Maharashtra Politics: “मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे शिवभक्त, भविष्यच पाहायचे असते तर मुंबईत बोलावून...”

By ऑनलाइन लोकमत | Published: November 24, 2022 02:06 PM2022-11-24T14:06:36+5:302022-11-24T14:07:21+5:30

Maharashtra News: शिर्डी दौऱ्यावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंसोबत असलेल्या दीपक केसरकर यांनी सत्य परिस्थिती सांगत विरोधकांना सुनावले आहे.

shinde group deepak kesarkar reaction over cm eknath shinde visit sinnar ishaneshwar temple | Maharashtra Politics: “मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे शिवभक्त, भविष्यच पाहायचे असते तर मुंबईत बोलावून...”

Maharashtra Politics: “मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे शिवभक्त, भविष्यच पाहायचे असते तर मुंबईत बोलावून...”

Next

Maharashtra Politics: मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी शिर्डी दौऱ्यावर असताना साईबाबा मंदिरात जाऊन दर्शन घेतले. यानंतर अचानक आपल्या नियोजित कार्यक्रमात बदल केला. यानंतर मुख्यमंत्र्यांनी सिन्नरमधील ईशान्येश्वर मंदिराला भेट दिली. यानंतर एकनाथ शिंदेंनी ईशान्येश्वर मंदिरामध्ये एका ज्योतिषाकडून आपले भविष्य जाणून घेतल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे. यावर एकनाथ शिंदे यांच्यासोबत शिर्डी दौऱ्यावर असलेले शिंदे गटाचे प्रवक्ते दीपक केसरकर यांनी स्पष्ट शब्दांत विरोधकांना सुनावले आहे. 

कॅप्टन खरात म्हणून माझे एक मित्र आहेत. त्यांचे ईशान्येश्वर हे मंदिर आहे. तेथे गोशाळा व्हावी म्हणून मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी एक देणगी दिली होती. त्यामुळे कॅप्ट खरात यांची इच्छा होती की, मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी एकदा ईशान्येश्वर मंदिराला आणि गोशाळेचे काम सुरू होणार आहे त्याला भेट द्यावी, अशी माहिती दीपक केसरकर यांनी दिली. 

काहीही बातम्या देणे हे चुकीचे आहे

माझी सर्वांना विनंती आहे की, शेवटी प्रत्येकाला व्यक्तिगत आयुष्य असते. त्यात ते शिवभक्त असतील आणि त्यांनी आपल्या १० मित्रांना फोन करून देणगी द्या म्हणत खरोखर गोशाळेसाठी काही केले असेल तर ते गोशाळेसाठी आहे. आता कॅप्टन खरात यांचा व्यवसाय भविष्य पाहणे असेल, तर भविष्य विचारायला मुख्यमंत्री ईशान्येश्वर मंदिरात का जातील? भविष्य पाहायचे असते तर त्यांनी कॅप्टन खरात यांना मुंबईत बोलावून घेतले असते आणि भविष्य पाहिले असते. त्यामुळे काहीही बातम्या देणे हे चुकीचे आहे, असे दीपक केसरकरांनी म्हटले आहे. 

दरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांनी यावर भाष्य केले आहे. एक गोष्ट खरी आहे की, आम्ही राजकीय लोक कुठेही गेलो तर तेथील स्थानिक देवस्थानांना भेट देतो. ही आपली परंपरा आहे. त्याबद्दल आपल्या मनात आदराचे, श्रद्धेचे स्थान आहे. तिथपर्यंत मी समजू शकतो. मात्र, ज्योतिषाकडे जाऊन आपले भविष्य बघणं म्हणजे २१ व्या शतकात सर्व जग चालले असताना आपण अंधश्रद्धांना खतपाणी घालण्यासारखे आहे. तंत्रज्ञानाच्या युगात अनेक बदल होत आहेत. अशावेळी विज्ञान काय सांगतेय हे न पाहता पुरोगामी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री ज्योतिष बघतात. यावर काय बोलावे, आमच्यासारखे तर हतबलच झालेत, असा टोलाही अजित पवार यांनी लगावला. 

सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"

Web Title: shinde group deepak kesarkar reaction over cm eknath shinde visit sinnar ishaneshwar temple

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.