Maharashtra Politics: “तुरुंगातून बाहेर पडल्यावर संजय राऊतांची भाषा बदलली, पण...”; शिंदे गटाचा टोला
By ऑनलाइन लोकमत | Published: November 22, 2022 03:20 PM2022-11-22T15:20:27+5:302022-11-22T15:21:13+5:30
Maharashtra News: संजय राऊत विकासाची भाषा बोलत होते, असे सांगत शिंदे गटातील मंत्र्यांनी खोचक टोला लगावला आहे.
Maharashtra Politics: मुंबईतील पत्राचाळ कथित घोटाळ्याप्रकरणी शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांची तब्बल ११० दिवसांच्या कोठडीनंतर जामिनावर मुक्तता करण्यात आली. यानंतर संजय राऊत पुन्हा एकदा सक्रीय झाले आहेत. जामीन मिळाल्यानंतर संजय राऊत दिल्लीत गेले होते. तसेच ते लवकरच राहुल गांधींच्या भारत जोडो यात्रेत सहभागी होणार असल्याचे सांगितले जात आहे. यातच शिंदे गटातील आमदारांनी पुन्हा एकदा संजय राऊतांना टोला लगावला आहे.
शिंदे गटाचे प्रवक्ते आणि राज्याचे शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांनी संजय राऊत यांना टोला लगावला आहे. अनेक मुद्द्यांवर भाष्य करताना दीपक केसरकर यांनी प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबद्दल ज्वाजल्य अभिमान महाराष्ट्रातील जनतेला आहे. राज्यपाल महोदय हे सर्वांत वरिष्ठ पद आहे. त्यांनी विधाने करताना जपून केले पाहिजेत. चुकीने एखादे वाक्य निघत असेल तर त्याचे स्पष्टीकरण पूर्वीसुद्धा राज्यपाल कोश्यारी यांनी दिले आहे. यावेळीही ते स्पष्टीकरण देतील, अशी अपेक्षा व्यक्त करतो, असे दीपक केसरकर यांनी सांगितले.
आम्ही प्रकाश आंबेडकर यांच्यासोबत आहोत
प्रकाश आंबेडकर यांनी कुणासोबत जावे. हा त्यांचा विषय आहे. बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मृती जपण्याच्या दृष्टीने बऱ्याच गोष्टी करावयाच्या होत्या. याबाबत आम्ही प्रकाश आंबेडकर यांच्यासोबत आहोत. प्रकाश आंबेडकर यांच्याकडे बाबासाहेब आंबेडकर यांचा राजकीय वारसा आहे. त्यामुळे त्यांना त्यासंदर्भात जे काही सहकार्य लागेल ते आम्ही करू. बाबासाहेबांचे विचार, त्यांच्या स्मृती जपण्याचा विषय असेल किंवा इतर सुविधा देण्याबाबचे विचार आहेत. त्याबाबत चांगलं सहकार्य आहे. मुख्यमंत्री आणि त्यांचे सहकार्य आहे. शासन त्यांना नेहमी सहकार्य करत राहील, अशी ग्वाही दीपक केसरकर यांनी दिली.
दरम्यान, खासदार संजय राऊत यांनी पुन्हा एकदा रेड्याचा उल्लेख केला. सरकार म्हणजे औरंगजेबाची औलाद आहे, असेही म्हटले. यासंदर्भात बोलताना दीपक केसरकर म्हणाले की, संजय राऊत हे नुकतेच तुरुंगातून बाहेर पडले आहेत. तुरुंगातून बाहेर पडल्यावर त्यांची भाषा बदलली होती. चांगले बोलत होते. आता पुन्हा ते का वाईट बोलायला लागले याचा विचार करावा लागेल. विकासाची भाषा बोलत होते. त्यांना कुणीतरी काहीतरी शिकवत असावे, असे मला वाटते, अशी प्रतिक्रिया दीपक केसरकर यांनी दिली.
सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"