नाशिकमध्ये शिंदे गटाने अडवून धरले, आता छगन भुजबळ मदत करतील का? गोगावले म्हणाले...
By ऑनलाइन लोकमत | Published: April 19, 2024 06:05 PM2024-04-19T18:05:41+5:302024-04-19T18:06:59+5:30
Bharat Gogawale on Chagan Bhujbal: नाशिकची जागा अमित शाह, मोदी यांच्याकडून भुजबळांना मिळूनही शिंदे गट सोडायला तयार नसल्याने नाराज होऊन छगन भुजबळांनी या जागेवरील दावा सोडला आहे. यामुळे भुजबळ आता शिंदेंच्या शिवसेनेला मदत करतील का असा प्रश्न उपस्थित होत आहे.
नाशिकची जागा अमित शाह, मोदी यांच्याकडून भुजबळांना मिळूनही शिंदे गट सोडायला तयार नसल्याने नाराज होऊन छगन भुजबळांनी या जागेवरील दावा सोडला आहे. यामुळे भुजबळ आता शिंदेंच्या शिवसेनेला मदत करतील का असा प्रश्न उपस्थित होत आहे. यावर शिंदे गटाचे आमदार भरत गोगावले यांनी आम्ही एक पाऊल पुढे टाकले आहे. तटकरेंचे काम करतोय ना, मग छगन भुजबळांनाही आमचे काम करावेच लागेल, अशा शब्दांत प्रतिक्रिया दिली आहे.
नाशिकच्या जागेबाबत मला पक्षनेतृत्वाकडून सांगून ३ आठवडे उलटून गेले आहेत. मात्र अजूनही या जागेचा तिढा सुटलेला नाही. दुसरीकडे, समोरच्या पक्षाचा उमेदवार जाहीर होऊन बरेच दिवस झाले आणि ते जोरदारपणे कामालाही लागले आहेत. परिणामी महायुतीला नाशिकच्या जागेवर अडचण निर्माण होऊ शकते. हा डेडलॉक तोडण्यासाठी मी लोकसभा निवडणुकीतून माघार घेण्याचा निर्णय घेतला आहे, असे भुजबळ म्हणाले होते.
यावर आता नाशिकच्या जागेसाठी भुजबळ यांनी माघार घेतली असेल तर त्यांचे स्वागत आहे. जर मोदींना चारशे पार करून पंतप्रधान करायचे असेल आणि महाराष्ट्रामध्ये 45 प्लस खासदार निवडून आणायचे असतील तर एकमेकांच्या जागेवर आग्रह धरण्यापेक्षा जिथे ज्याला गरज आहे तिथे त्यांनी समोरच्याला मदत करावी. रत्नागिरीमध्ये नारायण राणे यांच्यासाठी आम्ही सर्वजण शिवसैनिक, पदाधिकारी, कार्यकर्ते, आमदार, खासदार एकत्र येऊन त्यांच्या पाठीशी उभे आहोत. तटकरेंसाठी आम्ही काम करतोय. आम्ही पण एक पाऊल पुढे टाकून करतोय ना काम. बारामतीत सुनेत्रा पवारांच्या प्रचाराला गेलेलो. त्याचप्रमाणे जिथे जिथे आम्हाला गरज आहे तिथे दोन्ही मित्र पक्षांनी आम्हाला सहकार्य करावे व पाठिंबा द्यावा, असे आवाहन भरत गोगावले यांनी केले.