Maharashtra Politics: “उरलेली शिवसेना संपवण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसने सुषमा अंधारेंना ठाकरे गटात पाठवलंय”
By ऑनलाइन लोकमत | Published: December 9, 2022 06:05 PM2022-12-09T18:05:48+5:302022-12-09T18:06:29+5:30
Maharashtra News: आदित्य ठाकरे मंत्री असताना मंत्रालयात गेले असते तरी पुरे झाले असते. सुषमा अंधारेंची जुनी विधाने जनतेसमोर यायला हवीत, असे शिंदे गटाने म्हटले आहे.
Maharashtra Politics: बाळासाहेबांची शिवसेना म्हणजेच शिंदे गट आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गट याच्यांतील संघर्ष वाढतानाच दिसत आहे. राज्यभरातून शिवसेनेतील शेकडो नेते, पदाधिकारी, कार्यकर्ते शिंदे गटात गेले आहेत. राज्यभरातून शिंदे गटाला पाठिंबा वाढताना दिसत आहे. ठाकरे गटाकडून शिंदे गटावर सातत्याने टीका केली जात आहे. याला शिंदे गटही प्रत्युत्तर देत आहेत. यातच उरलेली शिवसेना संपवण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसने सुषमा अंधारेंना ठाकरे गटात पाठवले आहे, असा दावा शिंदे गटाने केला आहे.
शिंदे गटाचे प्रवक्ते दीपक केसरकर यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना ठाकरे गटावर अनेकविध मुद्द्यांवरून निशाणा साधला. उद्धव ठाकरे यांनी कर्नाटकाच्या मुद्द्यावरून शिंदे सरकारला घेरले आहे. त्यावर बोलताना, काही लोकांना बोलता येते. काही लोकांना कृती करता येते. ज्यांनी सीमा भागाच्या सुविधा बंद करून ठेवल्या होत्या, त्यांना असे बोलणे शोभत नाही. आम्ही सुविधा सुरू केल्याच, पण न्यायालयातील प्रकरणांनाही गती दिली. सीमाभागाचे राजकारण पेटवून राजकारण करणाऱ्यांचा महाराष्ट्राने विचार करण्याची गरज असल्याचा खोचक टोला दीपक केसरकर यांनी लगावला.
उरलेली शिवसेना संपवण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसने सुषमा अंधारेंना ठाकरे गटात पाठवलंय
राष्ट्रवादीने ठाकरे गटाला संपवण्याचा कार्यक्रम हाती घेतला आहे. अर्धी शिवसेना संपवली. आता उरलेली संपवायला सुषमा अंधारेंना पाठवले आहे, असा दावा करतानाच सुषमा अंधारे यापूर्वी काय काय बोलल्या आहेत, हे जनतेसमोर आले पाहिजे, असे दीपक केसरकर म्हणाले. तसेच मुंबई महापालिकेत शिंदे गट आणि भाजपची युती होणार असल्याबाबत सूतोवाच केले. याशिवाय, आदित्य ठाकरे मंत्री असताना मंत्रालयात गेले असते तरी पुरे झाले असते. तुम्ही साध्या मिटिंग घेतल्या नाहीत. आरोप करणे सोपे असते. राज्याराज्यांमध्ये स्पर्धा असते, असा पलटवार केसरकर यांनी आदित्य ठाकरेंच्या टीकेवर बोलताना केला.
दरम्यान, छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान हा महाराष्ट्राचा अपमान आहे. या भूमीत छत्रपतींचा अपमान योग्य नाही. राज्यपालांनी खुलासा द्यायला हवा होता, पण दिला नाही. आम्ही केंद्राकडे भावना पोहोचवल्या आहेत, असे केसरकर म्हणाले.
सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"