शिक्षणमंडळाची पोर हुश्शार ....
By admin | Published: July 25, 2016 03:34 PM2016-07-25T15:34:14+5:302016-07-25T15:34:14+5:30
महापालिका शिक्षण मंडळाच्या शाळांचा दर्जा घसरत असल्याने मुलांची संख्या रोडावत असतानाच, पालिकेने संगीत विषयक शिक्षण देण्यासाठी तीन वर्षापूर्वी सुरू केलेल्या श्री संत तुकाराम महाराज संगीत कला
ऑनलाइन लोकमत
पुणे, दि. २५ : महापालिका शिक्षण मंडळाच्या शाळांचा दर्जा घसरत असल्याने मुलांची संख्या रोडावत असतानाच, पालिकेने संगीत विषयक शिक्षण देण्यासाठी तीन वर्षापूर्वी सुरू केलेल्या श्री संत तुकाराम महाराज संगीत कला प्रबोधिनीच्या विद्यार्थ्यांनी मुंबई येथील अखिल भारतीय गांधर्व महाविद्यालयाच्या संगित विषयातील गायन, हार्मोनियम तसेच तब्बला परिक्षेत घवघवीत यश संपादन केले आहे. या परिक्षेत प्रबोधीनीचा 100 टक्के निकाल लागला आहे. 2015-16 या शैक्षणिक वर्षासाठी या कला प्रबोधिनिच्या एकूण 181 विद्यार्थ्यांनी ही परिक्षा दिली होती. यात गायन विभागात 64 हार्मोनियम मध्ये 59 तर तबला विभागात 58 विद्यार्थी यशस्वी झाली आहेत.
महापालिकेने आॅक्टोबर 2013 मध्ये तत्कालीन शिक्षण प्रमुख बाबा धुमाळ यांच्या अध्यक्षतेखाली 2013 मध्ये ही कला प्रबोधिनी सुरू करण्यात आली आहे. या प्रबोधिने मध्ये वारजे , कर्वेनगर, कोथरूड, बावधन, नळस्टॉप, जनवडी या भागातील इयत्ता 4 थी ते सातवी मधील मुलांना संगित विषयक विशेष प्रशिक्षण दिले जाते. त्यात प्रामुख्याने हार्मोनियम, तबला, गायन याचे विशेष प्रशिक्षण दिले जाते. त्यासाठी संगीत विषयक ज्ञान असलेल्या तज्ज्ञ शिक्षकांची नेमणूकही करण़्यात आलेली आहे. तसेच या ठिकाणी प्रशिक्षणासाठी आणलेल्या मुलांची वाहतूक व्यवस्थाही शिक्षण मंडळाकडूनच केली जाते.
या परिक्षेसाठी अनिता सुळे , अर्चना इरपतगिरे, उमेश जाधव, मंगेश राजहंस, या शिक्षकांनी विशेष जबाबदारी घेतली होती. त्यामुळे यातील 13 मुलांना विशेष प्राविण्य मिळालेले आहे. या मुलांचा विशेष सत्कार लवकरच शिक्षण मंडळाच्या वतीने केला जाणार आहे. या संगीत प्रबोधीनी मध्ये स्वतंत्र परिक्षा केंद्र सुरू करण्यास मान्यता मिळालेली असल्याची माहिती माजी शिक्षण मंडळ अध्यक्ष बाबा धुमाळ यांनी दिली.त्यामुळे लवकरच संगीत विषयक परिक्षाही घेण्यात येणार असल्याचे सांगितले.