Maharashtra Political Crisis: नव्या सरकारचा पुन्हा ‘नामाचा गजर’; औरंगाबादचे ‘छत्रपती संभाजीनगर’, उस्मानाबाद आता ‘धाराशिव’
By ऑनलाइन लोकमत | Published: July 17, 2022 05:08 AM2022-07-17T05:08:18+5:302022-07-17T05:09:09+5:30
केंद्र सरकारच्या मंजुरीनंतर या निर्णयाला मूर्त स्वरूप प्राप्त होईल.
लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : औरंगाबादचे नामांतर ‘छत्रपती संभाजीनगर’ तर उस्मानाबादचे नामांतर ‘धाराशिव’ असे करण्याचा निर्णय राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत शनिवारी घेण्यात आला. आधीच्या उद्धव ठाकरे सरकारने २९ जून रोजी संभाजीनगर आणि धाराशिव, असे नामांतर करण्याचा निर्णय घेतला होता. पण त्या सरकारला निर्णय घेण्याचे अधिकार नव्हते, असे कारण देत आज नव्याने निर्णय घेताना ‘संभाजीनगर’ऐवजी ‘छत्रपती संभाजीनगर’ असा नामविस्तार करण्यात आला. आधीच्या सरकारने घेतलेले निर्णय कोर्टात टिकू शकणार नाहीत, असा युक्तिवाद नव्या सरकारमधील नेतृत्वाकडून करण्यात आला.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शनिवारी आयोजित केलेल्या संयुक्त पत्रपरिषदेत ही माहिती दिली. विधिमंडळात हा प्रस्ताव मंजूर करून तो केंद्र सरकारकडे पाठविण्यात येईल, अशी माहितीही त्यांनी दिली. केंद्र सरकारच्या मंजुरीनंतर या निर्णयाला मूर्त स्वरूप प्राप्त होईल.
प्रस्ताव केंद्र शासनास पाठविण्यात येऊन त्यानंतर त्याप्रमाणे विभाग, जिल्हा, तालुका तसेच महानगरपालिका व नगरपालिका यांचे नामांतर करण्यात येईल. याबाबतची कार्यवाही स्वतंत्रपणे महसूल व वन विभाग तसेच नगरविकास विभागाकडून करण्यात येईल.
नवी मुंबई विमानतळाला दि. बा. पाटील यांचे नाव
नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाचे ‘लोकनेते दि. बा. पाटील नवी मुंबई विमानतळ’ असे नामकरण करण्याचा निर्णय मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला. या विमानतळाला शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे नाव देण्याचा प्रस्ताव आपण नगरविकास मंत्री असताना दिलेला होता. पण स्थानिक भूमिपुत्रांच्या भावनेचा आदर करून दि. बा. पाटील यांचे नाव देण्याचा निर्णय शनिवारी घेतला, असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी स्पष्ट केले. नवी मुंबईतीय या आंतरराष्ट्रीय विमानतळाला दि. बा. पाटील यांचेच नाव दिले जावे, अशी आग्रहाची मागणी त्या परिसरातील प्रकल्पग्रस्तांकडून करण्यात येत होती.