ST MSRTC Employees: शिंदे-भाजप सरकारची ST महामंडळाच्या निधीला कात्री? ऐन दसरा-दिवाळीत कर्मचाऱ्यांचे पगार रखडणार!

By ऑनलाइन लोकमत | Published: September 19, 2022 06:29 PM2022-09-19T18:29:31+5:302022-09-19T18:30:36+5:30

ST MSRTC Employees: दसरा, दिवाळी सणांचे वेध लागलेले असताना, एसटी कामगार संघटनेने पुन्हा एकदा संपाची चाचपणी सुरू केल्याचे सांगितले जात आहे.

shinde fadnavis govt cut down fund allocation st employees may face salary financial problem in dusara diwali festive season | ST MSRTC Employees: शिंदे-भाजप सरकारची ST महामंडळाच्या निधीला कात्री? ऐन दसरा-दिवाळीत कर्मचाऱ्यांचे पगार रखडणार!

ST MSRTC Employees: शिंदे-भाजप सरकारची ST महामंडळाच्या निधीला कात्री? ऐन दसरा-दिवाळीत कर्मचाऱ्यांचे पगार रखडणार!

googlenewsNext

Maharashtra Politics: राज्यात एकीकडे विविध स्तरांवरील निवडणुकांची रणधुमाळी सुरू असताना, दुसरीकडे मात्र एसटी कर्मचारी पुन्हा एकदा संपावर जाणार की काय, अशी चिन्हे निर्माण झाली आहेत. कारण नव्या शिंदे-फडणवीस सरकारने एसटी महामंडळाच्या निधीला कात्री लावल्याचे सांगितले जात असून, ऐन दसरा-दिवाळीसारख्या सणासुदीच्या काळात ST कर्मचाऱ्यांचे पगार रखडणार असल्याची शक्यता वर्तवली जात आहे. 

एसटी कर्मचाऱ्यांच्या संपाच्या पार्श्वभूमीवर कर्मचाऱ्यांचा पगार वाढवण्याचा निर्णय घेण्यात आला होता. यासाठी आगामी चार वर्षे ३६० कोटी रुपयांचा निधी देण्याची ग्वाही ठाकरे सरकारने दिली होते. आता राज्यात शिंदे-फडणवीस सरकार येताच एसटी महामंडळाला देण्यात येणाऱ्या निधीवर निर्बंध लादण्यात आल्याचे सांगितले जात आहे. राज्य सरकारने ३६० कोटी रुपयांऐवजी १०० कोटींचा निधी दिल्याने एसटी महामंडळाला कर्मचाऱ्यांचे वेतना आणि भविष्य निर्वाह निधीची रक्कम देणे अवघड होऊन बसले आहे. एसटीच्या संपामुळे महामंडळाला अगोदरच फार मोठे नुकसान सोसावे लागले आहे. आता हा गाडा रुळावर येत असतानाच निधीच्या अभावामुळे महामंडळासमोर पुन्हा संकट उभे राहिले आहे. 

पुन्हा एकदा एसटी संपाची चाचपणी?

राज्यातील नागरिकांना नवरात्र, दसरा, दिवाळी या सणांचे वेध लागलेले असताना, एसटी महामंडळातील एसटी कामगार संघटनेने पुन्हा एकदा एसटी संपाची चाचपणी सुरू केली आहे. एसटी कर्मचाऱ्यांचे २०२० पासून थकीत देणी तातडीने देणे, मॅक्सीकॅबला प्रवासी परवाने देऊ नये, अशा एकूण ३४ मागण्यांसाठी राष्ट्रवादी काँग्रेसच्या एसटी कामगार संघटनेने लाक्षणिक उपोषणाची नोटीस एसटी महामंडळाला दिली आहे. तत्पूर्वी, एसटी महामंडळाचे राज्य सरकारमध्ये विलीनीकरण करावे, या मागणीसाठी एसटी कर्मचाऱ्यांनी २७ ऑक्टोबर २०२१ पासून काम बंद आंदोलन सुरू केले होते. जवळपास सहा महिने एसटी कर्मचाऱ्यांचा संप सुरू होता. मार्च २०२२मध्ये न्यायालयाच्या हस्तक्षेपानंतर कर्मचाऱ्यांनी कामावर येण्यास सुरुवात केली.

दरम्यान, एसटीचे प्रत्येक महिन्याचे उत्पन्न ४५० कोटींच्या आसपास आहे. तर एसटी चालवण्यासाठी महिन्याला साधारण ६५० कोटी रुपयांचा खर्च आहे. यात कर्मचाऱ्यांच्या वेतनासाठी ३१० कोटी, डिझेलसाठी २५० कोटी आणि अन्य गोष्टींसाठी साधारण ९० कोटीचा खर्च येतो. उर्वरित पैशांची व्यवस्था कुठून करायची, हा पेच एसटी महामंडळासमोर उभा राहिला आहे. शिंदे-फडणवीस सरकारने निधीला कात्री लावल्यास सणांच्या हंगामात एसटी कर्मचाऱ्यांना आर्थिक अडचणींना सामोरे जावे लागू शकते. दिवाळीच्या काळात बोनसची अपेक्षा करणाऱ्या कर्मचाऱ्यांना वेतन तरी मिळणार की नाही, याबाबत साशंकता आहे.

 

Web Title: shinde fadnavis govt cut down fund allocation st employees may face salary financial problem in dusara diwali festive season

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.