शिंदे सरकारची सामाजिक वारी, ‘आपला दवाखाना’ आणखी ७०० ठिकाणी
By ऑनलाइन लोकमत | Published: June 29, 2023 08:01 AM2023-06-29T08:01:22+5:302023-06-29T08:02:11+5:30
Maharashtra Government: राज्यात पावसाचे दमदार आगमन झाले असतानाच शिंदे-फडणवीस सरकारने बुधवारच्या मंत्रिमंडळ बैठकीत निर्णयांचा पाऊस पाडला.
मुंबई : राज्यात पावसाचे दमदार आगमन झाले असतानाच शिंदे-फडणवीस सरकारने बुधवारच्या मंत्रिमंडळ बैठकीत निर्णयांचा पाऊस पाडला. महात्मा फुले जनआरोग्य योजनेत पाच लाखांचे कवच, आणखी ७०० ठिकाणी आपला दवाखाना सुरू करणे, संजय गांधी व श्रावणबाळ योजनेतील रकमेत भरघोस वाढ आणि असंघटित कामगारांसाठी महामंडळाची स्थापना आदी सामाजिक व आरोग्यविषयक निर्णयांची वारी काढली.
जनआरोग्य योजनेंतर्गत आरोग्य संरक्षण प्रति कुटुंब प्रति वर्षी दीड लाख रुपयांवरून ५ लाख रुपये करण्यात आले. याचा अनेक गरजू कुटुंबाना
लाभ होणार आहे. यापूर्वी केशरी शिधापत्रिका व अंत्योदय शिधापत्रिका असणाऱ्या नागरिकांनाच लाभ मिळत होता. आता सर्व नागरिकांना आरोग्य संरक्षणाचे कवच असेल. त्याचा फायदा दोन कोटी कुुटुंबांना होईल.
इतर महत्त्वाचे निर्णय
रस्ते अपघातासाठी उपचाराच्या खर्च मर्यादेत ३० हजार रुपयांवरून प्रति रुग्ण प्रती अपघात १ लाख रुपये, अशी वाढ करण्यात आली आहे.
राज्यात ७०० ठिकाणी हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे ‘आपला दवाखाना’ उभारले जातील. त्यासाठी २१० कोटी रु. दिले जातील. सध्या मुंबईत असे १५५ दवाखाने आहेत.
पालघर, ठाणे (अंबरनाथ), जालना, अमरावती, बुलढाणा, वाशिम, वर्धा, भंडारा आणि गडचिरोली या ९ जिल्ह्यांमध्ये प्रत्येकी १०० विद्यार्थी प्रवेश क्षमतेचे नवीन वैद्यकीय महाविद्यालय सुरू करण्यात येणार.