे पाहून लोकांच्या काळजाचा ठोका चुकत आहे. या भागात वनविभागाने पिंजरा लावावा, अशी मागणी येथील शेतकरीवगार्तून होत आहे. (वार्ताहर)